ज्या भारतीय राज्यात हिंदूंची लोकसंख्या ८७ टक्क्यांहूनही अधिक आहे, त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला दिवाळीच्या मनमोकळ्या शुभेच्छा देणेही जड जावे, यावरून द्रमुकच्या नसानसांत भिनलेला हिंदूद्वेषाचा दर्पच प्रकर्षानेअधोरेखित व्हावा.
तामिळनाडूतील हिंदूद्वेष्ट्या द्रमुकचे किस्से आणि कारनामे तसे अजिबात नवीन नाहीत. सनातन धर्माची तुलना डेंग्यूशी करून, त्यांच्या उच्चाटनाची विद्रूप भाषा करणारी ही राजकीय जमात! त्यामुळे मुळात ज्यांना हिंदू धर्माविषयी काडीचाही आदर नाही, ते हिंदूंच्या सण, उत्सव, परंपरांचाही सन्मान करतील, ही अपेक्षाच मुळी फोल ठरावी. दिवाळीनिमित्तानेही याचा काल पुनश्च प्रत्यय आला.
२०११च्या जनगणनेनुसार, तामिळनाडूची तब्बल ८७ टक्के लोकसंख्या ही हिंदूबहुल. पण, दुर्दैव हे की, राज्याच्या सत्ताधार्यांना हिंदू धर्माचीच पराकोटीची घृणा. इतकी की, द्रमुकचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे साध्या दिवाळीच्या शुभेच्छाही तामिळनाडूच्या जनतेला देण्यास कचरतात. त्यामुळे हिंदूद्वेषाचा जो वारसा, ई. व्ही. रामास्वामी, अण्णादुराई आणि करुणानिधींनी तामिळनाडूमध्ये विषासारखा भिनवला, त्याहीपेक्षा अधिक द्वेषमूलक वारसा आज मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि त्यांचे सुपुत्र, राज्याचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन त्वेषाने पुढे नेताना दिसतात.
खरं तर यंदाच नव्हे, तर दरवर्षीच स्टॅलिन कुटुंबीय दिवाळीच्या साध्या शुभेच्छा देण्याचेही औदार्य दाखवित नाही. त्यामुळे तामिळनाडूत उत्तर प्रदेश, दिल्लीसारखा भव्यदिव्य रोषणाईत दीपोत्सव वगैरे साजरा करणे तर दूरच. म्हणा, अशा हिंदूद्वेष्ट्यांच्या शुभेच्छा हव्यात तरी कोणाला? पण, इथे मुद्दा फक्त शुभेच्छांचा नाही, तर हिंदू धर्माप्रतिच्या कलूषित विचारांचाही आहे. नाताळ, ईदसह अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात, ते सण साजरे करण्यातही एरवी ‘निधर्मी’ म्हणून मिरवणारे स्टॅलिन कुटुंबीय अगदी आघाडीवर. परंतु, जिथे जिथे हिंदूंच्या सण-उत्सवाचा प्रश्न येतो, तिथे यांची जीभ जड पडते. म्हणूनच उदयनिधी स्टॅलिनने यंदा "ज्यांची श्रद्धा आहे, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!” असे म्हणत एका सार्वजनिक कार्यक्रमात तोंडदेखल्या शुभेच्छा दिल्या. वर अभिमानाने उदयनिधी म्हणतो, "मी व्यासपीठावर आल्यावर मला दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्या की देऊ नये म्हणून लोक गोंधळले होते. त्यांनी मला पुष्पगुच्छ, पुस्तकेही दिली; पण शुभेच्छा दिल्या नाही,” असे सांगून आपल्या हिंदूद्वेषी विचारांची समर्थकांमध्ये किती दहशत-दरारा आहे, याचेच हे ओंगळवाणे प्रदर्शन म्हणावे लागेल. पण, हे असले प्रकार तामिळनाडूमध्ये तसे नित्याचेच.
फक्त २०२३ साली जेव्हा उदयनिधीने हिंदू धर्माची डेंग्यू-मलेरियाच्या आजाराशी तुलना केली, तेव्हा त्याचा कडेलोट झाला. उदयनिधीविरोधात हिंदूंकडून देशभरात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आले. पण, दुर्दैवाने मागील महिन्यातच उदयनिधीला अनेक ‘एफआयआर’पासून सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण वाढवले आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणताही नवीन खटला पुढे जाऊ नये, असेही आदेश दिले. पण, या खटल्याच्या प्रारंभी सर्वोच्च न्यायालयानेही उदयनिधीला त्याच्या अश्लाघ्य टिप्पणीबद्दल खडे बोल सुनावले होते. सर्वोच्च न्यायालय उदयनिधीला म्हणाले होते की, "तुम्ही संविधानाच्या ‘कलम १९(१)(अ)’ आणि ‘कलम २५’ अंतर्गत तुमच्या अधिकाराचा गैरवापर करीत आहात. आता तुम्ही ‘कलम ३२’ अंतर्गत (सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा) तुमचा अधिकार वापरत आहात? तुम्ही जे बोललात, त्याचे परिणाम काय होतील, याची तुम्हाला कल्पना नाही का? तुम्ही सामान्य व्यक्ती नाही, तर तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला त्याचे परिणाम माहीत असलेच पाहिजेत.” परंतु, न्यायालयाच्या खडसावण्याचा असेल किंवा देशभरातून ‘एफआयआर’ दाखल केल्यानंतरही उदयनिधीने हिंदूंची माफी काही मागितली नाहीच आणि अशा अभद्र टिप्पणीनंतरही तो अजूनही मोकाट फिरत असून, एका राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, यापेक्षा दुर्दैवी ते काय म्हणा...
