_202510231258544487_H@@IGHT_350_W@@IDTH_696.png)
मॅाम, काल मी जिलेबी आणि लाडू बनवले. मोदी चहा बनवायचे, तर लोक त्यांचे कौतुक करतात. आता लोक माझेपण कौतुक करतील ना? काय म्हणालात? मी ज्या मिठाईवाल्याकडे जिलेबी आणि लाडू बनवले, त्या मिठाईवाल्याचे जे नाव आहे तेच मला मिळणार? पण, मिठाईवाल्याच नाव घंटेवाला होता. हं! लोकांना माझं कौतुकच नाही. जाऊ दे, आता बिहार निवडणुकीसाठी काम करतो. मागे मी लालूसोबत चंपारणी मटण करून दाखवलं होतं. आता लिट्टी चोखा बनवतो, असं दाखवलं पाहिजे. काय म्हणता, जिलेबी बनवा, लाडू बनवा, मटण बनवा की, लिट्टी चोखा बनव, लोकांना माझी बनवाबनवी समजली आहे? या निवडणुकीसाठी काय काय बहाणे करत असतो. ‘संविधान खतरे में हैं’ करून झालं, ‘ईव्हीएम’बद्दल बोललो, मतचोरीबद्दल ओरडतोय; पण काहीच होत नाही. बिहारमध्ये ‘अगडा पिछडा’ केल्याने, लोकांमध्ये फूट पडण्याची थोडी आशा होती पण, मोदी आणि भाजपने हिंदू-हिंदू करून लोकांना पुन्हा एकत्र आणले. हं, आता मजारीवर चादरी टाकणे आणि त्याआधी डोक्यावर जाळीदार टोपी घालणे आवश्यक झाले आहे. शास्त्रच असतयं ते! असं केलं तरच त्यांची एकगठ्ठा मत मिळतील. बाकी लालू काका आणि सगळे म्हणजे टाईम प्लिज भिडू आहेत. खरा सदाबहार नेता तर मीच आहे.
सदाबहारवरून आठवलं की, आमचे मुंबईतले कट्टर शिष्य आणि चाहते संजय राऊत आमच्याबद्दल म्हंटले होते, ‘आप आये बहार आये.’ तर ती बहार मीच आहे. आता बहार बिहारमध्ये फुलणार आहे. वा वा चांगले शब्द जुळले. माझे मुंबईतले नवे भाऊ उबाठा यांच्यासारखेच मीपण असे शब्द जोडू शकतो. हं, पण मी त्यांच्यासारखं बोलतो की तेच माझ्यासारखं बोलतात, याबद्दल जरा शंका आहेच. असू दे. त्यांचे आणि आमचे विचार एकच आहेत. आता तर काय, अल्लाला मानणार्या आमच्या मतदारावर तेही हक्क सांगतात. सध्या आमच्या या भावाने त्याच्या चुलत भावाला सोबत घेतले आहे. काय म्हणता, उबाठासोबत त्यांचे चुलतभाऊ आहेत आणि आम्हीही आहोत, म्हणूनच बिहारच्या निवडणुकीमध्ये बिहारी बाबू आम्हाला धम्मक लाडू देणार आहेत? धम्मक लाडू म्हणजे काय? काय म्हणता आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मुंबईकरही तसाच धम्मक लाडू देणार आहेत? ओके, म्हणजे आता धम्मक लाडू मिळायची वेळ झाली!
किन्नरांसाठीही न्याय व्हावा!
ज्योती माँ गुरू हा बांगलादेशचा बाबू आयान खान होता. त्याने भारतात ३० वर्षांपूर्वी घुसखोरी केली. त्याने बांगलादेशातील हजारो लोकांना, मुर्शिदाबादहून कोलकात्याला आणले. तिथे त्यांचे खोटे कागदपत्र तयार केले आणि पुढे त्यांना, मुंबईतील गोवंडी भागात वसवले. आरोपानुसार तो या लोकांकडून देहविक्री आणि इतर अवैध काम करून घ्यायचा. गोवंडी आणि परिसरात २० पेक्षा जास्त घरे त्याच्या नावावर आहेत. ज्योती माँ नावाने, त्यांने २०० बनावट तृतीयपंथी चेलेही तयार केले होते. या बाबूला पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडी परिसरात त्याचा आशीर्वाद घ्यायला लोकांची रांग लागे. भारतात राहणार्या घुसखोर बांगलादेशींची धरपकड करताना, पोलिसांना बांगलादेशी तृतीयपंथीही सापडले. त्यावरूनच या बाबू आयान खानचा थांगपत्ता लागला. नाहीतर, हा बाबू असाच ज्योती माँ बनून, कटकारस्थान करत बरबादी करत राहिला असता.
असो, या बाबू खानला पकडल्यानंतर कृष्णा अडेलकर या व्यक्तीने, ‘किन्नर माँ संस्था’ आणि संस्थेची अध्यक्ष सलमा खान यांच्यावरही आरोप केले की, बाबूची गुरू सलमा खान आहे आणि ही संस्था बांगलादेशी तृतीयपंथींना भारतात आणून वसवते. अर्थात त्याच्या आरोपातील सत्य पोलीस तपासतीलच. पण, त्यानंतर दहा तृतीयपंथींनी फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा अडेलकरमुळे तृतीयपंथी समाजाची आणि संस्थेची बदनामी झाली असे त्यांचे म्हणणे आहे. यावर संस्थेच्या अध्यक्ष सलमा खान यांनी म्हटले की, कृष्णा अडेलकर यांने वैयक्तिक आकसातून आरोप केले. आमची बदनामी केली, त्याला अटक व्हावी. आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्ही आंदोलन करू, ‘वी वॉण्ट जस्टीस.’ अर्थात सत्य काय आहे ते समोर येईलच. तृतीयपंथींवर अत्याचार करणार्यांना, त्यांना वेठीस धरणार्यांना कायद्याची कठोरातली कठोर शिक्षा होणारच आणि व्हायलाही हवीच. कारण, तृतीयपंथींचे जगणे म्हणजे दुःखाची परिसीमा, पशूपेक्षाही वाईट जगणे. अपमान, तिरस्कार याशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडत नाही. त्यामुळे या अशा शोषित-वंचित तृतीयपंथींच्या नावाने कुणीही गुन्हेगारी कृत्य करत असेल किंवा त्यांना वेठीस धरून गुन्हा करत असेल, तर त्याला कठोरातली कठेार शिक्षा व्हायलाच हवी.