समर्थ समाजासाठीचे समर्थ संमेलन

23 Oct 2025 11:11:11

Samarth Sammelan
 
दि. १८ ऑक्टोबर रोजी कांती विसरिया हॉल येथे दीपावलीनिमित्त ‘समर्थ भारत व्यासपीठा’तर्फे ‘समर्थ संमेलन’ हे एक अनोखे संमेलन आयोजित करण्यात आले होते. ‘समर्थ भारत व्यासपीठ’ ही गत २४ वर्षांपासून कार्यरत असलेली संस्था. या संस्थेचे जे निरनिराळे प्रकल्प सुरू आहेत, त्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे वार्षिक स्नेहमिलन असे या संमेलनाचे स्वरूप होते. या लेखात समर्थ संमेलनाचा माागोवा घेतला आहे.
भारत समर्थ आणि संपन्न करायचा असेल, तर समाजातील अगदी खालच्या स्तरापर्यंत पोहोचायला लागेल. त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्यायला लागतील. याचसोबत समाज परिवर्तन हे केवळ भाषणे देऊन किंवा लेख लिहून होणार नाही, तर त्याचे प्रत्यक्ष कामाचे मॉडेल उभे करून दाखवावे लागेल आणि हे मॉडेल उभे करून दाखविण्याचे काम करण्याचे ‘दायित्व समर्थ भारत’ने केले. संघाचे प्रचारक, ‘भारतीय मजदूर संघ’, ‘स्वदेशी जागरण मंच’ यांसारख्या संस्थांमध्ये मूलभूत विचारांची मांडणी करणारे मुकुंदराव गोरे यांनी ही संस्था सुरू केली. सुरू केलेली ही संस्था आहे, ‘समर्थ भारत व्यासपीठ.’ सुरुवातीला समाजातील प्रश्नांचे मूलभूत संशोधन, अभ्यास आणि त्याची सरकारकडे मांडणी आणि पाठपुरावा करणे, असे ‘समर्थ भारत व्यासपीठ’च्या कामाचे स्वरूप.
 
मागील साधारण नऊ ते दहा वर्षांपासून समाजपरिवर्तनाची दिशादिग्दर्शन करणारे अनेकविध पथदर्शी उपक्रम असे कामाचे ढोबळमानाने स्वरूप. भटू सावंत या कार्यकर्त्याला सोबत घेऊन सुरू केलेल्या कामात अनेकजणांचा हातभार लागला. संस्थेचे सर्व संचालक वेळात वेळ काढून आपले योगदान देतात आणि म्हणून आज या कामाने एक विराट रूप धारण केले आहे, असे म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर समर्थ संमेलन या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल.
 
‘समर्थ भारत व्यासपीठ’ ही संस्था सिग्नल शाळा, प्रकल्प पुनर्निर्माण आणि व्यक्ती विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून वंचित आणि दुर्लक्षित समाजाला सशक्त आणि संपन्न बनविण्याचे ध्येय आणि लक्ष समोर ठेवून काम करते. ‘सिग्नल शाळा’ हा ठाण्याच्या तीनहात नाका रस्त्यावर भीक मागणार्‍या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा एक पथदर्शी प्रकल्प आहे. महाराष्ट्र सरकारने आता असे प्रकल्प महाराष्ट्रात राबवावे, असे धोरणही जाहीर केले आहे. सध्या संस्थेचा ठाण्याच्या प्रकल्पाव्यतिरिक्त नवी मुंबई येथे एक प्रकल्प सुरू झाला आहे आणि मुंबई येथे एक प्रकल्प सुरू होत आहे. या सर्व प्रकल्पांत त्यांना स्थानिक प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. ठाण्याच्या ‘सिग्नल शाळे’ने घडविलेले परिवर्तन अभूतपूर्व असेच म्हणावे लागेल.
 
