लक्ष्मीपूजनाची अर्थसमीकरणे

    21-Oct-2025
Total Views |

Lakshmi puja
 
दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा सण नव्हे, तर तो आर्थिक तेजाचा उत्सव. यंदाच्या वर्षी भारतात झालेली सोन्या-चांदीची विक्रमी विक्री त्याचेच यथार्थ उदाहरण! भारतातील विक्रमी खरेदीने जागतिक बाजारातही चांदीचा तुटवडा निर्माण झाला. तेव्हा चांदीच्या नांदीची ही अर्थसमीकरणे म्हणजे भारतभूमीवर लक्ष्मीदेवीच्या कृपाशीर्वादाचेच द्योतक...
 
भारताची अर्थसंस्कृती ही निव्वळ आर्थिक गणितांवर आधारित नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि व्यवहार यांच्याही समन्वयावर ती ठामपणे उभी आहे. दिवाळी हा सण म्हणजे त्या सांस्कृतिक अर्थव्यवस्थेचा उत्कर्षबिंदूच! लक्ष्मीपूजनाच्यानिमित्ताने केली जाणारी सोन्या-चांदीची खरेदी, वाहन व घरगुती वस्तूंवरील खर्च, नवीन गुंतवणुकींचा आरंभ हे सर्व धार्मिक कर्मकांड नाही; ते आर्थिक गतिमानतेचे सजीव संकेत ठरले आहेत. या वर्षीही देशभरात दिवाळीपूर्वकाळात व्यापारी उलाढालीचे नवे विक्रम प्रस्थापित झाले. ग्राहकांच्या हातात पैसा तर आहेच आणि त्यासोबत विश्वासही. या दोन गोष्टी एकत्र आल्या की, बाजार अपार तेजाने उजळतो. सोन्याची होणारी खरेदी ही भारतात केवळ गुंतवणूक नसून ती भावनिक सुरक्षिततेचे प्रतीकही आहे.
 
या वर्षीच्या दिवाळीत देशभरात सोन्याची खरेदी २० टक्क्यांनी वाढल्याचे ‘ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशन’ने सांगितले आहे. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, सूरत, जयपूर अशा प्रमुख बाजारांत दिवाळीच्या आधीच विक्रीचे उच्चांक प्रस्थापित झाले. सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर असतानाही, भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक केली. त्यामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे मानले जाते. एक म्हणजे, ग्रामीण उत्पन्नात झालेली वाढ आणि शेतीतील समाधानकारक हंगाम आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने होत असलेली पारंपरिक खरेदी ही होय. सोने हे आजही भारताच्या घराघरात आर्थिक सुरक्षेचे तसेच सुबत्तेचे प्रतीक मानले जाते.
 
या वर्षी मात्र दिवाळीत सर्वाधिक चर्चेत राहिली ती चांदी. एका अहवालानुसार, भारतात झालेल्या चांदीच्या अफाट खरेदीमुळे लंडनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तिचा तुटवडा निर्माण झाला. भारतीयांनी या दिवाळीत चांदीच्या दागिने, नाणी यांची अफाट खरेदी केली. त्याचवेळी औद्योगिक चांदीतही प्रचंड वाढ नोंद झाली. विशेष म्हणजे, भारतात एकट्या ऑटोबर महिन्यातच चांदीची मागणी २ हजार, ५०० टनांहून अधिक नोंद झाली. जागतिक मागणीच्या ती सुमारे ३५ टक्के इतकी आहे. लंडनच्या ‘बँकर्स असोसिएशन’ने म्हटले की, भारतातील सणाच्या कालावधीत वाढलेल्या मागणीने जागतिक बाजारपेठेतील सोने-चांदीच्या राखीव साठ्याला हादरा दिला. चांदीची मागणी वाढण्यामागेही काही ठोस कारणे आहेत. सोने महाग झाल्याने गुंतवणुकीसाठी चांदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसून आला. तसेच, औद्योगिक वापरात चांदीचा वाढता वापर (इलेट्रॉनिस, सौर पॅनेल्स) चांदीची मागणी वाढवणारा ठरला. तसेच, दिवाळीत धार्मिक मूल्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी चांदीची खरेदी ही प्राधान्याने होते.दिवाळीत चांदीला प्राप्त झालेली ही झळाळी केवळ परंपरेची नाही, तर ती जागतिक बाजाराच्या किमतीवर थेट परिणाम करणारी ठरली.
 
