येत्या काळात राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

21 Oct 2025 14:57:35
 
Chandrashekhar Bawankule 
 
मुंबई :  ( Chandrashekhar Bawankule ) महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत असून मागील काही महिन्यांमध्ये विविध लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. या माध्यमातून होत असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा महसूल विभाग येत्या काळात देशात सर्वोत्तम ठरेल," असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
 
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मागील काही महिन्यात मंत्रालयातील तसेच क्षेत्रीय पातळीवरील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी याचबरोबर जमाबंदी आयुक्त तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत यंत्रणेने सेवा पंधरवडा, वाळू धोरण, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे, तुकडेबंदी, जिवंत सातबारा, स्थानिक विषय आदींमध्ये प्रचंड काम केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण यंत्रणेचे कौतुक केले.
 
हेही वाचा :  Murlidhar Mohol : "मला राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव, पण मी...."; मुरलीधर मोहोळांचा गौप्यस्फोट!
 
नोव्हेंबर अखेरपर्यंत लिलाव प्रक्रिया पूर्ण करा
 
"सर्वसामान्यांना वाळू तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी वाळू धोरणाचे पालन करून नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व वाळू गटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करावी. मदत व पुनर्वसन विभागामार्फत आपत्तीग्रस्तांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या मदतीच्या निधीचे योग्य वितरण करावे. पुढील वर्षात नागरिकांच्या फायद्यासाठी महसूल विभागांतर्गत ज्या नियमांमध्ये, कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, त्या सुचवाव्या. विभागातील अनेक पदांच्या पदोन्नत्या झाल्या असून येत्या तीन महिन्यात विभागातील उर्वरित पदांच्या पदोन्नत्यांची प्रक्रिया पूर्ण होईल," असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपत्तीग्रस्तांच्या घरातही आनंदाचा एक दिवा पेटेल यासाठी सामाजिक जाणिवेतून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0