अंबरनाथ : ( Ambernath ) अंबरनाथ शहरात उभारण्यात आलेल्या भव्य धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरात सध्या नाट्यमहोत्सव सुरू आहे. नव्याने लोकार्पण झालेल्या या नाट्यगृहातील मोफत आयोजित केलेल्या दर्जेदार नाटकांना अंबरनाथसह पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, सर्व प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होत आहेत.
सुमारे ६५८ आसनक्षमता असलेले हे अद्ययावत नाट्यगृह अंबरनाथच्या सांस्कृतिक विश्वात एक नवी पर्वणी ठरले आहे. या नाट्यमहोत्सवामध्ये 'सही रे सही', 'करून गेलो गाव', 'आज्जीबाई जोरात', 'सखाराम बाईंडर', 'संगीत देवबाभळी', 'मी वर्सेस मी' यांसारख्या सध्या गाजत असलेल्या नाटकांचे प्रयोग मोफत आयोजित करण्यात आले.
हेही वाचा : मेट्रो ११ : मुंबईची दुसरी भूमिगत मार्गिका
अंबरनाथकरांचे शहरासाठी स्वतंत्र नाट्यगृहाचे स्वप्न गेल्या रविवारी पूर्ण झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण झाले आणि त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने येथे आठ दिवसीय नाट्यमहोत्सव सुरू झाला. या महोत्सवामुळे अंबरनाथ शहरासह नेरळ, कर्जत, बदलापूर आणि कल्याण तालुक्यातील रसिक प्रेक्षकही धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात गर्दी करत आहेत.
या महोत्सवाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना उत्कृष्ट कलाकृतींचा आस्वाद घेता येत आहे. या सर्व नाटकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. तसेच, येत्या शनिवार आणि रविवारी अनुक्रमे ‘पुरुष’ नाटक आणि ‘शिवबा’ हे महानाट्य पार पडणार आहे, त्यासाठीही रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सांस्कृतिक विकासाला चालना देणाऱ्या या नाट्यगृहाच्या उभारणीबद्दल रसिक प्रेक्षक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानत आहेत.