साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या

24 Oct 2025 19:12:48
 
satara
 
सातारा : ( Satara ) फलटण उप जिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये आपल्यावर अत्याचार झाल्याचं लिहिले आहे. त्यात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहीलंय. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं चारवेळा अत्याचार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच आरोपी प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या अशी माहिती समोर अली आहे. मृत डॉक्टरच्या मृतदेहाच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यात पोलिस अधिकाऱ्याकडून अत्याचार झाल्याचं नमूद केलं आहे.
 
तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर वरिष्ठांचा दबाव असल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलं. पीडित महिला डॉक्टर ही मूळची बीडच्या वडवणी तालुक्यातील होती. तिच्या मृत्यूची बातमी समजताच गावात शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जो कुणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
 
गावाकडे शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे तिचे सर्व शिक्षण तिच्या चुलतीने बीडला केले. एमबीबीएस साठी प्रवेश मिळाल्यानंतर जळगावला तिचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले.
 
 हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर
 
महिला डॉक्टरवर पोलिसांचा आणि वरिष्ठांचा दबाव होता. पीडित मुलीने खोटी साक्ष द्यावी, त्यांच्या ऐकण्यातील काम करावे. यासाठी सतत तिच्यावर दबाव होता. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं. पोलिस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायपत्रे, पोलिस उपनिरीक्षक बदने अशी या पोलिसांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरुन गेला असून याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कडक कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये नावे असणाऱ्या पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
 
राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत या प्रकरणी फलटण सिटी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२), १०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे. मयत डॉक्टर यांचे शव विच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिले आहेत. पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0