केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरातील सोनेचोरी प्रकरणामुळे, मंदिराच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी एक प्रमुख आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी याच्यावर मंदिरातील द्वारपालांच्या मूर्तींवर जो सोन्याचा मुलामा दिला आहे, त्यातील सोने चोरल्याचा आरोप आहे. तेव्हा, हे नेमके प्रकरण आणि केरळच्या डाव्या सरकारची भूमिका यांचा आढावा घेणारा हा लेख..
केरळमधील शबरीमला हे देवस्थान हिंदूंचे श्रद्धास्थान! केरळमधील अन्य मंदिरांप्रमाणे या मंदिराचा कारभारही शासनाच्या प्रभावाखालील व्यवस्थापनाकडून चालविला जातो. काही वर्षांपूर्वी या मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश दिला जावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निर्णयाविरुद्ध हिंदू समाजाने प्रदीर्घ काळ आंदोलन केले होते. त्या मंदिराची परंपरा तोडणारा निर्णय दिल्याबद्दल केरळमधील हिंदू समाजात संतापाची एकच लाट उसळली होती. स्वतःला पुरोगामी म्हणविणार्या काही महिलांनी आंदोलन करून मंदिरात घुसखोरी करण्याचे नाटक करून पाहिले. पण, या मंदिराची जी शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे, ती तोडण्याचा डाव हिंदू समाजाने हाणून पाडला!
आता तेच शबरीमला मंदिर एका अन्य कारणासाठी पुन्हा चर्चेत आहे. आता या मंदिरातील काही मूर्तींना आणि गर्भगृहाच्या दारांना जो सोन्याचा मुलामा देण्यात आला होता, त्यातील काही सोने लुटण्यात आल्याचे उघड झाले आहे. या सोन्याची लूट करण्याच्या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी याच्यावर या मंदिरातील द्वारपालांच्या मूर्तींवर जो सोन्याचा मुलामा दिला आहे, त्यातील सोने चोरल्याचा आरोप आहे. या सोने चोरीप्रकरणी त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या अन्य नऊजणांवर आरोप ठेवण्यात आला आहे. यामध्ये माजी प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी बोर्डाचे सचिव,तिरुवभरणमचे दोन माजी आयुक्त आदींचा समावेश आहे.
या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने लक्ष घातले असून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत. तसेच, यासंदर्भात ‘त्रावणकोर देवस्वोम बोर्डा’चे माजी अध्यक्ष ए. पद्मकुमार यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कट करणे, लूट करणे, फसवणूक करणे आदी गुन्हे त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आले आहेत. द्वारपालांच्या मूर्तींवरील सोन्याचा मुलामा केलेला पत्रा; तसेच गर्भगृहाच्या दरवाजाचे सोन्याचा मुलामा दिलेले पत्रे चोरल्याचा या सर्वांवर आरोप आहे.
शबरीमला मंदिरातील ४७५ ग्रॅम सोने बेपत्ता झाल्याचे आढळून आले. सोन्याचा मुलामा देण्याचे काम ‘स्मार्ट क्रिएशन’ या कंपनीला देण्यात आले होते. या कामासाठी शबरीमलाकडून केवल तांब्याचा पत्रा पाठविण्यात आला होता. त्यावर एक ग्रॅम इतकाही सोन्याचा मुलामा नव्हता, अशी माहिती त्या कंपनीच्या वकिलांनी दिली. सोन्याचा अन्यत्र मुलामा दिलेले कोणतेही काम ही कंपनी करीत नाही, असेही त्या वकिलांकडून स्पष्ट करण्यात आले. मुलामा देण्यासाठी जे सोने देण्यात आले होते, त्यातील जवळजवळ अर्धा किलो सोने उन्नीकृष्णन पोट्टी आणि त्याच्या साथीदारांकडून लंपास करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हा तपास केला जात असताना आणखी एक घटना पुढे आली आहे. सध्या लंडनमध्ये असलेल्या विजय मल्या याने या देवस्थानास ३० किलो सोने आणि १ हजार, ९०० किलो तांबे दिले होते. मंदिराचे छत आणि द्वारपालांच्या मूर्ती सोन्याने मढविण्यासाठी हे सोने आणि तांबे देण्यात आले होते. मल्ल्या याने १९९८ साली जे सोने दिले होते, त्या सोन्याचे २०१९ साली तांबे कसे काय झाले, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. या सर्व सोने व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे गहाळ झाली असल्याचे प्रारंभी सांगण्यात आले. पण, ती कागदपत्रे देवस्थानच्या एका अन्य विभागात सापडली. त्याद्वारे विजय मल्ल्या याने दिलेल्या सोन्याचे नेमके काय झाले, याचा उलगडा होऊ शकेल.
