सेवेचा तेजस्फुरण ‘राज’

    21-Oct-2025
Total Views |

Raj Vitthal Nanavare

देशभक्ती, समाजनिष्ठा आणि माणुसकीची खरी ओळख ज्यांच्या कार्यातून पटते, त्या मुंबईच्या राज विठ्ठल ननावरे यांच्याविषयी...
 
समाजासाठी स्वतःचा वेळ, मन आणि मेहनत असे सर्वस्व समर्पित करणे हे आजच्या काळात तसे दुर्मीळच. अशाच मूल्यांचे प्रतीक आहेत मुंबईतील राज विठ्ठल ननावरे. सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावातून मुंबईत स्थायिक झालेले हे व्यक्तिमत्त्व बालपणापासूनच संवेदनशील आणि कार्यशील राहिले. समाजासाठी काहीतरी करायचे, ही भावना त्यांच्यात अंगभूतच होती. शिक्षणकाळात मिळालेल्या मार्गदर्शनाने त्यांच्या आयुष्याला दिशा दिली. शिक्षक बाळकृष्ण नातू आणि समाजसेवक यजुर्वेंद्र महाजन यांनी दिलेल्या प्रेरणेने राज यांनी आयुष्याची वाट समाजकार्यासाठी वळवली.
 
राज ननावरे यांनी समाजातील विविध समस्यांवर काम करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांमध्ये सहभाग घेतला. आज त्यांच्या नावाशी असंख्य उपक्रम आणि संस्थांचे प्रवास जोडलेले आहेत. ‘ओम शिव साई प्रतिष्ठान’, ‘सायन फ्रेण्ड सर्कल’, ‘युनिक ब्लड मोटिव्हेटर फाऊंडेशन’, ‘कस्तुरी फाऊंडेशन’, ‘आदर्श स्टॉल लायसन्स होल्डर्स युनियन’ आणि ‘सहकार भारती, दादर जिल्हा’ या सर्व ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे, तर नेतृत्वगुणांनी परिपूर्ण संघटक म्हणून योगदान दिले.
 
रक्तदान हे त्यांच्या जीवनाचे ध्येय. आतापर्यंत तब्बल ४७ वेळा रक्तदान करणारे राज म्हणतात की, "रक्त न मिळाल्यामुळे एखादे आयुष्य विझू नये, एवढाच माझा हेतू आहे.” या विचाराने भारावून त्यांनी असंख्य तरुणांना रक्तदानासाठी प्रेरित केले. समाजात माणुसकी आणि जीवनमूल्यांची जपणूक करण्याचे काम त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून केले आहे. तसेच सामाजिक कार्य करताना त्यांनी व्यावसायिक स्टॉलधारकांच्या समस्यांकडेही लक्ष दिले. मुंबईतील स्टॉलधारकांना भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे, सर्वांना एकत्र आणणे आणि ‘आदर्श स्टॉल लायसेन्स होल्डर्स युनियन’ची स्थापना करणे, हे त्यांच्या कार्याचे ठळक उदाहरण. प्रत्येक स्टॉलधारकाच्या समस्येवर लक्ष देणे, निराकरणासाठी प्रयत्न करणे, हे राज आपले इतिकर्तव्यच मानतात.
 
सायन येथील ‘ओम शिव साई सहकारी गृहनिर्माण संस्थे’मधील अनेक अडचणींवर त्यांनी दहा वर्षे संघर्ष केला. समाजकंटकांचा विरोध, भांडणे, शिवीगाळ, हाणामारी, पोलीस ठाणे व न्यायालयीन कचेरी अशा अडचणी पार पाडून त्यांनी संस्थेच्या हितासाठी न डगमगता काम केले आणि प्रशासकीय यंत्रणेच्या आधारे तरुण आणि ज्येष्ठांना एकत्र आणून पारदर्शी प्रक्रियेने काम करणारे पॅनेल निवडून आणले आणि गेल्या साडेतीन वर्षांपासून सचिव पदावर कार्यरत आहेत. या काळात त्यांनी संस्थेच्या अनेक समस्या यशस्वीपणे सोडवल्या. २०२१ साली महाडमध्ये पूर आल्यावर त्यांच्या कार्याची खरी परीक्षा पाहायला मिळाली. २० वर्षे संपर्क नसलेल्या महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींना त्यांनी संपर्क साधला आणि ‘सायन फ्रेण्ड सर्कल’ टीमसोबत चर्चा करून मदत गोळा केली. आवश्यक वस्तूंची यादी तयार करून त्यांनी स्थानिक महाडच्या पूरग्रस्तांना मदत पोहचवली. रोगराई टाळण्यासाठी स्वच्छता मोहीम आणि औषध फवारणी केली. या उपक्रमातून मानवतेची खरी जाणीव, संघटित कार्य करण्याची क्षमता आणि राज यांचे योगदान प्रतिबिंबित होते. त्यांच्या या सर्व कार्याची दखल म्हणून त्यांना ‘रुग्णमित्र पुरस्कार’, ‘युनिक ब्लड मोटिव्हेटर्स’ ‘रुग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्थे’कडून प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या निःस्वार्थ प्रयत्नांचे कौतुक ठरला आणि समाजातील तरुणांसाठी प्रेरणास्रोतसुद्धा.
 
राज ननावरे यांचे जीवन शिकवते की, समाजासाठी कार्य करताना अडचणी, संघर्ष किंवा संकटे मोठी नाहीत. त्यांच्या दृष्टिकोनानुसार ‘मला समाजाने काय दिले,’ असा विचार न करता, ‘मी समाजासाठी काय करू शकतो,’ हाच विचार खरा आहे. या विचाराने त्यांनी समाजातील अनेक लोकांना मदत केली आणि आपल्यासोबत असलेल्या तरुणांमध्ये समाजकार्याची भावना रुजवली. राज ननावरे यांच्या मते, समाजात खरा बदल घडवायचा असेल, तर लोकांमध्ये परस्पर सहकार्य, प्रामाणिकता आणि विश्वासाची साखळी निर्माण होणे अत्यावश्यक आहे. ‘बिना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नहीं उद्धार’ या तत्त्वावर ते ठाम आहेत आणि त्याचे प्रत्यंतर त्यांच्या प्रत्येक उपक्रमात दिसते. समाजसेवा, रक्तदान, पूरग्रस्त मदत, आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरण किंवा सहकारी संस्थेतील नेतृत्व या सर्व क्षेत्रांत त्यांनी निःस्वार्थ भावनेने काम केले आहे.
 
‘अब भी जिसका खून न खौला, खून नहीं वो पानी हैं; जो देश के काम न आए, वो बेकार जवानी हैं,’ अशा विचारांनी प्रेरित होऊन ते समाजसेवेला आपले जीवनधर्म मानतात. आता सहकार क्षेत्रातून समाजाच्या विकासासाठी जनसामान्यांसोबत काम करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या मते, विकास केवळ सरकारी योजनांनी होत नाही; तो लोकांच्या सहभागातून, परस्पर सहकार्य आणि जबाबदारीच्या भावनेतून घडतो.
 
राज ननावरे यांचा प्रवास हे दाखवून देतो की, संघर्ष, निष्ठा आणि सेवाभाव यांचा संगम झाला, तर समाजात खरे परिवर्तन घडवता येते. आदर्श निर्माण करण्यासाठी मोठ्या पदाची नव्हे, तर मोठ्या मनाची गरज असते आणि ती प्रामाणिक मनोवृत्ती म्हणजेच राज ननावरे यांचा खरा परिचय आहे!
 
- सागर देवरे