मविआचे काय होणार हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही; केशव उपाध्ये यांची टीका

23 Oct 2025 13:33:07
 
Keshav Upadhyay
 
मुंबई : ( Keshav Upadhyay ) विरोधकांच्या कोणत्याही आघाडी-युतीला तत्व-विचार नसतो. केवळ भाजप विरोध या भूमिकेतून एकत्र आलेली हे पक्ष आहेत. तेव्हा या मविआचे काय होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
 
केशव उपाध्ये 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हणाले की, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ येतील तसतशा मविआतील लाथाळ्या समोर येऊ लागतील. ‘फेव्हीकॉल का जोड है’ नारा देत सुरू झालेला प्रवास आता ‘ये जोड नही लोड है’पर्यंत येऊन पोहोचला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर एकदा मुख्यमंत्री पद मिळाले, आता परत मिळणे शक्य नाही, त्यामुळे उध्दव ठाकरेंना काँग्रेसची गरज राहिलेली नाही. आता ‘संपलेला पक्ष’ अशी ज्यांची हेटाळणी केली तोच राज ठाकरेंचा पक्ष अस्तित्वापुरती साथ देऊ शकतो, असे वाटू लागले आहे. म्हणून दिल्लीवारीऐवजी आता शिवतीर्थावर फेऱ्या सुरू झाल्या आहे," असे ते म्हणाले.
 
 
उद्धव ठाकरेंना काँग्रेस नको
"उध्दव ठाकरेंना काँग्रेससोबत जायला नको आहे. त्याचे सुतोवाच ६ ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांनी केले होते. मविआ ही विधानसभेसाठी आघाडी होती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांसाठी वेगळा पर्याय असेल, असे ते म्हणाले. काल भाई जगतापांनी उबाठा सोबत न जाण्याची भूमिका मांडली. घोळात घोळ हे काँग्रेसचे वैशिष्ट्य असते. आता बिहारमध्ये एकाच मतदारसंघात दोघांना उमेदवारी देण्याचा नवा पराक्रम काँग्रेस पक्षाने केला आहे," असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.
 
 
Powered By Sangraha 9.0