मुंबई मेट्रो-३ या मुंबईच्या उदरातून धावणार्या पहिल्या भूमिगत मार्गिकेच्या अभूतपूर्व यशानंतर आता मुंबईत दुसरी भूमिगत मार्गिका मेट्रो ११ वडाळा ते गेट-वे ऑफ इंडियाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. त्यानिमित्ताने या मेट्रो मार्गिकेची ओळख करुन देणारा हा लेख...
मुंबई मेट्रो-३ अर्थात ‘आरे-सीप्झ-कफ परेड’ अशा एकूण ३३.७ किमी लांबीच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेला मुंबईकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. प्रचंड राजकीय विरोधाचा सामना केलेल्या या मेट्रोतून, पहिल्याच आठवड्यात तब्बल १२ ते १५ लाख मुंबईकरांनी प्रवास करत सगळे ‘फेक नॅरेटिव्ह’ मोडीत काढले. या मेट्रोला मिळणार्या ऐतिहासिक यशानंतर आता ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एमएमआरसीएल)ने मुंबईकरांसाठी दुसर्या भूमिगत मेट्रोसाठी दिवाळीच्या शुभदिनी मुहूर्तमेढ रोवली आहे.
मुंबईच्या भूमिगत मेट्रो नेटवर्कचा विस्तार शहराच्या ऐतिहासिक अशा दक्षिण मुंबईकडे करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘एमएमआरसीएल’ने मेट्रो मार्गिका ११ साठी अंतरिम सल्लागार (खपींशीळा उेर्पीीश्रींरपीं) नेमण्याच्या उद्देशाने निविदा आमंत्रित केल्या आहेत. ही मार्गिका १७.४ किमी लांबीची पूर्णपणे भूमिगत मार्गिका असेल. आणिक डेपो ते गेट-वे ऑफ इंडिया असा मार्ग प्रस्तावित आहे. ही मार्गिका ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’मार्फतच उभारण्यात येणार होती; मात्र मुंबई मेट्रो-३च्या बांधकाम अनुभवामुळे मेट्रो-११ची जबाबदारीदेखील ‘एमएमआरसीएल’कडेच देण्यात आली.
मेट्रो-११ ही ठाण्यातील ‘गायमुख ते वडाळा’ या मेट्रो ४अ व मेट्रो ४ची विस्तारित मार्गिका आहे. ठाण्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशी (सीएसएमटी) जोडण्यासाठी या मार्गिकेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ही मार्गिका छशिमटहून पुढे हॉर्निमन सर्कल खालून अपोलो बंदरपर्यंत म्हणजेच गेट-वे ऑफ इंडियाकडे नेण्याचे नियोजन करण्यात आले. साधारण मे २०२५च्या काळात या मार्गासाठी जमिनीखाली असणार्या समुद्राच्या पाण्याचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर आता अंतरिम सल्लागार नेमण्याच्या उद्देशाने निविदा आमंत्रित केल्या आहेत.
या मेट्रो प्रकल्पात एकूण १४ स्थानके असतील. त्यांपैकी १३ स्थानके भूमिगत आणि एक स्थानक जमिनीवर असेल. ही मार्गिका वडाळा, भायखळा, नागपाडा, भेंडीबाजार, क्रॉफर्ड मार्केट आणि कुलाबामार्गे पुढे गेट-वे ऑफ इंडियाकडे जाऊन समाप्त होईल. जवळपास २४ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून (जायका) यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. मुंबई मेट्रो-११ ही इतर अनेक मेट्रो मार्गाशी आणि वाहतूक व्यवस्थांशी धोरणात्मकरित्या जोडली जाईल, ज्यामुळे संपूर्ण शहरात अखंड प्रवासासाठी एक मजबूत नेटवर्क तयार होईल. मेट्रो-११ साठीचा कार डेपो १६ हेटर परिसरात आणिक-प्रतीक्षा नगर बेस्ट बस डेपो येथे असेल. या एकात्मिक विकास योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक वाहतुकीच्या इतर प्रकारांशी सुरळीत कामकाज आणि अखंड समन्वय सुनिश्चित करणे आहे.
धारावी मल्टिमॉडेल हबशी जोडणी
मुंबई मेट्रो मार्ग ११चा विस्तार हा धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आणिक आगारापासून धारावी आणि शीवपर्यंत प्रस्तावित आहे. यामुळे धारावी मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आणि मुंबई मेट्रो मार्गिका ३शी जोडणी होईल. मात्र, हा विस्तार अद्याप नियोजनाच्या टप्प्यात आहे.
अंतरिम सल्लागार काय करणार?
अंतरिम सल्लागार मार्गाचे संरेखन, स्थानकांची ठिकाणे अंतिम करेल. याचसोबत, भूगर्भीय सर्वेक्षण, बोगदा आणि स्थानकांचे प्राथमिक आराखडे तयार करेल. तसेच, नागरी टेंडर पॅकेजेस तयार करणार आहे. याशिवाय, वाहतूक वळविण्याचे नियोजन, मलबा व्यवस्थापन ( much disposal ) आणि पुनर्वसन व पुनर्वसाहत (RR) धोरणे तयार करणेही सल्लागाराच्या जबाबदार्यांमध्ये समाविष्ट आहे, जे दाट लोकवस्तीच्या शहरात ( Island city ) बांधकामासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
अपेक्षित दैनंदिन प्रवासीसंख्या
वर्ष २०३१ - ५.८० लाख
वर्ष २०४१ - ८.६९ लाख
वर्ष २०५१ - ९.८० लाख
वर्ष २०५५ - १०.१२ लाख
मार्गाची लांबी : १७.५१ किमी
भूमिगत : १६.८३३ किमी
ग्रेडवर : ०.६६७
एकूण स्थानके : १४
भूमिगत स्थानक : १३
जमिनीवरील स्थानके: १