मुंबई : ( Keshav Upadhyay ) ‘मुंबई आमचीच’ आणि ‘मुंबईकर आमच्याच पाठीशी’ असा कंठशोष उबाठाकडून सतत सुरू असतो. मुंबईच्या सातबाऱ्यावर आपलेच नाव आहे अशा तोऱ्यात वावरणाऱ्या उबाठाला प्रत्यक्षात मुंबईकरांनीच घरातून दारात आणून ठेवले आहे. थोडी आकडेवारी पाहिली तर उबाठाला लागलेली ओहोटीच स्पष्ट दिसते, असे म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाची पोलखोल केली.
केशव उपाध्ये म्हणाले की, "गेल्या पाच महापालिका निवडणूका पाहिल्यास, ११२ ते ११५ जागा बहुमतासाठी लागत असताना गेल्या ३० वर्षात उबाठाला बहुमत तर सोडाच, पण शतकाचा पल्लासुध्दा फक्त एकदाच गाठता आला. कसेबसे सत्तेपर्यत पोहचताना दमछाक होणाऱ्या या ढोंग्यांनी मागे वळून पुढील आकडेवारीकडे पाहायला हवे."
"गेल्या पाच निवडणूकांपैकी फक्त एकदा, १९९७ मध्ये ठाकरेच्या पक्षाचे १०० पेक्षा जास्त, जेमतेम १०३ नगरसेवक निवडून आले. हा गेल्या ३० वर्षांतील शिवसेनेचा उच्चांक असला तरी महापालिकेतील बहुमताचा पल्ला दूरच होता. त्यानंतर २००२ च्या महापालिका निवडणूकीपासून तर घसरण सुरूच आहे. २००२ ला ठाकरेंच्या पक्षाचा आकडा ९७ वर आला. २००७ च्या निवडणूकीत आणखी खाली येत ही सेना ८४ जागांवर आली तर मनसे ने ७ जागा जिंकल्या. २०१२ मध्ये उबाठा आणखी पाय खोलात गेला आणि जेमतेम ७५ जागा मुंबई महापालिकेत निवडून आल्या. मनसेने २७ जागा जिंकल्या होत्या," असे त्यांनी सांगितले.
आता लढायला ना सैनिक, ना जनता
"‘भाजपासोबत युतीत सडलो’ असे जाहीर विधान करत २०१७ मध्ये उध्दव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले खरे, पण नगरसेवकांची संख्या जेमतेम ८४ वर पोहचली. आज ज्या मनसेच्या प्रेमाचे भरते आले आहे त्याच मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक पळविले. म्हणजेच, कितीही वल्गना केल्या तरी उबाठा कधी ७५ ते ८५ नगरसेवकांपलीकडे जात नाहीत. तेही, भाजपासोबत असल्यामुळेच. आज बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदेंसोबत आहे. परवाच्या दसरा मेळाव्यातील रिकाम्या खुर्च्यानी स्पष्ट केले आहे की, आता लढायला ना सैनिक ना जनता सोबत," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....