मुंबई (अक्षय मांडवकर) - ईशान्य भारतात प्रामुख्याने आढळणाऱ्या 'ईस्टर्न ब्राॅन्झबॅक' या सापाची महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे (eastern bronzeback). 'वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन'ने (डब्लूडब्लूए) ठाण्यातून ही नोंद केली आहे (eastern bronzeback). या नोंदीमुळे पश्चिम भारतात ही प्रजात वाहतुकीमुळे अनावधाने आल्याच्या शक्यतेला संशोधकांनी बगल दिली असून ही प्रजात पूर्वीपासूनच नैसर्गिकरित्या या प्रदेशात होती का, यावर संशोधन करण्याची गरज व्यक्त केली आहे (eastern bronzeback).
'बाॅन्झबॅक' या सापाला मराठीत रुका किंवा रुखई असे म्हणतात. वृक्षवासी असणारा रुखई हा साप बिनविषारी आहे. मुंबईत हा साप सर्वसामान्यपणे नागरी वस्तीच्या आसपासही आढळतो. पश्चिम भारताचा त्यातही पश्चिम घाटाचा विचार केल्यास या भूप्रदेशात रुखई सापाच्या काॅमन इंडियन ब्राॅन्झबॅक, गिरी ब्राॅन्झबॅक, अशोक ब्राॅन्झबॅक आणि बोलेंजर ब्रॉन्झबॅक या प्रजाती सापडतात. मात्र, 'डब्लूडब्लूए' या संस्थेने ठाण्यातील जुलै, २०२२ आणि एप्रिल, २०२३ सालामधील सर्प बचावाच्या घटनेमधून पकडलेले साप हे 'ईस्टर्न ब्राॅन्झबॅक' असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. यासंबंधीचे शोध वृत्त 'रेपटाइल्स अॅण्ड हॅम्पिबियन्स' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे. कौशल्य वैष्णव आणि ललित घाडी यांनी या शोध वृत्तावर काम केले आहे.
'ईस्टर्न ब्राॅन्झबॅक' या सापाची नोंद आजवर केवळ अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम, मेघालय, नागलॅण्ड आणि सिक्कीम या राज्यामधून करण्यात आली आहे. याशिवाय गुजरातमधून देखील या सापाची नोंद झाल्याची केवळ एक घटना नोंदविण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील नोदींमधील सापांची ओळख पटलेली नव्हती. मात्र, 'डब्लूडब्लूए'च्या संशोधकांनी ठाण्यामधून २०२२ आणि २०२३ या सालात नोंदवलेला साप हा 'ईस्टर्न ब्राॅन्झबॅक' असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी 'राॅ' या वन्यजीव बचाव संस्थेने मुंबईतून रुखई साप रेस्क्यू केले होते. त्यामधील सापांचे दोन नमुने हे पश्चिम घाटात आढळणाऱ्या रुखईच्या चार प्रजातींपेक्षा आकारशास्त्राच्या अनुषंगाने वेगळे असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र, फोलिडोसिस (स्केलेशन) आणि आकारशास्त्राच्या आधारे निरीक्षण केल्यानंतर ते नमुने देखील हे 'ईस्टर्न बाॅन्झबॅक'चे आहेत, असे कौशल वैष्णव यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले.
गुजरात आणि मुंबईतील नोंदी पाहता हा साप 'ईस्टर्न बाॅन्झबॅक' असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे हा साप दळणवळणाच्या माध्यमातून या प्रदेशात आल्याची शक्यता आता धूसर आहे. त्याऐवजी हा साप पूर्वीपासूनच पश्चिम भारताच्या या प्रदेशात होता. मात्र, सूक्ष्म फरकाच्या शारीरिक नोंदीमुळे त्याची आजवर नोंद न झाल्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या सापांच्या वर्गीकरणाची स्थिती निश्चित करण्यासाठी मॅक्युलर फायलोजेनेटिक विश्लेषणे समाविष्ट करून त्याचा पुढील तपास करणे आवश्यक आहे - कौशल वैष्णव, संशोधक