समाजाला शिकवले ‘चंद’ने ‘प्रेम’ करायला...

    20-Oct-2025
Total Views |

भारत ही नररत्नांची खाण. भारतामध्ये आजवर विविध क्षेत्रात अशी अनेक तेजस्वी व्यक्तिमत्वे घडली, त्यांच्या तेजाने भारताचे नाव अधिकच सार्थ झाले. मुंशी प्रेमचंद हे त्यापैकीच एक नाव. प्रेमचंद यांच्या विपुल लेखनामध्ये क्रीडाक्षेत्रालाही आधार केले आहे. त्यांच्या क्रीडाक्षेत्रावरील लेखनाचा घेतलेला आढावा...

नुकतीच ‘चंद’ या विषयावर आधारित हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची आठवण काढत, कोजागरीनिमित्त आपण प्रासंगिक खेळांचीही माहिती घेतली होती. सगळ्यांनाच शालेय जीवनापासूनच खेळांबरोबर वाचनाचीही आवड असते. आपली वाचनाची ती आवड पूर्ण करण्यासाठी, आपल्याकडे अजून एक ‘चंद’ अवतार घेऊन गेला होता. हिंदी विषय शिकणार्‍यांना तर त्या ‘चंद’ची विशेष ओळख झाली असेल. त्या अजून एका ‘चंद’ची कहाणी यावेळेस आपण बघणार आहोत. धनपत राय श्रीवास्तव अर्थात ‘आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या, मुंशी प्रेमचंद्र यांच्या दि. ८ ऑटोबर या स्मृतिदिनी आपण त्यांना आदरांजली अर्पण केली.

धनपत राय श्रीवास्तव यांना ‘प्रेमचंद’ हे नाव प्रकाशक वर्गाकडून सूचविण्यात आले होते आणि १९१४ सालापासून त्याच नावाने ते जगद्विख्यातही झाले. त्यांचे मित्र दयानारायण निगम यांच्या सूचनेवरूनच त्यांनी, प्रेमचंद हे नाव लेखनासाठी धारण केले. प्रेमचंद नावाला ‘मुंशी’ ही उपाधी कोणी आणि कशी जोडली, याबाबत काही ठाम माहिती उपलब्ध नाहीत. असेही असेल की, काही काळ प्रेमचंद हे शिक्षकी पेशात होते, तेव्हापासूनच त्यांना ‘मुंशी’ उपाधी लागली असेल. कारण, त्याकाळी शिक्षकांना ‘मुंशी’ असेही संबोधले जाई. तसेच कायस्थांमध्ये नावाच्या प्रारंभी सम्मानाने मुंशी हा शब्द लावण्याची प्रथा होतीच. प्रेमचंद यांनी स्वतःहून मुंशी शब्द न लावता, तो सन्मान म्हणून लोकांनीच सन्मानपूर्वकरित्या लावला असेल.

प्रेमचंद यांनी बालपणापासून विविध देशी खेळ खेळत, अनेक विदेशी खेळांचीही माहिती आत्मसात केली होती. अशा क्रीडाविश्वाची जाण असणार्‍या प्रेमचंद यांनी खेळांच्या माध्यमातूनही काही निवडक लेखन केले असल्याने, क्रीडाविश्वात त्यांचा समावेश करणे मला क्रमप्राप्त वाटते. प्रेमचंद यांचे बालपण खेड्यातच गेले. ते खिलाडू वृत्तीचे व कुशाग्र बुद्धीचे होते. लहानपणी अभ्यासाबरोबरच पतंग उडविणे, विटी-दांडू खेळणे असे बरेचसे स्वदेशी खेळ खेळण्यात ते विशेष रमत. त्यांच्या या बालजीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या ‘होली’, ‘कजाकी’, ‘चोरी’ यांसारख्या कथांबरोबरच, ‘गुल्ली डंडा’, ‘क्रिकेट मॅच’, ‘शतरंज के खिलाडी’ अशाही खेळांशी संबंधित कथांमध्येही आकर्षक पद्धतीने पडलेले दिसते.

विटी-दांडू या कालातीत खेळाचे वर्णन लीळाचरित्रात आढळून येते. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, मुक्तेश्वर आदींनीही या खेळाचे उल्लेख केले आहेत. भारतात हा खेळ सर्वत्रच खेळला जातो. आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांत तर तो विशेष लोकप्रिय आहे. उत्तर भारतात ‘गुल्ली डंडा’ या नावाने तो खेळला जातो. त्या क्रीडाप्रकारावर आधारित ‘गुल्ली डंडा’मधील प्रेमचंदांचा साहित्यविषयक दृष्टिकोन उद्देशवादी होता. साहित्याचे ध्येय मनोरंजन हे नसून, जीवनाचे दर्शन घडविणे व लोकांच्या सद्भिरुचीचे पोषण करीत त्यांची मांगल्यावरची श्रद्धा वाढत जाईल, अशा तर्‍हेचे संस्कार करणे हेच आहे, असे प्रेमचंद यांचे मत होते.

