शुचिर्भूत जीवन हीच संघाची शिकवण!

24 Oct 2025 10:08:57

Padmashri Vasudev Kamat
 
ख्यातनाम चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांनी आपल्या कला आणि संघकार्याच्या प्रवासाचा आत्मानुभव नुकताच ‘महाएमटीबी’साठी प्रा. गजानन शेपाळ यांनी घेतलेल्या व्हिडिओ मुलाखतीत उलगडला. कलेतून समाजाशी जोडलेपण, संस्कार आणि राष्ट्रीय विचार प्रकट करण्याची गरज त्यांनी या मुलाखतीत विशेषत्वाने अधोरेखित केली. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वासुदेव कामत यांच्या या विशेष मुलाखतीतील संघ संस्कारांच्या विचारदर्शनाचा हा संपादित अंश...
 
बालपणापासूनच माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. शाखेचा मुख्य शिक्षक, कार्यवाह म्हणून मी जबाबदारीदेखील पार पाडली आहे. संघ शिक्षा वर्ग म्हणून प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षदेखील माझे झाले आहे. परंतु, विस्तारक किंवा प्रचारक म्हणून जाण्यापेक्षा कलेसकट संघकार्य करता येईल का, याकडे माझा कल होता आणि तेच मला हवं होतं. याविषयी मी एकदा आमच्या कार्यवाहंशी बोललो. मन हलकं झालं. त्यानंतर मधला काही काळ या विषयावर त्यांच्याशी परत कधी बोलणं झालं नाही.
१९८१ मध्ये ‘संस्कार भारती’ची स्थापना झाली आणि मुंबईत १९९०-९२च्या सुमारास ‘संस्कार भारती’चे काम सुरू झाले. एका स्वयंसेवकाच्या माध्यमातून मला ‘संस्कार भारती’विषयी कळलं; तेव्हा ‘संस्कार भारती’च्या मुंबईतल्या बैठकीत मी आवर्जून उपस्थित राहिलो. संघाचे कला क्षेत्रातील हे काम असल्याने माझा पूर्ण कल ‘संस्कार भारती’कडे वळला. त्यानंतर पुढील अनेक वर्षे ‘संस्कार भारती’त काम केले. असे करता करता, एकेक जबाबदारी येत गेली. परंतु, ‘पद’ ही निव्वळ व्यवस्था असते, ती ‘अचिव्हमेंट’ नसते. पद कुठलेही असो, ती व्यक्ती कार्यकर्ता म्हणून कायम असली पाहिजे.
 
कला क्षेत्रामध्ये मी जे काही पाहात होतो की, आपल्याला कोणीतरी स्कॉलरशिप द्यावी; माझ्या कलेचे कोणीतरी प्रदर्शन भरवावे; आम्हाला कोणीतरी वर्कशॉपमध्ये घ्यावे; पण कलाकार हा स्वयंभू असतो, तो ‘मूडी’ असतो, अशा कितीही गोष्टी असल्या, तरी त्याच्यामध्येदेखील मी कार्य उभे करू शकेन आणि हे कार्य सर्वांना घेऊन उभे करू शकेन, हे जे संस्थाजीवन आहे, ते कलाकारात मुरणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ‘संस्कार भारती’मध्ये कलाकारांत कार्यकर्ता कसा तयार होईल, याकडे विशेषतः लक्ष दिले जाते. आपला जो राष्ट्रीय विचार आहे, तो विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कलेच्या माध्यमातून तो विचार प्रकट करू शकतो, मांडू शकतो. एखादा विचार दहा ठिकाणी जाऊन सांगणे आणि आलेल्या दहाजणांच्या कलेमधून तो विचार प्रकट करणे, हे जास्त संयुक्तिक आहे आणि म्हणून मी ‘संस्कार भारती’त आलो.
 
