पांढऱ्या रंगाच्या पाणटिवळ्याचे दुर्मीळ दर्शन; वसईतील 'या' पाणथळीवर दिसतोय पक्षी

    21-Oct-2025
Total Views |
 white black tailed godwit
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वसईतील एका पाणथळीवर ल्युकिस्टिक म्हणजेच पांढऱ्या रंगाचा काळ्या शेपटीचा पाणटिवळा (ब्लॅक टेल्ड गॉडवीट) पक्षी आढळून आला आहे (white black tailed godwit). वसईतील पक्षीनिरीक्षक डाॅ. रजनीश घाडी यांना या पक्ष्याचे दर्शन रविवार दि. १९ आॅक्टोबर रोजी झाले. हा पक्षी स्थलांतरी असून तो मध्य आशियातून दरवर्षी १० हजार किलोमिटरचा प्रवास करत मुंबई महानगरात येतो (white black tailed godwit). काळ्या शेपटीचा पाणटिवळा हा पक्षी दुर्मीळ नसला तरी ल्युकिस्टिक प्रकारातील या पक्ष्याचे दर्शन होणे, ही दुर्मीळ घटना आहे (white black tailed godwit).
 
 
सायबेरिया आणि रशियातून हजारोंच्या संख्येने ब्लॅक टेल्ड गॉडविट दरवर्षी हिवाळ्यात मुंबई महानगर प्रदेशात स्थलांतर करतात. मुंबईतील ठाणे खाडी, वसई खाडी, खारघर, भांडूप पंपिंग स्टेशन, टि.एस. चाणक्य अशा ठिकाणी ते प्रामुख्याने दिसतात. दरवर्षी, जुलै ते सप्टेंबर या दरम्यान हे पक्षी मुंबईत येतात आणि मार्च ते मे या कालावधीत हे पक्षी परतीचा प्रवास करतात. गेल्या महिन्यापासून काळ्या शेपटीचा पाणटिवळ्याचे थवे मुंबई महानगर प्रदेशातील पाणथळींवर दिसू लागले आहेत. अशा एका थव्यामधील पांढऱ्या काळ्या शेपटीचा पाणटिवळ्याचे दर्शन वसईतील पक्षीनिरीक्षक डाॅ. रजनीश कृष्णकांत घाडी यांना गोगटे मिठागर परिसरात झाले. याविषयी त्यांनी सांगितले की, "रविवारी गोगटे मिठागर परिसरात पक्षीनिरीक्षणाकरिता गेलो असता मिठागरात १० ते १२ च्या संख्येने काळ्या शेपटीचे पाणटिवळे पक्षी दिसले. त्यामधील एक पक्षी पांढरा होता. हा थवा लांबवर असल्याने पांढरा पक्षी हा बगळा असण्याची शक्यता जाणवली. मात्र, चोच मोठी वाटत असल्याने जवळ जाऊन निरीक्षण केल्यानंतर हा पक्षी पांढऱ्या रंगाचा काळ्या शेपटीचा पाणटिवळा असल्याचे समजले."


वसईतील गोगटे मिठागरामध्ये अनेक जातीचे स्थलांतरी पक्षी येतात. यापूर्वी २०२१ साली अशाच प्रकारच्या पांढऱ्या म्हणजेच ल्युकिस्टिक काळ्या शेपटीचा पाणटिवळा पक्ष्याचे दर्शन हे नवी मुंबईतील पाणथळीवर झाले होते. इतर पक्ष्यांसारखे हिवाळ्यातील कठोर तापमानाच्या स्थिती आणि अन्नाचा तुटवडा या समस्यांपासुन बचाव करण्यासाठी हे पक्षी दरवर्षी स्थलांतर करतात. या पक्ष्याच्या समावेश धोकाग्रस्त पक्ष्यांच्या यादीत होतो. हे पक्षी युरोपातील आईसलँडपासून ते रशियाचा पूर्वेकडील भागात प्रजनन करतात. तर, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये हिवाळ्यात स्थलांतर करतात. यापूर्वी मुंबईतील भांडुप उदच्चन केंद्रावर जीपीएस टॅग केलेल्या ब्लॅक टेल्ड काळ्या शेपटीचा पाणटिवळा पक्ष्याने ४७ दिवसांत मुंबई ते सायबेरिया आणि पाच दिवसांत पुन्हा सायबेरिया ते मुंबई असा आश्चर्यकारक प्रवास केला होता.


पांढरा रंग का येतो ?
वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. गुणसूत्रांमधील हे बदल त्याचे शारीरिक स्वरूप, वागणूक किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकतात. यामुळे वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंगही येऊ शकतो. शरीराचे रंग ठरवणारे 'मेलेनिन' रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णत: काळे होतात म्हणजेच मेलेनिस्टिक होतात, त्याचप्रमाणे 'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा रंगही येऊ शकतो. 'ल्युकिस्टिक' प्रकारात शरीर काळे किंवा पांढरे असले तरी, वन्यजीवांचे डोेळे नियमित रंगाचे असतात. 'अल्बिनो' प्रकारात डोळे लाल दिसतात. रत्नागिरीतील बिबट्याच्या पांढऱ्या पिल्लाचे डोळे अद्याप उघडलेले नसल्याने त्याच्या प्रकाराविषयी माहिती देता येणार नाही.