मुंबई : (Chhath Puja) मुंबईतील छट पूजा उत्सवाच्या निमित्ताने मुंबई उपनगरचे सह पालक मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम हे महापालिकेकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी पाहणी दौरा करणार आहेत.
येत्या २७ आणि २८ ऑक्टोबर दरम्यान, मुंबई परिसरात छट पूजा (Chhath Puja) उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता जुहू चौपाटी इथून मंत्री लोढा आणि आ. अमित साटम यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर पुढे वरळी, जांबोरी मैदान आणि दक्षिण मुंबईतील बाणगंगा इथे सुरू असलेल्या तयारीचीही पाहणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Smart Highway : राष्ट्रीय महामार्गांच्या दर्जात सुधारणा होणार; स्मार्ट महामार्ग व्यवस्थापनाकडे वाटचाल
भाविकांसाठी कोणत्या सुविधा?
मुंबईत साधारण ६० ठिकाणी छट पूजा आयोजित करण्यात येत असून पूजा स्थळावर पिण्याचे पाणी, प्रकाश झोत, पूजेसाठी टेबल, वाहतूक नियंत्रण, शौचालये आणि महिला भाविकांना पूजेनंतर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या उभारण्यात येत आहेत. या सर्व सुविधांची पाहणी करण्यात येणार असून पूजा उत्सव समित्यांच्या प्रतिनिधींच्या काही सूचना असल्यास तात्काळ महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यावर उचित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. तसेच उत्सवादरम्यान भाविकांसाठी शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्तासह पूजास्थळी सीसीटीव्ही लावण्याची सूचना करण्यात आली आहे. यासंदर्भात मंत्री लोढा आणि अमित साटम पोलीस अधिकाऱ्यांशी या पाहणी दौऱ्यादरम्यान चर्चा करणार आहेत.