भूमिकाबदलू ‘राज’नीती

24 Oct 2025 10:31:54

Raj Thackeray
 
विजयादशमीच्या दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा आणि गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा हे दोन्ही राजकीय पक्षांचे पारंपरिक मेळावे. यंदा मात्र गुढीपाडव्याच्या आधीच राज ठाकरे यांचा एक मेळावा पार पडला. ‘मुंबई महानगर प्रदेश मतदारयादी प्रमुख मेळावा’ असे त्या मेळाव्याचे नाव. मुळात, हा मेळावा कशासाठी होता, हे सुज्ञ जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही! निवडणुका नसल्या की, राजकीय विजनवासात गेलेले राज ठाकरे निवडणुका आल्यावर अचानक जागृत होतात, हे अद्याप सर्वांनाच कळून चुकले आहे.
 
तशाचप्रकारे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यातून मग महाविकास आघाडीसोबत बसून मतदारयादीपासून ते मतदान प्रक्रियेवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ते झाडताना दिसतात. राज ठाकरे लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतात, विधानसभेत स्वबळावर लढतात, तर पालिका मिळवण्यासाठी यापूर्वी कधी ढुंकूनही न पाहणार्‍या उद्धव ठाकरे यांच्याशी युती करतात.
 
एकेकाळी राज ठाकरे यांची भाषणाची शैली सर्वांना भावणारी तर होतीच, शिवाय त्यात बरेच तथ्य आणि गांभीर्यही जाणवत होते. अगदी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांशी त्यांची तुलना व्हायची. ते जी आकडेवारी मांडायचे, त्याला एक वलय होते; मात्र अलीकडे राज यांची वारंवार बदललेली भूमिका पाहता, ना त्यांची भाषणे कुणी गांभीर्याने घेत, ना भूमिका! कधीतरी ‘बाण हवा की खान’ असे म्हणून उद्धव ठाकरेंना डिवचणारे राज ठाकरे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याच्या तयारीत आहेत.
 
खरे तर, पहिल्यांदाच निवडणूक लढवणार्‍या आपल्या मुलाच्या पराभवास कोण कारणीभूत होते, याचा कदाचित त्यांना विसर पडला असावा. पण, आता ही नवी युती झालीच, तर ती किती दिवस टिकेल, हे देवच जाणे! विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एका वर्षांनी पुन्हा एकदा मतदारयादीचा मुद्दा उकरून काढत राज ठाकरे ‘मॅच फिसिंग’चा आरोप केला. आगामी निवडणुकासांठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गाठ बांधण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देच उरलेले नाहीत. त्यामुळे पराभवाच्या भीतीपोटी असे अचानक मेळावे घेऊन जनतेला आकर्षित करण्याचा राज ठाकरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल!
 
काँग्रेसला ठाकरेंचा तिटकारा?
 
राज ठाकरे तर सोडाच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही,” हे विधान आहे काँग्रेस नेते भाई जगताप यांचे. खरे तर, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वाय बरेच काही सांगून जाते. एकीकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना कसे सामावून घेता येईल, याचे आडाखे बांधत असताना, काँग्रेसला मात्र ठाकरे बंधूंचाच तिटकारा असल्याचे भाईंच्या या वक्तव्यातून जाणवते.
 
वास्तविक ठाकरे बंधूंच्या युतीची आणि ओघाओघाने मनसेला मविआत घेण्याची चर्चा सुरू झाल्यापासूनच काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येते. काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी मनसेला साफ नाकारले आहे. फक्त हे बोलत असताना ‘आम्ही स्वबळावर लढणार’ किंवा ‘युतीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या,’ अशी बेगडी भूमिका त्यांनी घेतली. जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसतसा मविआच्या गाडीचा एकेक डबा रुळावरून घसरताना दिसतो. खरे तर, वैचारिक तडजोड करून काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे एकदा मुख्यमंत्री बनले; पण कधी नव्हे, ते आता त्यांचे बंधुप्रेम उफाळून आल्याने दुसरे कुणी असो-नसो, याचा त्यांना फारसा फरक पडत नाही. राहिली गोष्ट भाई जगताप यांची, तर त्यांचा प्रारंभीपासूनच शिवसेनेला विरोध दिसून आला. त्यात विधानसभेचा अनुभव पाहता, स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी परवडणारी नाही, अशी काँग्रेस नेत्यांची भावना. म्हणूनच कदाचित विधानसभेवेळी केवळ राजकीय गरज म्हणून एकत्र आलेली महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरकटलेली दिसते.
 
वास्तविक काँग्रेसमधील गटबाजीचे राजकारण आजवर लपून राहिलेले नाही. त्यामुळेच या सगळ्या गदारोळाबद्दल काँग्रेस हायकमांड अवाक्षरही काढताना दिसत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांची जबाबदारी स्थानिक नेतृत्वावर ढकलून हायकमांड मोकळे झाले असावे. या सगळ्यांत शरद पवारांचा ‘सेफ गेम’ सुरू आहे. खरे तर, केवळ भाजपचा विरोध हा एकमेव अजेंडा डोळ्यांपुढे ठेवून एकत्र आलेले पक्ष म्हणजे ही महाविकास आघाडी! त्यामुळे या आघाडीला ना कुठली दिशा आहे, ना विचार. शिवाय, काँग्रेसच्या ठाकरे बंधूंप्रति असलेल्या या तिटकार्‍यामुळे मविआ कोणत्याही क्षणी विसर्जित होऊ शकते, हे मात्र निश्चित!
 
 
Powered By Sangraha 9.0