फराळ - दिवाळीचा, कलेचा आणि साहित्याचा!

    23-Oct-2025
Total Views |

Let
 
दि. १५ ऑक्टोबर माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपल्या ‘लेट्स इमॅजिन’ने एक आगळावेगळा उपक्रम साजरा केला. पाड्यातील मुलांना दिवाळीच्या फराळासोबत साहित्याची मेजवानीही दिली गेली. त्या उपक्रमाची माहिती देणारा हा लेख...
रंग अन् ब्रश मुलांना खेळायला मिळाले की मुलं बराच वेळ गुंततात. त्यात पणती रंगविण्यासारखं काम मिळालं, तर काय मजा मजा. बहुदा ही मुलं पहिल्यांदाच असं काही करत होती. त्यामुळे खूप आनंदाने काम करत होती.” किशोर यांचा हा मेसेज. वाड्यातील ऐनशेत शाळेत नुकतीच किशोर यांची बदली झाली. मोज शाळेप्रमाणे या शाळेतही यावर्षी पणती रंगविण्याचा कार्यक्रम करूया, असे आम्ही ठरविले होते. ऐनशेत शाळेतील मुलांसाठी हा अनुभव खूपच नवीन होता. मुलंही खूप खूश होती. या कार्यशाळेची धुरा यावेळी आमचे ‘लेट्स इमॅजिन’चे तरुण प्रतिनिधी कावेरी आणि विवान यांनी सांभाळली. या दोघांसाठीही हा अनुभव नवीनच होता. परीक्षा संपली होती, त्यामुळे मुलं खूप खूश होती. त्यात अजून नवनवीन गोष्टीची भर पडली ती म्हणजे, लाडू, चिवडा, करंजी, चॉकलेट, चिक्की...स्वादिष्ट असा दिवाळीचा फराळ या मुलांना खायला मिळाला.
 
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दि. १५ ऑक्टोबर हा आपले भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपल्या ‘लेट्स इमॅजिन’ला यावर्षी काही देणगीदारांनी उपयुक्त अशी वाचनीय पुस्तकं दिली. ती पुस्तकं ऐनशेत शाळेतील मुलांना त्या दिवशी मिळाली. मग काय विचारता; कला, साहित्य आणि दिवाळी असा तिन्ही फराळांचा आस्वाद एकाच दिवशी घेता आला. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि निरागस हास्य बघितलं की, त्यामागे केलेली इतक्या दिवसांची धावपळ आणि प्रवासाचा क्षीण कुठल्या कुठे पळून जातो. यावेळी आलेला भूषणचा हा अनुभव. (या वेळेस फराळाच्या पॅकिंगचे काम भूषणच्या घरातील सर्व सदस्यांनी केले.)
 
१५ तारखेला परीक्षा संपणार म्हणून त्या दिवशी नेहमीप्रमाणे दिवाळीची कार्यशाळा काही शाळांमधून घेण्याचे ठरवले. सोबत देणगीदारांनी दिलेला दिवाळी फराळही द्यायचा होता. या खेपेस मी, ओमकार, मिहीर गेलो नव्हतो, तर यावेळी वाडा भेटीची आणि कार्यशाळेची पूर्ण जबाबदारी ‘लेट्स इमॅजिन’चे प्रतिनिधी भूषण आणि त्याच्या कुटुंबीयांनी घेतली होती. दि. १५ ऑक्टोबर म्हणजे मधलाच दिवस बुधवार होता. तरीही भयंकररित्या ट्रॅफिकमध्ये जवळपास पाच तास खोळंबल्यानंतर वाड्याला पोहोचले. नेहमीप्रमाणे मुलं वाट बघतच होती. कावेरीची ही पहिलीच भेट होती. तरी मुलांनी तिला आपलंस करून टाकलं, मजा-मस्ती करत पणती रंगवली, फराळाचाही आस्वाद घेतला. मोज शाळेतील आमचा अनुभव नेहमीच भारी असतो.
 
२०१९ सालापासून सातत्याने कोणतेही नवीन उपक्रम या शाळेत प्रथम संकल्पिले जातात आणि मग त्या अनुभवाने बाकी शाळेत ते राबविले जातात. ‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे,’ हा अनुभव मोज शाळेत आम्हाला नेहमीच येतो. त्यामुळे या शाळेतील मुलंच आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत, असं म्हणायला हरकत नाही. मोज शाळेनंतर भेट दिली ती किशोर यांच्या बदली झालेल्या शाळेत म्हणजेच जि. प. ऐनशेत शाळेत. या मुलांसाठी हा सगळा अनुभव नवीनच होता. कलेची कार्यशाळा, दिवाळी फराळ आणि या शाळेला दि. १५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकेही भेट दिली. तसेच, पुस्तकांचं वाचनही केलं. वेळेअभावी मनात असूनही भूषणला जास्त शाळांना भेट देता आली नाही. पण, आपला कला फराळ आणि साहित्य फराळ मात्र शाळांना पोहोचवता आला. जागतिक मराठी भाषा दिन साजरा करणार्‍या या शाळा वाचन प्रेरणा दिवस साजरा करून खर्‍या अर्थाने मराठी भाषेवर प्रेम करतात आणि ती परंपरा जोपासतात.
 
"मुलांसाठी आपण कलेक्शन केलेली पुस्तके अतिशय सुंदर आहेत, त्याबद्दल काहीच वाद नाही. मुलं स्वतःच्या आसपासच्या गोष्टी या पुस्तकांमध्ये बघायला मिळतात, म्हणून खूप आवडीने हाताळतात.” मुलांच्या हातात पुस्तके पडल्यावर किशोर यांचा हा मेसेज नकळतच खूप काही सांगून जातो. यावर्षी कला, साहित्य आणि दिवाळी या तिन्ही फराळांचा लाभ मुलांना घेता आला, यातच समाधान आणि अपार आनंद आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आणि आपल्या मराठी भाषेवरील प्रेम आणि अभिमान म्हणून प्रत्येकाने थोडे तरी योगदान दिले, तर या कला, साहित्य आणि दिवाळी फराळाचा आनंद दिवाळीनिमित्त अधिकाधिक द्विगुणित होईल यात शंकाच नाही.
शुभ दीपावली!
 
- पूर्णिमा नार्वेकर