मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईत प्रथम 'मुंबई बटरफ्लाय क्लब' या नावाने फुलपाखरांविषयी काम करणाऱ्या मंडळीने एकत्रित येऊन एका संघटित गटाची स्थापना केली आहे (Mumbai butterfly club). ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळेकर वाडी फुलपाखरु उद्यानात रविवार, दि. १९ आॅक्टोबर रोजी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात या क्लबचे अनावरण करण्यात आले (Mumbai butterfly club).
ठाण्यातील ओवळा गावात ओवळेकर वाडी फुलपाखरु उद्यानात आहे. या उद्यानात रविवारी 'मुंबई बटरफ्लाय क्लब'चे अनावरण करण्यात आले. क्लबचे संस्थापक डॉ. राजू कसंबे आणि फुलपाखरू उद्यानाचे मालक राजेंद्र ओवळेकर यांच्या नेतृत्वाखाली फुलपाखरू दर्शन फेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या दर्शन फेरीत सहभागींना महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मनसह अनेक प्रजातींची फुलपाखरे दिसली. सहभागींनी फुलपाखरांची अंडी, सुरवंट, कोश पाहण्याचा आणि त्याच्या नोंदी करण्याचा आनंद घेतला. तसेच इतर कीटकांबद्दल जाणून घेतले. फुलपाखरूप्रेमी संगीता जैन यांनी क्लबची संकल्पना मांडली. डॉ. कसंबे यांनी क्लबच्या उपक्रमात काय संकल्पना आहेत हे स्पष्ट केले.
याप्रसंगी कसंबे म्हणाले की, "पर्यावरण जागृतीसाठी फुलपाखरांचा फ्लॅगशिप प्रजाती म्हणून आपण वापर करु शकतो. आम्ही या क्लबच्या माध्यमातून फुलपाखरांच्या विविधतेवर लक्ष केंद्रित करून ट्रेल्स, चर्चा, वेबिनार आणि शिबिरे आयोजित करू." या कार्यक्रमातील सहभागींना के. जे. सोमय्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल पटवर्धन, फुलपाखरू संशोधक दिवाकर ठोंबरे, फुलपाखरू आणि वनस्पती चित्रकार आणि संशोधक परेश चुरी, राजेंद्र ओवळेकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पटवर्धन यांनी क्षेत्र सहलींच्या माध्यमातून जमा केलेल्या माहितीचे दस्तऐवजीकरण विविध पोर्टलच्या माध्यमातून करण्याची गरज यावर भर दिला. अशा प्रकारची मासिक बैठकीची मागणी सहभागींकडून करण्यात आली. सर्वांनी फुलपाखरांवर लक्ष केंद्रित करण्याची, नियमित कार्यक्रम आयोजित करण्याची आणि फुलपाखरांच्या विविधतेचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज व्यक्त केली आणि त्यावर सहमती दर्शविली. ओवळेकर आणि चुरी यांनी शहरी वस्त्यांमधील फुलपाखरु उद्यानाची निर्मिती, त्यामधील खाद्य वनस्पतींची लागवड यासंबंधी मार्गदर्शन केले.