रत्नागिरी जिल्ह्यातील रानभाज्यांच्या संवर्धनासाठी ‘महाराष्ट्र जनुकीय कोष’ आणि ‘आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय’ यांनी एक अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाविषयी माहिती देणारा हा लेख...
कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा पश्चिम घाटात वसल्याने जैवविविधतेने परिपूर्ण आहे. इथे अनेक वैविध्यपूर्ण वनस्पतींसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यादेखील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर उगवतात. या रानभाज्या स्थानिक लोकांच्या अन्नसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून त्यात शरीरासाठी आवश्यक अशी खनिजे, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ, कर्बोदके, प्रथिने असतात. तसेच, अनेक रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्मदेखील असतात. विशेष म्हणजे त्या नैसर्गिक असल्याने कीटकनाशकमुक्त असतात. परंतु, जंगलतोड, शेतीचे आधुनिकीकरण, बदलते ऋतुचक्र, अशाश्वत वापर यांमुळे या रानभाज्या आता पूर्वीइतक्या उपलब्ध होत नाहीत. तसेच, आधुनिक आहार पद्धती आणि रानभाज्यातील पोषणमूल्य माहित नसल्याने तरुण पिढी या रानभाज्या खाण्यास फारशी उत्सुकदेखील नसते. आपल्या अनेक भाज्यांची ओळखही नवीन पिढीला राहिलेली नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या ‘जैवविविधता मंडळा’च्या ‘महाराष्ट्र जनुकीय कोषा’च्या विशेष अनुदानातून देवरूख येथील आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील रानभाज्यांचे संवर्धन, मूल्यमापन आणि व्यावसायिक लागवडीचा अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. प्रताप नाईकवाडे यांच्याकडे आहे. तीन वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील रानभाज्यांबद्दल शास्त्रीय अभ्यास करून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत ९२ गावांतील ६०० पेक्षा जास्त कुटुंबांचे प्रश्नावलीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून रानभाज्यांच्या वापराची पद्धत, पारंपरिक ज्ञान, औषधी गुणधर्म, बाजारपेठ, साठवण आणि पर्यावरणीय बदलांचा परिणाम याविषयी महत्त्वाची माहिती गोळा करण्यात आली. त्यातून स्पष्ट झाले की, अनेक गावे अजूनही पारंपरिक रानभाज्या वापरतात. परंतु, पूर्वीच्या तुलनेत त्यांची विविधता कमी झाली असून काही रानभाज्या मिळवणे अधिक कठीण झाले आहे. वृद्ध पिढीकडे या वनस्पतींचे ज्ञान आहे; पण तरुण पिढीत ते कमी होत आहे.
संशोधनातून अनेक रानभाज्या लोह, कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि अॅण्टीऑक्सिडण्ट्सने समृद्ध असल्याचे आढळले आहे. उदा. घोळची भाजी ’ओमेगा-३ फॅ टी अॅसिड’चा नैसर्गिक स्रोत आहे. माठ भाजी लोह व प्रथिनांनी समृद्ध आहे. पाथरीची भाजी रक्तशुद्धीकरण व पचनासाठी उपयुक्त आहे. या सर्व रानभाज्यांचा आहारात समावेश केल्यास कुपोषण व जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
अनेकदा रानभाज्या जंगलातून ओरबाडून आणल्या जातात. एकाच ठिकाणाहून सर्वांनी भाज्या घेताना त्यांच्या बिया तिथे पडत नाहीत, कंद काढून नेले जातात, त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची हानी होते आणि पुढील काही वर्षांत त्याठिकाणी ती रानभाजी मिळत नाही, त्याकरिता त्यांचा शाश्वत वापर आवश्यक आहे. तसेच, रानभाज्यांना बाजारात मागणी असेल, तर त्यांची शेतात लागवड करून विकणे हा योग्य पर्याय ठरू शकतो, त्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहून शेतकर्यांना चांगले आर्थिक उत्पन्नदेखील मिळू शकते.
एरवी रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने येतात; मात्र करटूले, करांदे, सुरण, लालमाठ, फोडशी यांसारख्या रानभाज्यांना बाजारात मागणी असते. त्यांची शेतात लागवड करताना रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर न करता, पर्यावरणपूरक विशेष लागवड तंत्र विकसित केले जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब, मुरशी, मोर्डे, देवळे, आंगवली या गावांमध्ये काही निवडक रानभाज्यांची शेतात प्रायोगिक लागवड केली जात आहे. या प्रकल्पामुळे रानभाज्या संवर्धनासोबतच जैवविविधतेचे संवर्धनदेखील होणार असून, स्थानिक अन्नसंस्कृतीचे पुनरुज्जीवन होणार आहे. ग्रामीण शेतकरी तसेच महिलांचे सक्षमीकरण, अन्नसुरक्षेला चालना असे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. भविष्यात अधिकाधिक शेतकर्यांना प्रशिक्षण देऊन रानभाज्यांची व्यावसायिक लागवड विस्तारण्याची योजना आहे. मूल्यवर्धन तंत्र विकसित करून रानभाज्यांना बाजारपेठेत स्थान मिळवून देणे गरजेचे आहे. स्थानिक बीजबँकांद्वारे जैवविविधतेचे दीर्घकालीन संवर्धन शक्य होणार आहे. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात अन्नसुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा नवा मार्ग दाखवणारा ठरत आहे.
(लेखक देवरुखच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहेत.)
९५९५८२१८९१