Forest Owlet Conservation Day- वनपिंगळ्याच्या राजव्यापी गणनेची गरज

    23-Oct-2025
Total Views |
maharashtra forest owlet



मुंबई (अक्षय मांडवकर) -
संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट असणारा वनपिंगळ्याच्या राजव्यापी गणनेची गरज पक्षी अभ्यासकांनी बोलून दाखवली आहे (maharashtra forest owlet). 'इंटरनॅशनल युनियन फॉर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) लाल यादीनुसार या पक्ष्याची संख्या एक हजाराच्या घरात आहे (maharashtra forest owlet). मात्र, गेल्या काही वर्षात या पक्ष्याच्या अधिवासाचा झालेला विस्तार आणि संवर्धन-संरक्षणासाठी झालेले प्रयत्न पाहता या पक्ष्याची गणना करुन त्याचे पुन्हा मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे मत पक्षी संशोधकांनी मांडले आहे (maharashtra forest owlet).
 
 
महाराष्ट्रात पिंगळ्याच्या तीन प्रजाती सापडतात. त्यापैकी संकटग्रस्त असलेली एक प्रजात म्हणजे वनपिंगळा. वनपिंगळा म्हणजे दिनचर असलेली छोट्या आकाराच्या घुबडाची प्रजात. ब्रिटीश पक्षी अभ्यासक फ्रान्सिस रॉबर्ट ब्लेविट यांनी १८७२ साली त्याला शोधून काढले. मात्र, १९८४ नंतर मात्र हा पक्षी अधिकृतपणे सापडल्याचे निदर्शनात आले नाही. या पक्ष्याच्या शेवटच्या नोंदीनंतर तब्बल ११३ वर्षानंतर अमेरिकन पक्षी शास्त्रज्ञ पामेला रासमुसेन, बेन किंग आणि डेव्हीड अबोट यांनी १९९७ साली हा पक्षी पुन्हा शोधून काढला. त्यावेळी तो सापडला नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याच्या उत्तरेकडील जंगलामधून. त्यानंतर या पक्ष्याला 'आययूसीएन'च्या लाल यादीत 'नष्टप्राय' (क्रिटिकली एंडेंजर्ड) श्रेणीत नामांकित करण्यात आले. २००१ ते २००४ या काळात पक्षी संशोधक गिरीष जठार यांनी वनपिंगळ्यावर सखोल संशोधन केले आणि डॉक्टरेट पदवी मिळवली. २०१८ साली त्यांच्या पुढाकाराने 'आययूसीएन'च्या लाल यादीमधील वनपिंगळ्याची श्रेणी ही एक पायरी खाली म्हणजे 'संकटग्रस्त' (एंडेंजर्ड) या श्रेणीवर आणण्यात आली. आता पुन्हा या प्रजातीच्या मूल्यांकनाची गरज जठार यांनी बोलून दाखवली आहे.
 


२००४ साली जठार यांनी मेळघाटमधील केवळ दोन विभागातच केलेल्या गणनेत त्यांना १०० हून अधिक वनपिंगळे आढळून आले होते. त्यानंतर २०१४ साली वनपिंगळा हा रोहिदास डगळे आणि सुनील लाड यांना तानसा वन्यजीव अभयारण्यात सापडला. म्हणजेच सातपुड्यामधून त्याच्या अधिवासाचा विस्तार हा सह्याद्रीत झाला. त्यावेळी विभागाच्या संयुक्त विद्यमाने वनपिंगळ्याची गणना २०१६ साली तानसा वन्यजीव अभयारण्यात पार पडली. त्यावेळी त्यांना ४२ वनपिंगळे याठिकाणी आढळून आले होते. मात्र, त्यानंतर वनपिंगळ्याची गणना पार पडलेली नाही. गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये वनपिंगळ्याच्या अधिवासाचा विस्तार हा तानसाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झाला आहे. हा विस्तार पाहता वनपिंगळ्याच्या राज्यव्यापी गणेनबरोबरच त्यांना 'आययूसीएन'चे मूल्यांकन पुन्हा होणे आवश्यक असल्याचे
जठार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले.
 
 
 
अधिवासाचा विस्तार
सद्यपरिस्थितीत वनपिंगळा हा सातपुड्याच्या पर्वतरांगेपासून मेळघाट, नंदुरबार, नाशिकमधील पेठ, हरसुल, तानसा, गुजरातमधील डांगच्या जंगलात सापडत आहे. आता हा पक्षी तानसा वन्यजीव अभायरणाच्या बाहेर कल्याण नजीकच्या आंबिवली जैवविविधता पार्कमध्ये, जव्हारच्या जंगलात, माहुली किल्लाच्या जंगलात, शहापूरच्या जंगलात आणि मुरबाडच्या जंगलात सापडला आहे. आंबिवलीमधील नोंद ही 'आयनेचरवाॅच फाऊंडेशन'च्या मार्फत, शहापूर, माहुली, जव्हार येथील नोंदी पक्षीनिरीक्षक रोहिदास ढगळे यांच्या मार्फत, मुरबााड तालुक्यामधील नोंदी या शाहीद शेख यांच्या मार्फत करण्यात आल्या आहेत. वनपिंगळ्याच्या अधिवासाचा झालेला विस्तार पाहता त्याच्या संख्येतही वाढ झाल्याची शक्यता आहे.
 
 
वनपिंगळ्याच्या अधिवासाचा वाढलेला विस्तार पाहता त्याच्या राज्यव्यापी गणेनबरोबरच त्याचे 'आययूसीएन'चे मूल्यांकन पुन्हा होणे गरजेचे आहे. गणनेसाठी आपण 'पॅसिव्ह आॅडिटरी सर्वे' ही पद्धत अंमलात आणून आॅक्टोबर ते जानेवारी या महिन्यात सकाळी सहा ते दहाच्या सुमारास गणना करू शकतो. माझ्या मते, आता वनपिंगळा हा संकटग्रस्त राहिलेला नाही. या पक्ष्याच्या अधिवासाचा वाढलेला विस्तार आणि संवर्धन-संरक्षणासाठी झालेले काम पाहता त्याची श्रेणी संकटग्रस्त श्रेणीपेक्षा खाली उतरल्याची शक्यता आहे. - डाॅ. गिरीश जठार, उपसंचालक, सृष्टी काॅन्झर्वेशन फाऊंडेशन