मुंशी प्रेमचंद खेळांकडे टीकात्मक आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक नजरेने पाहत. भारतातील भ्रष्टाचार, विशेषाधिकार आणि सामाजिक असमानतेवर टीका करण्यासाठी, ते अनेकदा खेळांचा वापर पार्श्वभूमी म्हणून करत. त्यांनी विटी-दांडूसारख्या पारंपरिक भारतीय खेळांच्या शुद्ध, वर्गहीन आनंदाची तुलना, क्रिकेटसारख्या खेळाच्या उच्चभ्रू आणि राजकीय स्वरूपाशी केली, ज्याला ते श्रीमंत आणि शासक वर्गाचे साधन मानत होते.

‘क्रिकेट मॅच’ ही प्रेमचंद यांची अजून एक खेळावरची कथा. क्रिकेटचा वापर क्रीडा गुणवत्तेऐवजी राजकीय आणि सामाजिक डावपेचांसाठी कसा केला जात असे, यावरही प्रेमचंद टीका करीत. प्रेमचंद त्यांच्या लेखणीतून लिहितात की, ’खेळाडूंची संघात होणारी निवड बहुतेकदा पक्षपातीपणावर आधारित असते. अधिकारी खरोखर कुशल खेळाडूंपेक्षा, त्यांना आवडणारे खेळाडूच निवडतात.’ ब्रिटिश व्हाईसरॉयच्या आवडीमुळे, राजे आणि महाराजांसारख्या श्रीमंत लोकांची क्रिकेटसारख्या खेळाकडे कशी ओढ वाढली, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

संघटित खेळांच्या विपरीत प्रेमचंद यांनी, विटी-दांडूसारख्या पारंपरिक खेळांची शुद्धता आणि समानता समाजासमोर मांडली. या खेळांमुळे खेळाडूंमधील सामाजिक आणि आर्थिक फरक मिटून, समुदाय आणि समानतेची भावना कशी निर्माण झाली यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. ‘गुल्ली-डंडा’या कथेमध्ये बालपणीच्या निरागसतेला, उत्साहाला आणि विविध पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणण्याच्या पद्धतीला अधोरेखित करण्यासाठी खेळाचा वापर केला आहे.

विटी-दांडू, क्रिकेटसारख्या मैदानी खेळांबरोबरच, बुद्धिबळासारख्या बैठ्या खेळावरही त्यांनी भाष्य केले आहे. ‘शतरंज के खिलाडी’ या कथेत, प्रेमचंद यांनी बुद्धिबळाच्या खेळाचा वापर शासक वर्गाच्या राजकीय क्षय आणि उदासीनतेचे प्रतीक म्हणून केला आहे. त्यातील दोन बुद्धिबळपटू या खेळात इतके गुंतलेले होते की, त्यांना त्यांच्या राज्याच्या विलीनीकरणाच्या राजकीय वास्तवाची जाणीवच नव्हती. बुद्धिबळाच्या रणनीती विकसित करण्यात त्यांना प्रचंड आनंद मिळतो आणि ब्रिटिशांच्या वास्तविक आक्रमणाकडे दुर्लक्ष होते. बुद्धिबळाचा खेळ खेळण्यात व्यस्त असताना, त्यांचे लखनौ शहर ब्रिटिश हल्लेखोरांच्या हाती पडते. १९७७ साली सत्यजित रे यांनी मुंशी प्रेमचंद्र यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या कथेवर आधारितच, त्याच नावाचा चित्रपटही बनवला होता. त्याला हिंदीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळाला होता.

मुंशी प्रेमचंद यांची ‘गिल्ली-डंडा’ ही एक गाजलेली कथा बालपण, मैत्री आणि सामाजिक वर्गभेदांवर भाष्य करते. या कथेचे मराठीत भाषांतर केलेले अनुवादही आज उपलब्ध आहेत. माझ्या मित्रपरिवारापैकी इंग्रजाळलेले असे माझे काही मित्र स्वीकार करोत अथवा न करोत; पण माझे तर ठाम मत आहे की ‘विटी-दांडू’ हाच सगळ्या खेळांचा राजा आहे. असे सांगत प्रेमचंद ‘गिल्ली-डंडा’ या कथेचा प्रारंभ करतात. पुढे कथेत दोन बालमित्र मैत्रीबद्दल मोठे झाल्यावर भेटतात; पण त्यांच्यातील नात्यात बालपणाची निरागसता आणि सामाजिक विषमतेमुळे फरक पडताना दिसतो. प्रेमचंद यांनी ‘गिल्ली-डंडा’त, विटी-दांडू या खेळाचे सविस्तर वर्णन केले असून, आधुनिक काळातील खेळांची तुलना जुन्या, पारंपरिक खेळांशी केली आहे. यामध्ये आधुनिक मूल्यांची, जातीभेदाची आणि सामाजिक बदलांचीही चर्चा केली आहे. गावाबाह्ेर जात अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन, २० वर्षांनंतर परत गावी आलेला आणि डाकबंगल्यात उतरलेला ’गिल्ली-डंडा’तील मित्र म्हणतो, "आमच्या बालपणात आम्ही समान होतो. आमच्यात कोणतेही अंतर नव्हते पण, आता या स्थितीत मी त्याच्यालेखी एक दयेचा विषय बनतो आहे. तो मला त्याच्या बरोबरीचा म्हणून ओळखत नव्हता. शहरातील नोकरीने मात्र तो मोठा झाला होता आणि मी मात्र लहानच राहिलो होतो.” असाच शेवट प्रेमचंद यांनी त्यांच्या कथेचा केला आहे. ८०-९० वर्षांपूर्वीच्या भारतात असलेला व काही प्रमाणात आजच्याही जमान्यातील जातिभेद किती व्यापक आहे, हेच ‘गिल्ली-डंडा’तून त्यांनी दाखवले आहे.