पण, आधी म्हटल्याप्रमाणे खाण तशी माती! द्रविड चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे ई. व्ही. रामास्वामी उर्फ ‘पेरियार’ हेदेखील असेच कट्टर हिंदूविरोधी आणि ब्राह्मणविरोधी होते. त्यांचाही हिंदू धर्मातील प्रथा-परंपरांना कडाडून विरोध होता. त्यांच्या आयुष्यातील एका घटनेवरून त्यांचा हिंदूद्वेष किती पराकोटीचा होता, याची प्रचिती यावी. रामास्वामी यांची बायको हिंदू तामिळ ब्राह्मण होती. त्यामुळे श्रद्धेने ती दररोज मंदिरात पूजाअर्चेसाठी न चुकता हजेरी लावत. हिंदूविरोधी रामास्वामी यांना ही बाब कदापि मान्य नव्हती आणि बायकोला आपले विचार सांगूनही पटत नाही, म्हणूनही त्यांचा तिच्यावर रोषही होता. तिला जन्माची अद्दल घडविण्यासाठी ती मंदिरात जात असताना, आपल्या चेलेचपाट्यांना ‘ती दासी आहे,’ असे सांगून तिची दररोज छेड काढायला सांगितले.
परिणामी, त्यांच्या बायकोचे मंदिरात जाणेही कायमचेच बंद झाले. कालांतराने त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. त्यानंतर वयाच्या ७०व्या वर्षी रामास्वामी यांनी ३२-३३ वर्षांच्या मुलीशीच लगीनगाठ बांधली, जी काहींच्या मते, त्यांचीच मानलेली मुलगी होती, असे सांगितले जाते. असे हे रामास्वामी केवळ भारतविरोधी, हिंदूविरोधी, ब्राह्मणविरोधीच नव्हते, तर तामिळविरोधीही मानले जातात. पण, तरीही ‘पेरियार’ म्हणून त्यांना द्रविड चळवळीचे उद्गाते मानले जाते, असा हा विरोधाभास. अण्णादुराईंनीसुद्धा ‘फक्त एकच देव, एकच वंश’ अशी घोषणा केली होती, तर उदयनिधीचे आजोबा करुणानिधींच्याही ‘हिंदू चोर आहेत’ या विधानाने तेव्हा एकच खळबळ उडाली होती.
एकूणच काय तर, इतर धर्मीयांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची, त्यांच्या प्रथांचा मानही राखायचा, सरकारी तिजोरीतून त्यांच्यासाठी खैरातही वाटायची; पण प्रश्न हिंदूंचा आला की, धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून, हिंदूद्वेषाची गरळ ओकायची, हीच या घराण्याची रीत! काँग्रेससह इतर सेक्युलर पक्षांचीही कमीअधिक प्रमाणात हीच गत. त्यामुळे काँग्रेसने आणि अन्य सेक्युलर पक्षांनीही स्टॅलिन कुटुंबीयांना ते दिवाळीच्या शुभेच्छा देणे हा टाळतात, असा सेक्युलर चष्म्यातूनच प्रश्न विचारावाच. पण, तसे होणे नाही. कारण, स्टॅलिन असो वा गांधी, हे एका माळेचेच मणी. परवा समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादवांनीही अयोध्येच्या दीपोत्सवासाठी सरकारी तिजोरीतून पैशांची उधळपट्टी करायची गरजच काय, असा सवाल केला, तो याच सेक्युलर मळमळीतून!
परंतु, हजयात्रेसाठी जेव्हा भारतीयांच्या कोट्यवधी कररुपी रकमेची उधळपट्टी केली गेली, तेव्हा हे सेक्युलरवादी कोणत्या बिळात तोंड खुपसून बसले होते? त्यामुळे हा या पक्षांचा ‘सेक्युलॅरिझम’ नसून ढळढळीत हिंदूविरोधच आहे, हे आजवर शेकडो प्रसंगांतून सिद्ध झाले आहेच. तेव्हा, आता तामिळनाडूच्या जनतेच्या डोळ्यांवरूनही द्रविड अस्मितेची हिंदूविरोधी पट्टी उतरून, स्टॅलिन घराण्याला जेव्हा सत्तेतून खाली खेचले जाईल, तोच खरा दक्षिण दिग्विजय!