एकांकिका स्पर्धा, अभिनय, दिग्दर्शन यासोबतच समाजमाध्यमांवर आपल्या कलाकृतीमधून वेगळा विचार मांडणार्या विक्रांत आव्हाड यांच्याविषयी...
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें, कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें.” केशवसूतांच्या या ओळी वाचल्या की, भारतीय युवाशक्तीचं तेजोमय रूप चेहर्यासमोर येतं. आपल्या अवतीभोवती, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करणारी असंख्य तरुण मंडळी आपल्याला दिसतात. एका बाजूला स्वउत्कर्षासाठी, आकांक्षांच्या पूर्ततेसाठी दिवस-रात्र राबणारी तरुणाई आहे. परंतु, त्याचबरोबर समाजाचा विचार करत जगणारे, उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेत नव्या तंत्राची कास धरत कार्यरत असणारी अनेक मुलं-मुलीही आपल्याला अवतीभोवती बघायला मिळतात. समाजमाध्यमांवर आपल्या कलेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार विक्रांत आव्हाड यापैकीच एक.
कलाकाराला त्याची प्रतिभा जितकी घडवत असते, तितकाच त्याचा भवतालसुद्धा त्याला तयार करत असतो. विक्रांत आव्हाड यांच्या बालपणाकडे दृष्टी टाकल्यास असे लक्षात येते की, येनकेनप्रकारे त्यांचं बालपण त्यांच्यातील कलाकाराला वेगवेगळ्या अंगांनी विकसित करत होतं. मुंबईच्या चाळसंस्कृतीमध्ये लाखो माणसांच्या लाखो गोष्टी एकत्र नांदत असतात. प्रत्येक व्यक्तीचे संघर्ष निरनिराळे असतात. या संघर्षमधून तावून सुलाखूनच माणसं घडत असतात. अनेकदा कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याची वेळ विक्रांत यांच्यावर लहानपणापासूनच आली. आपण जिथे जिथे जातो तिथे ‘भाडोत्री’ असा आपला उल्लेख होतो, हे विक्रांत यांना खटकत असे. त्यामुळे हा शिक्का पुसून काढाव असे विक्रांत यांना कायमच वाटत असे.
इतक्या कमी वयामध्ये मोठ्या माणसांप्रमाणे गोष्टी करता येणे शय तर नव्हतेच. परंतु, विक्रांत यांच्या बालमनाने मार्ग निवडला, तो स्वत:ला कौशल्यातून स्वतःला सिद्ध करण्याचा. शिवजयंती, दसरा, दिवाळी होळी हे सण आपल्याकडे केवळ उत्सव म्हणून साजरा होत नाहीत, तर त्या उत्सवांना अधिष्ठान असतं ते सामाजिक एकतेचं, सांस्कृतिक कार्यक्रमांचं. एकपात्री नाट्यप्रयोग, चित्रकला, वक्तृत्व अशा वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून, विक्रांत यांनी त्यांच्यातील कलाकाराची चुणूक दाखवून दिली. ‘स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावलेल्या विक्रांत, किंवा हे विक्रांत यांचे आई-वडील’ अशी ज्यावेळेस त्यांची ओळख होऊ लागली, तेव्हाच त्यांचे समाधान झाले. वरवर साधी वाटणारी ही गोष्ट एक मुलगा इतया लहान वयात ओळख या गोष्टीचा किती खोलवर विचार करतो, यावर महत्त्वपूर्ण भाष्य करणारी आहे.
मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण करतानाच, शालेय जीवनापासूनच विक्रांत कलासक्त होत गेले. बालनाट्य, एकांकिका, एकापात्री प्रयोग, अशा वेगवेगळ्या कलाकृतींमधून त्यांच्या जीवनाची दिशा त्यांनी ठरवली. अशातच त्यांना त्यांच्या वडिलांकडून धडा मिळाला तो परीक्षणाचा, सातत्याने शिकत राहण्याचा. यशाला गवसणी घालताना बर्याचदा आपण आपल्या कामाचा आदमास न घेताच पुढे जातो. परंतु, तसं न करता, आपल्याला कुठल्या गोष्टींमुळे यश मिळालं, आपल्याला जे मिळालं त्यापेक्षा चांगलं काय आहे, याचा विचार आपण करायला हवा, याची शिकवण विक्रांत यांना त्यांच्या वडिलांनी दिली.
मुंबईच्या साठे महाविद्यालयामध्ये त्यांच्या याच कलागुणांना वाव मिळेल, अशी त्यांना आशा होती, त्याअनुषंगाने या महाविद्यालयात प्रवेश मिळवून, त्यांनी आपल्या कामाची झलक दाखवून दिली. संघर्षाच्या जोरावर स्वतःचं स्थान कमावणार्या विक्रांत यांच्याकडे जिद्द होतीच आणि मेहनत करण्याची तयारीही. अभ्यास, नाटक, लिखाण हे सारं काही जमवून आणण्यासाठी, विक्रांत तारेवरची कसरत करत असत. अशातच पराभवाचे काही चटके त्यांना सोसावे लागले, समतोल बिघडला, मात्र विक्रांत यांना हार मानली नाही. कलेच्या क्षेत्रामध्ये हेवेदावे, मानपमानाचे प्रसंग येतच असतात, शिकणार्याच्या भूमिकेत असलेल्या विक्रांत यांना सुद्धा ते चुकले नाहीत. परंतु, झालेल्या अपमानामुळे हवालदिल न होता, त्यांनी त्यांची ऊर्जा सृजनाकडे वळवली. या सृजनातूनच जन्माला आलेली संस्था म्हणजे ’आम्ही रंगकर्मी’. हौशी कलाकारांना एकत्र आणत, नाट्यसेवेसाठी तत्पर राहणारी ही संस्था काळाच्या ओघात अनेकांसाठी हक्काचं स्थान म्हणून उदयास आली आहे.
विक्रांत यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले ते शब्दांमुळेच. लहानपणापासून वेगवेगळ्या पुस्तकांच्या सहवासामध्ये वाढलेले विक्रांत, पुढे साहित्य विश्वामध्येसुद्धा स्वतःची वेगळी छाप निर्माण करण्यासाठी सज्ज झाले होते. युवा अवस्थेमध्ये प्रेमभंग आणि कविता या दोन गोष्टी अनेकांसाठी अटळ असतात. परंतु, कविता या साहित्य प्रकाराचा काळाच्या ओघात गांभीर्याने विचार करणारी माणसं तशी कमीच. काव्यलेखन करता करता, कविता लोकांसमोर पोहोचवण्याचं कामसुद्धा विक्रांत यांनी केलं.
‘पोएम कट्टा’ या आगळ्यावेगळ्या समूहाच्या माध्यमातून, काव्य रसिकांपर्यंत पोहोचण्याचे वर्तुळ मोठं झालं. इन्स्टाग्रामवर स्क्रोल करताना, अचानक आपल्याला विक्रांत यांची एखादी कविता ऐकायला मिळते, तर कधी त्यांचा एखादा कंटेंट आपल्या नजरेस येतो. बदलणार्या काळात कलाकारांनीसुद्धा बदलायला हवं, आपलं माध्यम शोधायला हवं असाच विचार यातून दिसून येतो. कंटेंटच्या जगामध्ये आपला आशय निवडणे आणि निवडलेल्या मजकुराचा दर्जा चांगला ठेवण्याचं काम कलाकारांनी केलं पाहिजे, असच मत विक्रांत व्यक्त करतात. विक्रांत आव्हाड यांच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या खूप खूप शुभेच्छा!