मुंबई :( Navnath Ban ) संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची पॉवर प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वीच जनतेने त्यांची पॉवर कट केली आहे, असा खोचक टोला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी लगावला आहे.
नवनाथ बन म्हणाले की, "संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची पॉवर प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वीच जनतेने त्यांची पॉवर कट केली असून तुम्ही कितीही पॉवर प्रेझेंटेशन केले तरी जनतेला त्याचा उपयोग होणार नाही. जनता भाजप आणि महायूतीच्या सोबत आहे. जनतेने विधानसभा निवडणूकीत मत न देऊन तुमची पॉवर कट केली असून आता मुंबई महापालिका निवडणूकीतही मुंबईकर तुमची पॉवर कट करणार आहेत. फक्त आदित्य ठाकरे पॉवर प्रेझेंटेशन देत असताना उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवू नका," असा टोला त्यांनी लगावला.
मोर्चा काढण्यापेक्षा जनतेत जा
"१ नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्याऐवजी महाविकास आघाडीने जनतेत जावे. अडीच वर्षे घरी बसून जनतेच्या हिताचे एकही काम तुमच्या सरकारने केले नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याऐवजी जनतेत गेले पाहिजे. महाविकास आघाडीने मतदार याद्यांमध्ये कशा प्रकारे गोंधळ घातला याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत. विक्रोळीत बोगस मतदार बनवून संजय राऊत तुम्ही तुमच्या भावाला जिंकवले का? लोकसभेत तुमचे ४८ पैकी ३० खासदार निवडून आले तेव्हा तुम्ही कुठली एजेंसी आणून बसवली होती?" असा सवालही त्यांनी केला.
"संजय राऊतांना कावीळ झालेली असल्याने त्यांना सगळीकडे पिवळे दिसत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना 'तुम्ही काय करता ते आम्हाला व्हॉट्सअॅप गृपवर कळते' असे सांगितले. याचा अर्थ लगेच सरकारी यंत्रणा काहीतरी देखरेख करते असा होत नाही. आमचे कार्यकर्ते काम करतात की, नाही यावर पक्ष म्हणून लक्ष ठेवणे आमचे काम आहे. जर आम्ही लक्ष ठेवले नाही तर उबाठा गटासारखी आमची अवस्था झाली असती. पण संजय राऊत कायम निराशेत असतात आणि नकारात्मक बघतात.
पेगासेसपेक्षा मोठ्या मशीन भाजपच्या वॉररुममध्ये बसवल्या असल्याचे संजय राऊत म्हणतात. त्यांनी आता संपादक पद सोडून दिग्दर्शक व्हायला हवे. संजय राऊत तुमचं सरकार असताना तुम्ही कुणाकुणाला रडारवर ठेवले होते, कुणाकुणाचे फोन टॅप केले होते, आणि किती पत्रकारांना त्रास दिला, याची माहिती द्या. तुम्ही विरोधकांचा आणि पत्रकारांचा गळा घोटण्याचे काम केले होते. त्यामुळे तुम्हाला ही भाषा शोभत नाही," असेही नवनाथ बन म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....