नवी दिल्ली : (US-India relations) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवली तर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क भरावे लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून होणारी तेल आयात थांबवण्याचे आपल्याला वैयक्तिक आश्वासन दिले होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "माझं पंतप्रधान मोदींशी बोलणं झालं होतं. ते म्हणाले होते की, आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. पण जर त्यांनी तसे केले नाही, तर त्यांना मोठ्या प्रमाणावर टॅरिफ भरावे लागेल." पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अलीकडे कोणताही संवाद झाला नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्ट केले होते. याबद्दल विचारले असता ट्रम्प म्हणाले की, “जर त्यांना असे म्हणायचे असेल, तर त्यांनी मोठे आयात शुल्क भरणे सुरू ठेवावे लागेल आणि त्यांना ते नको आहे.”
रशियासोबत ऊर्जा संबंध कायम ठेवणाऱ्या देशांवर अमेरिकेने दबाव वाढवला आहे. मात्र, भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये झालेल्या कोणत्याही संवादाबद्दल आपल्याला माहिती नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये ऊर्जा सहकार्यावर चर्चा सुरू आहे, परंतु रशियन तेल खरेदी थांबवण्याबाबत सहमती दर्शवल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्याला त्यांनी दुजोरा दिलेला नाही.