पाकिस्तानमध्ये फक्त भारतविरोधी खोटे दावेच करण्याची प्रथा नाही, तर आपल्याच देशातील जनतेचीही दिशाभूल करण्यात येथील राजकारण्यांचा हात जगात कोणीच धरू शकत नाही. सफाईदारपणे खोटी आश्वासने द्यायची आणि आवामला सर्रास मूर्खात काढायचे, ही पाकिस्तानची जुनीच रीत. मग पाकिस्तानचे केंद्र सरकार असो वा तेथील प्रांतीय सरकारे, ‘झूट की फॅक्टरी’ तिथे २४ तास, ३६५ दिवस सुरूच असते. याचाच प्रत्यय नुकताच आला, जेव्हा पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम नवाझ यांनी समाजमाध्यमांवर एक खोटा दावा केला.
जागतिक कीर्तीचे विद्यापीठ असलेल्या ‘इम्पिरियर कॉलेज ऑफ लंडन’ लाहोरच्या ‘नवाझ शरीफ आयटी सिटी’मध्ये कॅम्पस सुरू करणार असल्याचे ट्विट नवाझ शरीफ यांच्या ‘पीएमएलएन’ पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आले. एवढेच नाही, तर कॅम्पससोबतच ३०० खाटांचे भव्य रुग्णालयही सुरू करणार असल्याची घोषणाही ऑनलाईन करण्यात आली. पण, ही बातमी वार्यासारखी पसरताच ‘इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन’ने मात्र हे सारे दावे सपशेल फेटाळून लावले. त्यामुळे पाकिस्तान, नवाझ शरीफ यांचा पक्ष आणि त्यांची मुख्यमंत्री कन्या तिन्ही तोंडावर आपटले आहेत.
‘इम्पिरियल कॉलेज लंडन’ हे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक आणि व्यवसाय (डढएचइ) अभ्यासक्रमांसाठी, तसेच त्यांच्या अत्याधुनिक संशोधन आणि नवोपक्रमासाठी जगभरात प्रसिद्ध. या क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देणारे जागतिक आघाडीचे विद्यापीठ म्हणून हे कॉलेज ओळखले जाते. पेनिसिलीनचा शोध लावणारे अॅलेक्झांडर फ्लेमिंग, नोबेल पुरस्कार विजेते पॅट्रिक ब्लेकेट, विज्ञानाधारित कादंबर्यांचे लेखक एच. जी. वेल्स, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी, मेघालयचे मुख्यमंत्री कोर्नाड संगमा, ‘टाटा समूहा’चे माजी अध्यक्ष सायरस मेस्त्री यांसारख्या दिग्गज मंडळींनी या कॉलेजमधून शिक्षणही घेतले आहे. यावरून या कॉलेजची महती स्पष्ट व्हावी. त्यामुळे अशा जागतिक नावलौकिकप्राप्त कॉलेजने पाकिस्तानसारख्या देशात स्वतंत्र कॅम्पसची घोषणा करावी, हेच मुळी न पचणारे. म्हणूनच कॉलेजनेही लगोलग असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे जाहीर करीत पंजाब सरकारच्या दाव्याचे खंडन केले आणि मरियम नवाझ तोंडघशी पडल्या. यामुळे ‘पीएमएलएन’चा पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करणारा अजेंडा मात्र पुन्हा एकदा सर्वांसमोर आला.
बलुचिस्तान असेल, पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तुनख्वा किंवा सिंध, पाकिस्तानातील सगळ्याच प्रांतांमध्ये पंजाब प्रांताला जे प्रारंभीपासून झुकते माप दिले जाते, त्याबद्दल प्रचंड रोष आहे. त्यातच आयटी सिटी आणि तीही नवाझ शरीफ यांच्या नावाने उभारण्याची घोषणाही लाहोरमध्येच करण्यात आली. लाहोर हे पाकिस्तानच्या राजधानीचे शहर नाही. एवढेच नाही, तर लाहोर ही पाकिस्तानची आर्थिक राजधानीही नाही, की कराचीसारखे समुद्रकिनार्यावरील बंदरही नाही. पण, तरीही आयटी सिटी, फिल्मसिटी, एज्युकेशन हब, बिझनेस हब म्हणून विकासासाठी लाहोरचीच निवड करण्यात आली.कारण, या प्रांतात सरकारही सत्ताधारी ‘पीएमएलएन’ पक्षाचेच आणि संपूर्ण पाकिस्तानवर नियंत्रण प्रस्थापित करणारा शरीफ बंधूंचा पक्ष असेल किंवा तेथील सैन्य हे सगळे पंजाबी मुस्लीमच.
त्यामुळे पाकिस्तानात आजवर झालेला विकासही कुठे एकवटला असेल, तर तो याच पंजाब प्रांतात. हा भेदभाव अन्य प्रांतीयांच्याही तितकाच नजरेत भरणारा. कारण, त्यांना विकासाच्या नावाखाली शरीफ घराण्याकडून दिली जातात, ती केवळ पोकळ आश्वासने! म्हणूनच अन्य प्रांतांतील नागरिकांनी पंजाबी पाकी सत्तेच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलेला दिसतो. तरीही नवाझ, शाहबाज आणि मरियम या शरीफांचे डोळे उघडले नाहीत. त्यामुळे आधीच ‘जेन-झी’च्या आंदोलनामुळे धुमसत असलेल्या जगातील कित्येक देशांमध्ये पाकिस्तानचे नावही जोडले जाण्याची शक्यता अधिक. त्यात ‘जेन-झी’ला फसवणारे असे दावे मरियम सरकारकडून वारंवार केले गेले, तर पंजाबमधील जनताही यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, हेच खरे!