या सर्व प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने लक्ष घातले असल्याने मंदिराच्या सोन्याची चोरी करणार्यांमध्ये कोण कोण सहभागी होते, ते जनतेपुढे येईल. तसेच, केरळमधील देवस्थानांवर सरकारचा अधिकार असल्याने सरकारच्या आशीर्वादाने ही सोने चोरी होत होती का, हेही तपासात पुढे येईल.
केरळमधील विविध देवस्थानांच्या मंडळावर सरकारने नेमलेले लोक आहेत. त्यातील अनेक नास्तिक आहेत. त्यांना हिंदू धर्माचे काही सोयरसुतक नाही. तरीही ते मंडळांवर आहेत. केरळमधील देवस्थाने सरकारच्या जोखडातून मुक्त करण्यात यावीत, अशी तेथील हिंदू समाजाची मागणी आहे. या मंदिरांचा कारभार सरकारी तावडीतून मुक्त झाला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. शबरीमला मंदिरातील सोन्याची जी चोरी झाली, त्यामागे नेमके कोण होते ते तपासातून पुढे येईल. पण, अशा घटना तेथील डाव्या सरकारच्या नेत्यांच्या वरदहस्ताशिवाय घडू शकणार नाहीत, हे तितकेच खरे आहे. त्यामुळे तेथील देवस्थानेही सरकारी जोखडातून मुक्त व्हायलाच हवीत.
अयोध्या दीपोत्सव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये
अयोध्यानगरीमध्ये आयोजित दीपोत्सवाची सर्वत्र चर्चा होत आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या घाटांवर सर्वाधिक पणत्या प्रज्वलित करण्याचा विक्रम या दीपोत्सवाने केला आहे. या दीपोत्सवानिमित्ताने शरयू नदीच्या दोन्ही किनार्यांवर असलेले घाट असंख्य दिव्यांनी उजळून निघाले होते. उत्तर प्रदेश सरकारचा पर्यटन विभाग आणि अयोध्या जिल्हा प्रशासनाने या दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या दीपोत्सवात २६ लाख, १७ हजार, २१५ इतके दिवे लावण्यात आले होते. या लक्ष लक्ष दिव्यांनी तो सर्व परिसर उजळून निघाला होता. या दीपोत्सवात लक्षावधी दिवे लावल्याबद्दल ‘गिनीज वर्ल्ड रेकोर्ड’ने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोन प्रमाणपत्रे नव्याने दिली आहेत. जागतिक पातळीवर उत्तर प्रदेशची जी नवी ओळख झाली आहे, त्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेला धन्यवाद दिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आधी जी विरोधी सरकारे होऊन गेली, त्यांनी अयोध्येचे आध्यात्मिक महत्त्व जाणले नाही. तसेच, रामभक्तांच्या भावनांचा अनादर केला, अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. अयोध्येतील प्रजापती आणि कुंभार समाजाने अत्यंत परिश्रम करून या महोत्सवासाठी दिवे तयार केले, याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आवर्जून केला. या महोत्सवानिमित्ताने नेत्रदीपक अशा लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते.
पाकिस्तान क्षेपणास्त्रांची नावे बदलणार?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे पाकिस्तानमधील जनतेकडून क्षेपणास्त्रांची नावे बदलण्यात यावीत, यासाठी दबाव येत आहे. अफगाणिस्तानने अलीकडेच केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे जबर नुकसान झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानने ‘गझनवी’, ‘घोरी’ आणि ‘अब्दाली’ अशी जी अफगाणी नावे आपल्या क्षेपणास्त्रांना दिली आहेत ती बदलावीत, यासाठी दबाव येत आहे. या सर्व अफगाणी आक्रमकांनी भारतावर वारंवार हल्ले केले होते. पाकिस्तानने त्यांची नावे आपल्या क्षेपणास्त्रांना दिली आहेत. पण, अफगाणिस्तानच पाकिस्तानवर हल्ले करीत असेल, तर या अफगाणी सुलतानांची नावे कशाला हवीत, अशी चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू आहे.
अफगाण आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडे जो संघर्ष झाला, त्यामध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानचे नाक कापले. या संघर्षानंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये त्यांनी "मोहम्मद गझनी हा अफगाणिस्तानचा लुटारू होता. त्याला आपण हिरो बनविले; पण मी त्यास विरोध केला होता,” असे म्हटल्याचा उल्लेख आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानने त्यांच्या क्षेपणास्त्रांना अफगाणी शासकांचे नाव दिल्याबद्दल अफगाणी नागरिक आणि अधिकारी यांच्याकडून तीव्र संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे. हा आमचा अपमान असून पाकिस्तान आमच्या इतिहासाची चोरी करीत आहे, असा अफगाणी जनतेचा आरोप आहे. भारतविरुद्ध शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या काही क्षेपणास्त्रांना अफगाणी सुलतानांची दिली आहेत. त्याबद्दल आता अफगाणी जनता तीव्र संताप व्यक्त करीत आहे.