मुंबई : ( Amit Shah ) प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी तयार झालेल्या दोन अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. हा उदघाटन सोहळा दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे पार पडणार आहे, अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. हा उपक्रम राज्यातील समुद्री मत्स्यव्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन आढावा घेतला.
या बैठकीस मत्स्यआयुक्त किशोर तावडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच, मंत्री राणे यांनी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.24 रोजी माझगाव डॉक येथे जाऊन संपूर्ण तयारीची पाहणी ही केली. याप्रसंगी मत्स्यआयुक्त किशोर तावडे, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) कॅप्टन जगमोहन यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
इंडिया मेरीटाईम वीक संदर्भातही आढावा बैठक
भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी मुंबईतील NESCO एक्झिबिशन सेंटर येथे दिनांक २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान 'इंडिया मेरीटाईम वीक 2025' चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन 'इंडिया मेरीटाईम वीक २०२५' च्या आयोजनाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : मेट्रो ११ : मुंबईची दुसरी भूमिगत मार्गिका
मत्स्य शेतकर्यांना ही वीज सवलत
मत्स्यव्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू
राज्यातील मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे, राज्यातील मत्स्यव्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी दिलासादायक ठरणार आहे. मत्स्यव्यवसाय प्रकल्प एनएफडीबी अंतर्गत नोंदणीकृत मच्छीमार, मत्स्य संवर्धक, मत्स्य व्यवसायिक तसेच मत्स्यकास्तकारांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील मत्स्य व्यवसायिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. तसेच, मत्स्य क्षेत्रातील उत्पादन क्षमता आणि उत्पन्न वाढीसही हातभार लागणार आहे. या निर्णयाबद्दल मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे आभार मानले.