भीक मागणारी मुलं आज स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत. समाजात त्यांना मानाचे स्थान मिळत आहे. भटू सावंत आणि सहकारी यांचे अथक प्रयत्न यामागे आहेत. यानंतर प्रकल्प पुनर्निर्माणामार्फत ‘वेस्ट मॅनेजमेंट’ क्षेत्रातही काम सुरू केले आहे. ठाण्यातील जवळपास दोन लाख घरांतून प्लास्टिक कचर्‍याचे संकलन, त्याचे सॉर्टिंग आणि रिसायकलिंग करणे असे या कामाचे स्वरूप. यानिमित्त अनेक कचरावेचक महिलांना सन्मानपूर्वक रोजगारसुद्धा मिळतो. तसेच, समाजात जागृतीचे कामसुद्धा मोठ्या प्रमाणात केले जाते. सध्या माहीमच्या खाडी स्वच्छतेचे मोठे काम हाती घेतले आहे. त्यातही स्थानिक समाजाला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात आले आहे.
 
प्लास्टिक रिसायकलिंगमध्ये ‘कार्बन क्रेडिट’साठी मान्यताप्राप्त असलेली ही भारतातील कदाचित एकमेव संस्था असेल. ‘व्यक्ती विकास प्रकल्पा’द्वारे निरनिराळ्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. त्यासाठी जवळपास ४० वस्त्यांमध्ये अभ्यासिका सुरू केल्या आहेत. त्यात एक हजाराहून अधिक मुले सहभागी आहेत. त्यांचा केवळ अभ्यास असे स्वरूप नसून संस्कार, खेळ, पालकांशी संवाद आणि त्यांना मार्गदर्शन आणि प्रत्येक वस्तीत दर महिन्याला वैद्यकीय तपासणी असेही आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुलं-मुली यांच्यासाठी निरनिराळ्या विषयांवर मार्गदर्शन करणे असाही प्रकल्प आहे. यासाठी दीपक दळवी यांच्या नेतृत्वात अनेक दादा-ताई हा प्रकल्प यशस्वीरित्या पुढे नेतात. ज्या वस्त्यांमध्ये या अभ्यासिका सुरू आहेत, तेथील मुले आणि पालक यांच्यात झालेले बदल हे अनुभवण्यासारखे आहेत.
 
मातृवंदना या ‘आयामा’अंतर्गत महिला सशक्तीकरणाचे प्रयत्न; त्या माध्यमातून महिलांना फळभाज्या विक्रीसाठी गाड्यावाटप आणि नुकतेच केलेले रिक्षावाटप तसेच, कचरा संकलनासाठी संस्थेने घेतलेल्या टेम्पोचे चालकत्वही काही महिला करतात. रिक्षा वाटपात तीन तृतीयपंथी भगिनींनाही रिक्षा दिल्या आहेत. त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा छोटासा प्रयत्न या संस्थेमार्फत केला जातो. असे अन्यही काही उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत.
 
अशा या सर्व प्रकल्पातील मुले, त्यांचे पालक आणि निरनिराळे लाभार्थी यांचे वार्षिक संमेलन काल झाले. या संमेलनात ‘पद्मश्री’ भिकुजी तथा दादा इदाते यांची उपस्थिती लाभली. त्यांनी भारत सरकारच्या ‘भटके-विमुक्त समाज मंडळा’चे बरीच वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले आणि आता नीती आयोगाच्या उपसमितीचे सदस्यही आहेत. अशा दादा इदाते यांचे अत्यंत प्रेरणादायी बहुमूल्य मार्गदर्शन या कार्यक्रमास लाभले.
 
