वंचित-शोषित समाजबांधवांना संविधानाच्या मार्गाने सामाजिक न्याय मिळावा, म्हणून कार्यरत असलेल्या नाशिकच्या अॅड. गोरक्षनाथ चौधरी यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
"अण्णा, त्या माणसाने काहीच केलं नव्हतं. त्याला सोडून द्या. सगळं गाव बोलतं त्याने काहीच केलं नाही,” सात-आठ वर्षांचे गोरक्षनाथ त्यांच्या पोलीस असलेल्या बाबांना, म्हणजे अण्णांना म्हणाले. त्यावेळी अण्णा म्हणाले, "बाळा, आम्हाला तक्रारीनुसार कारवाई करावी लागते. तो गुन्हेगार आहे की नाही, किंवा त्याला इथून सोडवायचे अधिकार वकिलाचे आहेत.” अण्णांचे हे शब्द ऐकून त्यांच्या मुलाने, म्हणजे गोरक्षनाथ यांनी ठरवले की, वकील व्हायचे. तसेही, त्या आदिवासी पाड्यात जंगलातील झाड तोडले, अतिक्रमण केले अशा संशयावरून आदिवासींवर कारवाई व्हायची. त्यामुळे गोरक्षनाथ यांनी निश्चय केला की, वकील व्हावे आणि कोर्ट-कचेरी, पोलीस-चौकशीत पिचलेल्या समाजबांधवाना न्याय मिळवून द्यायचा.
तेच गोरक्षनाथ आज नाशिक शहरातले नामांकित वकील आहेत. आदिवासी समाजाचे वनहक्क दावे, ‘पेसा’ कायदा यांसाठी ते काम करतात. समाज अंधश्रद्धांना दूर करून समाजाने विज्ञानाची कास धरावी, यासाठी ते सातत्याने काम करतात. नोकर्यांमध्ये बोगस प्रमाणपत्र देऊन घुसलेले बिगर आदिवासींची घुसखोरी त्वरित थांबवावी, वनहक्क दावे निकाली काढून त्या वनजमिनी पूर्वीपासून कसत असलेल्या आदिवासींना द्याव्या, आदिवासी भागात लहान लहान धरणे बांधावी, आदिवासी क्षेत्रात रोजगारनिर्मिती करून त्यांचे स्थलांतर थांबवावे, यासाठी गोरक्षनाथ सातत्याने काम करतात. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ठेपणपाडा या आदिवासी पाड्यातल्या कोकणा समाजाच्या गोपाळराव चौधरी आणि गंगूबाई यांचे सुपुत्र गोरक्षनाथ. गोपाळराव हे पोलीस होते, तर आई गृहिणी. गोपाळराव हे हाडाचे समाजसेवक. ते वारकरी होते आणि कीर्तनातून ते समाजजागृतीही करत असत. चौधरी कुटुंबाच्या घरचे वातावरण धार्मिक होते. तसेच गोपाळरावांनी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घरी आणायचे. १५-२० मुले चौधरींच्या घरी शिक्षणासाठी राहायची. या सकस सामाजिक संस्कारामध्ये गोरक्षनाथ घडत होतेे. मात्र, गोरक्षनाथ अकरावीचे शिक्षण घेत असतानाच गोपाळराव हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले. एका क्षणात परिस्थिती पालटली. ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत गोरक्षनाथांनी पुढील शिक्षण कायम ठेवले. अण्णांची आणि त्यांचीही इच्छा वकील होण्याची होतीच. त्यानुसार त्यांनी ‘एमए’, ‘एलएलबी’, ‘डीएलएल’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करायचा, हे तर ठरलेले होतेच. अशातच, त्यांची भेट त्यावेळी चैतराम पवार यांच्याशी झाली. तेव्हा त्यांना ‘पद्मश्री’ सन्मान मिळाला नव्हता. गोरक्षनाथ यांनी त्यांना विचारले की, "दादा, मला समाजासाठी काम करायचे आहे. काय करू?” चैतराम म्हणाले, "तू ‘वनवासी कल्याण आश्रम’चे काम बघ. संपर्क कर. तुला कळेल की समाजासाठी काम करायचे, म्हणजे काय करावे लागेल.” त्यांचा सल्ला ऐकून गोरक्षनाथांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’शी संपर्क केला आणि आज ते ‘जनजाती सुरक्षा मंच’चे पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक आहेत.
आदिवासी समाजासाठी काम करताना त्यांना खर्या अर्थाने प्रेरणा मिळाली, ती त्यांच्या वडिलांकडून आणि दुसरे म्हणजे डॉ. मधुकर आचार्य यांच्याकडून. सुरगाणा येथे त्यांचा दवाखाना होता. ते निस्वार्थीपणे आदिवासी समाजाची आरोग्यसेवा करत. आचार्य जन्माने आदिवासी समाजाचे नव्हते. ते समाजासाठी आयुष्य वेचत असतील, तर आपण तर समाजात जन्मलो आहोत; आपणही समाजासाठी काम करायलाच हवे, असे गोरक्षनाथ यांना वाटले. त्यांनी निस्वार्थी आणि लक्षणीयरित्या समाजासाठी काम करणे सुरू केले.
काम करताना अनेक त्यांना प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यांपैकी एक ‘आपण आदिवासी आहोत, हिंदू नाहीत’ असे सांगणारे काही लोक त्यांना भेटले. त्यावेळी गोरक्षनाथ म्हणाले की, "माझे नाव गोरक्षनाथ. माझ्या बाबांचे नाव गोपाळराव आणि माझ्या मोठ्या भावाचे नाव राघव आणि आईचे नाव गंगा आणि आजीचे नाव सावित्री होते. जर आम्ही हिंदू नसतो, तर आमच्या पूर्वजांची नावे हिंदू देवदेवतांवरून कशी काय आहेत? दुसरे असे की, भगवान बिरसा मुंडा यांनी समाजाचे धर्मांतरण होऊ नये, म्हणून संघर्ष केला. ते आमचे आदर्श आहेत. ते कधीच म्हणाले नाहीत की, आदिवासी हिंदू नाहीत. मग आपण काय त्यांच्यापेक्षा महान आहोत का?” त्यांच्या या विधानावर समोरच्यांकडे उत्तर उरले नाही. आदिवासी समाजाचे जागरण करतात, म्हणून त्यांना धर्मांतरण करणार्या काही विघातक धमक्याही आल्या. पण, ते डगमगले नाहीत की थांबलेही नाहीत. त्यांचे समाजकार्य अविरत सुरू आहे. त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी अॅड. मयुरी यांची त्यांना उत्तम साथ आहे. ते म्हणतात, "समाजात उच्चशिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी, तसेच समाजाचे संस्कार, संस्कृती आणि धर्म टिकवण्यासाठी मी आयुष्यभर काम करणार आहे.” समाजासाठी आयुष्यभर काम करू इच्छिणारे अॅड. गोरक्षनाथ चौधरी हे समाजासाठी दीपस्तंभ आहेत.