मुंशी प्रेमचंद यांची ‘क्रिकेट मॅच’ ही एक प्रसिद्ध लघुकथा, त्यांच्या मृत्यूनंतर १९३७ साली उर्दू मासिकात प्रकाशित झाली. ही कथा क्रिकेटच्या खेळावर आधारित असली, तरी ती केवळ खेळापुरतीच मर्यादित नाही. डायरीच्या स्वरूपात लिहिलेल्या या कथनाची सुरुवात जानेवारी १९३५ साली होते. या कथेतील मुख्य पात्र जफर आणि हेलन मुखर्जी हे आहेत, जे वैद्यकीय शिक्षण घेऊन इंग्लंडमधून भारतात परतात. ही कथा केवळ क्रिकेटच्या खेळावर आधारित नसून, त्यातील सामाजिक पैलूंवरही प्रकाश टाकते.

प्रेमचंद हे काही वृत्तपत्रांतील संपादकीय सदरामध्येही लेखन करीत. प्रेमचंद यांनी केवळ त्यांच्या पुस्तकांमध्ये क्रिकेटचा समावेश केला आहे असे नाही, तर त्यांनी या खेळावर वर्तमानपत्रांमध्येही अनेक लेख लिहिले. प्रेमचंद यांनी ‘जागरण’मध्ये प्रकाशित झालेल्या संपादकीयमध्ये, दि. १२ ऑटोबर १९३२ रोजी भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौर्‍याचा वृत्तांतदेखील लिहिला होता. प्रेमचंद त्यात लिहितात की, ’भारतीय क्रिकेट संघाने भारतीय हॉकी संघाइतके यश मिळवले नसेल; परंतु त्यांचे यश अजूनही लक्षणीय होते.’ भारतीय क्रिकेट संघाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना प्रेमचंद लिहितात; ’भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला. जरी त्यांना इतके शानदार यश मिळाले नसले, तरी त्यांनी इंग्लंडला दाखवून दिले की, खेळाच्या क्षेत्रातही भारताकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सत्य हेच आहे की, भारतीय लोकांना संधी मिळाल्यास ते जगाला हरवू शकतात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत. इंग्लंडच्या लोकांना क्रिकेटचा अभिमान आहे. या अभिमानाला यावेळी मोठाच धक्का बसला असेल. व्हाईसरॉयने भारतीय संघाचा सन्मान केला आणि स्वतःची ओळख एक सज्जन व्यक्ती म्हणून करून दिली, ही आनंदाची गोष्ट आहे.’

दि. १ जानेवारी १९३४ रोजी जागरणमध्ये लिहिलेल्या संपादकीयमध्ये प्रेमचंद यांनी खेळाडूंच्या निवडीवर भाष्य करताना लिहिले; प्रशासकांना आवडणारा कोणताही खेळाडू तोच असतो, जो स्वतःला ११ खेळाडूंमध्ये शोधतो. ११ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित करणारा एकमेव खेळाडू असतो, ज्याला अधिकार्‍यांनी नामांकन दिले आहे. भारताच्यावतीने व्हाईसरॉय अभिनंदन पाठवतात. भारताचे प्रतिनिधित्व या अधिकार्‍यांच्या हातात आहे, मग खेळाडू निवडण्याची शक्ती त्यांच्या हातात का नसावी?

विटी-दांडू, क्रिकेट, बुद्धिबळ या खेळांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत, त्यांच्या या खेलकूदशी संबंधित कथा जशा आहेत तशा अनेक कथा भारतीय चित्रपटसृष्टीतील तार्‍यांना आकर्षित करून गेल्या आहेत. प्रेमचंदांनी इ.स. १९१३ ते इ.स. १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबर्‍या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी ‘असरारे महाबिद’ उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक ‘आवाज-ए-खल्क’मध्ये दि. ८ ऑटोबर १९०३ रोजीपासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी ‘मंगलसूत्र’ अपुरीच राहिली.

आपल्याला दिवाळीत वाचन फराळ हवा असतो, अशा साहित्यात रमणार्‍या क्रीडाप्रेमींनी या धनपत राय श्रीवास्तव उर्फ नवाबराय उर्फ प्रेमचंद यांचे साहित्य शोधून जरूर आणावे आणि त्यावर मनसोक्त ताव मारत, आपली दिवाळी साजरी करावी. दै. ‘मुंबई तरुण भारत’ला व त्यांच्या वाचकवर्गाला यानिमित्ताने ‘क्रीडाविश्व’कडून आणि माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

श्रीपदा पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४