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे निरनिराळ्या प्रकल्पातील मुलांचा आणि महिलांचा आनंददायी सहभाग, मुलांनी सादर केलेली नृत्य! कोण होती ही मुले? नवी मुंबई येथे ‘सिग्नल शाळा’ पाच महिन्यांपूर्वी सुरू झाली. तेथील पारधी समाजाच्या पाच-सहा वर्षांच्या लहान मुलांनी ‘आयगिरी नंदिनी’ या श्लोकावर अत्यंत सुंदर नृत्य सादर केले. तसेच, तिथल्याच अशाच पाच-सहा वर्षांच्या मुलांनी सादर केलेले शेपटीवाल्या प्राण्यांच्या सभेचे सादरीकरण केले. निरनिराळ्या पक्षी-प्राण्यांचे वेश घालून ही मुले कशी नाचत होती, यापेक्षा त्यांच्या चेहर्‍यावर जो आनंद ओसंडून वाहत होता, ते खरंच प्रेक्षणीय आणि डोळ्यात पाणी आणणारे होते. या मुलांना असे आपण कधी स्टेजवर उभे राहू याची कल्पनाच नसेल. त्यांना जो आनंद यातून मिळत होता, ते पाहणे हे खरंच शब्दांत वर्णन करता येणारे नाही. ठाण्याच्या ‘सिग्नल शाळे’च्या मुलांनी अत्यंत आत्मविश्वासाने सादर केलेली नृत्य तर लाजवाबच. निरनिराळ्या अभ्यासिकातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
 
निरनिराळ्या वस्तीमधील ही मुलं. ही मुलं आणि त्यांचे पालक या सर्वांच्या चेहर्‍यावर जो आनंद ओसंडून वाहताना दिसत होता, तोसुद्धा अवर्णनीय! दीपावलीचा आनंद म्हणजे आणखीन काय? माहीम खाडी स्वच्छता मोहिमेतील महिलांनी आणि ठाण्यातील रिक्षाचालक महिलांनी सदर केलेली नृत्य. यातही त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. सामाजिक समरसतेचे प्रत्यक्ष दर्शनच जणू या कार्यक्रमाने उपस्थितांना घडवून आणले. कार्यक्रम संपल्याची घोषणा केली गेली आणि सर्व मुलांनी उत्स्फूर्तपणे दिलेली घोषणा ‘भारतमाता की जय‘ आणि बरीच मुले व्यासपीठाजवळ येऊन मुकुंदराव गोरे यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत होती आणि त्यांना स्वतःच्या हाताने बनविलेली शुभेच्छा पत्र देत होती. समाजात प्रश्न बरेच आहेत; परंतु या अशा उपक्रम आणि प्रकल्पातून हिंदू संस्कृतीचा संस्कार आणि ‘हम सब एक हैं’ या विचाराला मूर्त स्वरूप देण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांचे दर्शन या कार्यक्रमातून ठळकपणे झाले.
 
या कार्यक्रमानिमित्त ‘समर्थ भारत व्यासपीठ’च्या मागे नेहमीच समर्थपणे उभे राहणार्‍या अनेक मान्यवरांपैकी काहीजणांचा ‘समर्थ सन्मान चिन्ह’ देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. संतोष पवार, जे पारधी समाजाच्या उत्थानासाठी काम करतात, त्यांची उपस्थिती लाभली होती. ‘समर्थ भारत सिग्नल शाळां’साठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांनीही त्यांचे विचार यानिमित्त मांडले, तेव्हा त्यांनाही अश्रू अनावर झाले होते. सर्व प्रकल्पातील उपस्थित मुलांना फराळ वाटपही करण्यात आले. सर्वांच्या सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. एक काव्य पंक्ती आठवते,
 
दिवे लागले रे दिवे लागले,
तमाच्या तळाशी दिवे लागले रे॥
 
‘समर्थ भारत व्यासपीठ’चे हे समर्थ संमेलन हे असेच तमाच्या तळाशी दिवे लावणार्‍या उपक्रमांपैकी एक असे म्हणावे लागेल. सर्वांत मुख्य म्हणजे हे दिवे लावण्याचा प्रयत्न करणारे असंख्य ‘जागले’ आणि त्यांचे सक्षम हात. या हातांना मनःपूर्वक धन्यवाद!
 
- अरविंद जोशी
 
Powered By Sangraha 9.0