प्रबोधनकार ठाकरे तलाव सुशोभिकरण कामांमुळे कोणतीही गैरसोय होणार नाही

23 Oct 2025 17:51:29

Kalyan
 
कल्याण : ( Kalyan ) कल्याण शहरातील ऐतिहासिक प्रबोधनकार ठाकरे तलाव (शेणाळे तलाव) परिसराच्या सुशोभिकरणामध्ये कोणाचीही गैरसोय होऊ देणार नाही अशी माहिती केडीएमसीचे उपआयुक्त संजय जाधव यांनी दिली. दरम्यान केडीएमसीच्या वतीने सुरू असलेले या तलावाचे आधुनिकीकरण आणि सौंदर्यवृध्दीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून नववर्षात नागरिकांना आणखी आकर्षक सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती जाधव यांनी दिली.
 
कल्याणचा मानबिंदू अशी ओळख असलेला हा प्रबोधनकार ठाकरे अर्थातच भगवा तलाव लवकरच नव्या रुपात नागरिकांसमोर येणार आहे. त्यादृष्टीने या परिसरात जलदगतीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र या तलाव परिसरात मार्निग वॉकसाठी येणारे नागरिक आणि काही राजकीय नेत्यांक डून तलावाच्या या सौंदर्यकरणाला विरोध होत आहे. या कामांमुळे तलावाचे सौंदर्य नष्ट होऊन अस्वच्छता पसरण्याची रास्त भिती या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
  
त्यावर महापालिकेकडून भूमिका स्पष्ट करताना असे सांगण्यात आले की मॉर्निग वॉकसाठी येणा:या नागरिकांचा मतांचा आम्ही नक्कीच आदर करतो. परंतु त्यांच्या जॉगिंग ट्रॅकच्या सुविधेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता आणि तलाव परिसराच्या सौंदर्याला कोणताही धक्का न पोहोचवता उर्वरित सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच याठिकाणी संध्याकाळाच्या वेळेस फिरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबांसह काही आनंदाचे क्षण घालवण्यासाठी येणा:या नागरिकांना आणखी चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, या दृष्टीकोनातून हे सौंदर्यीकरण केले जात असल्याची भूमिका उपआयुक्त संजय जाधव यांनी मांडली आहे.
 
हेही वाचा कल्याण फाटा ते कळंबोली आठ पदरी महामार्ग करा; माजी आमदार सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 
काय असणार सुविधा
 
नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेकडून बोटिंग सुविधा, फ्लोटिंग ब्रिज, फाऊंटन, कॅफेटेरिया, लेझर शो तसेच मुलांसाठी खेळण्याची जागा अशी विविध आकर्षणो उभारण्यात येत आहेत. तलावाभोवती व्यायामासाठी पाथवे, जॉगिग ट्रॅक, वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, प्रकाशयोजना आणि स्वच्छेवर ही विशेष भर देण्यात आला आहे. तसेच वाराणासी येथे बोटीमध्ये बसून गंगा आरती बघण्याची सुविधा आहे. त्याचधर्तीवर याठिकाणी देखील नागरिकांना बोटीत बसून लेझर शो आणि म्युङिाकल फाऊंटनचा आनंद घेता येईल.
 
 
Powered By Sangraha 9.0