कल्याण : ( Subhash Bhoir ) जुना मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर कल्याणफाटा ते कळंबोली पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. उरण जे.एन.पी.टी. बंदरातून दररोज सुमारे वीस ते पंचवीस हजार कंटेनर, अवजड वाहने नाशिक, गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये येत - जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याच परिसरात लोकनेते दि. बा. पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गावरून भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला चार पदरी महामार्ग आठ पदरी करावा अशी मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून पत्राद्वारे केली आहे. त्यावर सकारात्मकता दर्शवून तातडीने प्रस्ताव तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी संबंधीताना सांगितले आहे.
हेही वाचा : मविआचे काय होणार हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही; केशव उपाध्ये यांची टीका
दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा एकमेव महामार्ग आहे. सदरचा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतो. सदरचा चार पदरी महामार्ग अपुरा पडत असून तो आठ पदरी केल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दूर होवून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या महामार्गावरून पुणे, मुंबई तसेच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावार वाहतूक होत असते.
या महामार्गावर अवजड वाहन बंद पडले अथवा अपघात झाला तर या महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे कल्याण फाटा ते कळंबोली महामार्ग आठ पदरी करण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांचा सतत पाठपुरावा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.