वाहन उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे. यंदाच्या वर्षी या उद्योगानेही विक्रमी वाढ नोंदवली. एका अहवालानुसार, दिवाळीपूर्व काळात देशात तब्बल ६.५ लाख नवी वाहने विकली गेली. यात दुचाकी वाहनांचा सर्वाधिक वाटा असला, तरी अलिशान चारचाकी गाड्यांच्या विक्रीतही वाढ नोंदवली गेली. ‘मारुती सुझुकी’, ‘टाटा’, ‘महिंद्रा’, ‘ह्युंदाई’, ‘टोयोटा’ या सर्व कंपन्यांनी विक्रीत तब्बल दहापट वाढ नोंदवली. ‘ईव्ही’ क्षेत्रातही मागणी वाढली. केंद्र सरकारने ‘जीएसटी’त जी कपात केली, त्याचा सर्वांत मोठा फायदा वाहन उद्योगाला होताना दिसून आला.
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कोणतीही वाढ केलेली नाही, किंबहुना त्यात मागील पतधोरण समितीच्या बैठकीत दिलासा देण्यात आला. रेपो दरात वाढ न झाल्याने कर्जदरात स्थैर्य असून, ‘ईएमआय’वर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे, ग्राहकांचा विश्वास वाढीस लागला असे म्हणता येते. तसेच, ‘जीएसटी’ कपात आणि विक्रेत्यांनी सणासुदीला ज्या विशेष सवलती जाहीर केल्या, त्या ग्राहकांना आकर्षित करणार्‍या ठरल्या. वाहन उद्योगातील ही तेजी उत्पादन, स्टील, टायर आणि पेट्रोलियम क्षेत्रांना पूरक ठरली आहे. या वर्षी केंद्र सरकारने अनेक क्षेत्रांत ‘जीएसटी’ दरात कपात करून सणासुदीच्या हंगामात खरेदीला चालना दिली. टू-व्हीलर पार्ट्स, इलेट्रॉनिक वस्तू आणि छोटे उपकरणे यावर झालेल्या दरकपातीमुळे बाजारात मागणी वाढली.
 
त्याशिवाय राज्य सरकारांनीही स्थानिक करांमध्ये सवलत देऊन विक्रीला चालना दिली. याचा परिणाम असा झाला की, किरकोळ बाजाराचा ऑटोबर विक्री निर्देशांक मागील वर्षाच्या तुलनेत ३१ टक्के वाढला. ग्राहकांच्या खिशात जास्त पैसा राहिला आणि उद्योग क्षेत्राला अपेक्षित गती मिळाली. ही संतुलित वित्तीय धोरणाची यशस्वी उदाहरणे ठरली आहेत. दिवाळीची खरेदी ही केवळ शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. या वर्षी ग्रामीण भागातही सोने, चांदी, कपडे आणि दुचाकी खरेदीत मोठी वाढ नोंदवली गेली. देशभरात मान्सून चांगला झाल्याने, कृषी उत्पादनात झालेली वाढ, पिकांच्या किमती स्थिर राहिल्याने ग्रामीण भागातील उत्पन्नात लक्षणीय वाढ नोंद झाली. म्हणूनच, ग्रामीण भागातील वाढलेल्या मागणीने ग्राहक क्षेत्रालाही नवा वेग दिला. ब्रिटानिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, गोदरेज यांसारख्या कंपन्यांनी सांगितले की, या दिवाळीत ग्रामीण भागात झालेली विक्री ही शहरी भागाइतकीच आहे.
 
भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत सर्वत्र चैतन्य आल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
दिवाळीचा सण हा भारतीय ग्राहकांसाठी चार पैसे खर्च करण्याचा असतो. हा दीपोत्सव म्हणूनच ग्राहकांच्या विश्वासाचा उत्सव असतो. या वर्षीचा अनुभव हे सांगतो की, देशातील आर्थिक स्थैर्य आणि रोजगारनिर्मितीमुळे ग्राहक अधिक आत्मविश्वासाने पैसे खर्च करत असून, युपीआय पेमेंट्स, डिजिटल व्यवहार आणि ई-कॉमर्स या सर्वांनी व्यवहार प्रक्रियेला पारदर्शकता दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षांत डिजिटल इन्फ्रास्ट्रचरला जी मजबुती दिली, त्यामुळे अर्थव्यवस्था अधिक औपचारिक झाली आहे. त्यामुळे कर संकलनही वाढले आहे आणि अर्थचक्राला वेगही लाभला आहे.
लक्ष्मीपूजन हा केवळ धार्मिक उपचार नाही, तर तो आर्थिक सक्षमीकरणाचा उत्सव आहे, असे म्हणता येते.
 
या सणानिमित्ताने भारतीयांनी दाखवले की, विश्वास, उत्पादन आणि उपभोग हे अर्थव्यवस्थेचे त्रिसूत्री संतुलन अजूनही सुदृढ आहे. दिवाळीच्या खरेदीचा हा केवळ झगमगाट नाही; तर ती देशाच्या अर्थशक्तीचा आरसा म्हणून समोर आली आहे. ग्राहकांचा आत्मविश्वास, व्यापाराचे चक्र आणि सरकारी धोरणे यांची ही सांगड भारताच्या वाढीच्या कथेला नवा अर्थ देणारी ठरली आहे. दिवाळीने यंदा अर्थव्यवस्थेला नवा प्रकाश दिला असून, सोन्या-चांदीचा झगमगाट, वाहन बाजारातील उभारी, ‘जीएसटी’ कपातीचा प्रभाव आणि ग्रामीण अर्थचक्राला लाभलेली गती, या सर्व घटकांनी मिळून नव्या भारताचा उत्सव साजरा केला आहे. चांदीच्या जागतिक तुटवड्याने हे सिद्ध केले की, भारतीय ग्राहक आता जागतिक अर्थव्यवस्थेतील निर्णायक शक्ती झाले आहेत. दिवाळीचा प्रकाश भारताच्या अर्थव्यवस्थेच्या चेहर्‍यावर लखलखीतपणे झळकतो आहे, हाच या दीपोत्सवाचा तेजोमय संदेश!