मुलांच्या जन्मदिनी काय करता येईल, याचा विचार करताना अनेकदा पार्टी मौजमज्जा वगैरे करूया असे ठरवले जाते. काही अंशी आनंदाच्या क्षणी मौज करणे ठीकही आहे. मात्र, जन्मदिन म्हणजे एक विशेष दिन आहे. या दिवशी आपण काय करायला हवे याचे नियोजन करणे हे आवश्यक आहे. जन्मदिनाच्या कार्यक्रमातून धर्मसमाज संस्कार पेरणे गरजेचे आहे. या सगळ्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.
जन्मदिनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आकर्षक सजावट होती. सगळे काही खर्चिक होते. भव्यदिव्य वाढदिवस होता. मात्र, त्या वाढदिवसाला विशेष सजावट केली हेाती. मोठ बॅनर लावले होते, त्यावर परदेशी बनावटीतले चेहरे जे रागावलेले आणि क्रूर होते, चित्रविचित्र पशूपक्षी मात्र त्यांच्याही चेहर्याचे भाव हिंस्त्र आणि पराकोटीचे द्वेष सांगणारे असे त्या बॅनरमध्ये होते. मुलाच्या जन्मदिनानिमित्त ही अशी चित्र का लावली असतील? यातून मुलांनी आणि उपस्थितांनी काय बोध घ्यावा? रडणे, चिडणे आणि हिंसात्मक भाव? काही लोक म्हणतील की मग काय झाले? जन्मदिनाच्या सोहळ्यात असलेली ती सजावट मनाला पटली नाही, आपण आपल्या पाल्यांच्या जन्मदिनाला अशा पद्धतीने बॅनर लावणे, म्हणजे आपण आपली संस्कृती सोडून विकृतीकडे वाटचाल करीत आहोत असे वाटते.
आपल्याकडे, बजरंग बली, श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज, देशभक्त क्रांतिकारक, अहिल्यादेवी, राणा प्रताप, देवी देवता, श्रीगणेशाच्या अनेक प्रकारच्या प्रतिमा असताना, आपणच आपल्या पायावर धोंडा मारतो, असे वाटते. अन्य धर्मीय अशा प्रकारे करताना दिसत नाहीत. जन्मदिनी असे मुखवटेही भेट, रिटर्न गिफ्ट म्हणून वाटले जातात. नव्या पिढीने यातून काय आदर्श घ्यावा? यासाठी आपल्याला काय करता येईल?
हा विचार करताना वाटते की, आपल्या वीरव्रत प्राप्त केलेल्या शूर जवान, क्रांतिकारी, देशभक्त यांचे मुखवटे वाटण्यासाठी प्रवृत्त करणे, गरजेचे वाटते. यामुळे त्यांना आपल्या संस्कृतीचे, देशभक्तीचे स्मरण राहील. याप्रसंगी छोट्या कथापुस्तिकांचे वाटप करावे. आजकाल रंगण्याची पुस्तके, रंगविण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातून त्यांना माहिती मिळेल, आपण काय रंगवत आहोत याचं आकलन होईल. आपल्या नवतरुणांना अशा प्रकारे उद्योग मिळू शकतो. अशा प्रसंगी कथाकथन, साहसी खेळ (बोध घेण्यासारखे) स्पर्धात्मक खेळ, घेण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित केले पाहिजे. संगीताद्वारे आपण हा विषय मुलांच्या मनावर बिंबवू शकतो. बालगीतांद्वारेसुद्धा अशा संस्कृतीचा प्रचार-प्रसार करू शकतो.लहानपणी जर असे देशसमाजपर संस्कार दिले, तर पुढची पिढी तशी नीतिमान निर्माण होईल. राष्ट्रभक्ती, वीरवृत्ती ही भावना मुलांच्या मनावर बिंबवणे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
दिवाळीची सुट्टी आहे. या सुट्टीमध्ये आमच्या सोसायटीत एका कुटुंबाने, सोसायटीमधील लहान मुला-मुलींना एकत्र आणले. मातीच्या दिव्यांना आकर्षक पद्धतीने रंगकाम करण्यासाठी, तसेच शुभेच्छा कार्ड बनविणे, कंदील बनविणे असा उपक्रम राबविला. त्या पणत्या, कंदील, कार्ड अशा वस्तूंची विक्री अशी एक सुंदर संकल्पना राबवली. उपक्रमाला सोसायटीमधील ज्येष्ठ मंडळींनी प्रतिसाद दिला. यातून आपली संस्कृती मुलांच्या मनावर ठासली गेली. एक सुंदर टीम वर्क या ठिकाणी कार्यरत झाले. अशी बरीच उदाहरणे आपण आपल्या मुलांना, पाल्यांनी त्यांच्या बालपणापासून शिकवल्या पाहिजेत. उद्याची पिढी यातूनच निर्माण होईल. त्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्राचा इतिहास समजून द्यावा. अन्यथा चुकीच्या पद्धतीने शालेय अभ्यासक्रमातून दिल्या जाणार्या ज्ञानार्जनात दिशाभूल होण्याचे कार्य आपण थांबू शकू. भारतीय संस्कृतीला उदाहरण देऊन बालमनावर रुजवत ठेवणे गरजेचे आहे. अनेक गोष्टी आहेत, ज्यातून आपली संस्कृती आणि संस्कार आपण संवर्धित करू शकतो. संस्कृती वाचली, तर आपला वर्तमानकाळ समृद्ध नीतिमान होईल. त्यासाठी तरी संस्कृती जपायलाच हवी.