आपल्याकडे मनोरंजन हाच कलेचा उद्देश ठेवला जातो. कलेची निर्मिती केवळ मनोरंजनासाठी नाही, तर कुठल्याही कलेत सौंदर्य आणि मनोरंजन हे जात्याच असते. परंतु, मनःपरिवर्तन करण्याची क्षमता त्या कलेच्या विषयात येणे तितकंच महत्त्वाचं आहे, हे जाणून मग कला आपल्या संस्कृतीमध्ये जोपासली गेली आणि त्या दृष्टिकोनातून ‘संस्कार भारती’ काम करत आली आहे.
एक प्रसंग असा होता की, एकदा संघाच्या एका कार्यक्रमात माझा ’स्लाईड शो’ होता आणि त्यानंतर काही प्रश्नोत्तरे होती. त्यात मला एक प्रश्न विचारला गेला की, "तुमच्या कला क्षेत्रामध्ये तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात, असा परिचय दिल्यानंतर तुमच्याकडे कसं पाहिलं जातं? तुम्हाला कशी वागणूक मिळते?”
 
तेव्हा मी त्यांना एका वायात पहिलं उत्तर दिलं की, "मी कुठेही संघाचा स्वयंसेवक आहे, हा माझा परिचय देत नाही.” तेव्हा समोर बसलेल्या अनेकांच्या चेहर्‍यावर मला दिसायला लागले की, हे उत्तर योग्य नाही. परंतु, असे अनेक वेळा झाले आहे की, मला कोणीतरी येऊन म्हणतं की, "तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात का?” तर ‘हो... मी संघाचा स्वयंसेवक आहे,’ हा परिचय देण्यापेक्षा तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात का, हे समोरच्याला वाटणे फार महत्त्वाचे आहे. मी स्वयंसेवक आहे हा परिचय देणं, त्याऐवजी मी स्वयंसेवक आहे हे समोरच्याला वाटणं हे आपल्या वागणुकीवर आहे. ‘मी संघाचा आहे,’ म्हणून सांगायचे, परंतु वागणुकीत तसे काही दिसत नसेल, तर हे निव्वळ सर्टिफिकेट दाखवण्यासारखं आहे. त्यामुळे माझी चित्रे समाजमन दूषित करेल अशी होणार नाहीत, असा माझा कटाक्ष असतो.
 
‘I don't bother about society’ असा एखादा आमच्या इथला मोठा कलाकार म्हणतो, त्यावेळी मला फार वेदना होतात. तुम्ही समाजापासून वेगळे कसे होऊ शकता? तुम्ही समाजाचे अंग आहात. आपल्या वागणुकीमध्ये आणि आपल्या कामामध्ये सुद्धा ते दिसलं पाहिजे. तुमच्या चित्रात एक दिसतं आणि पडद्यामागचं वागणं वेगळंच दिसतं, याला काहीही अर्थ नाही. संघात हीच शिकवण दिली की, तुमचे बाह्य जीवन आणि वैयक्तिक जीवन हे शुचिर्भूतच असले पाहिजे. त्यामुळे डॉ. हेडगेवारांनी संघ आपल्या जीवनात उतरवायला शिकवला. ऋषिमुनी हे सर्व पूर्वी पुराणात, इतिहासात होते, आज ते प्रचारकांच्या रुपात पाहायला मिळतील. जे वर्तमानपत्रांत छापून येते किंवा विरोधक जे म्हणतात, ते संघात कधीही अनुभवाला आले नाही. त्यामुळे संघ समजण्यासाठी संघात जावे लागते. संस्कार कधीही कोणावर करता येत नाहीत, सहचर्यातून हे संस्कार होत असतात. सहचर्यातून एकत्र येणं हेच फार महत्त्वाचे आहे. चित्रातून संस्कार कसा देता येईल, हे पाहणं खर्‍या अर्थाने आवश्यक आहे.
 
 - वासुदेव कामत
(शब्दांकन : ओंकार मुळ्ये)
 
 
Powered By Sangraha 9.0