सांगलीच्या गिरलिंगची राई

    20-Oct-2025
Total Views |

GIRLINGS RAI  
 
 
सड्यावर पसरलेल्या सांगलीतील पर्जन्यछायेच्या क्षेत्रात वसलेल्या गिरलिंगच्या रायीविषयी माहिती देणारा हा लेख...
 
सांगलीचा एक भाग पर्जन्यछायेत वसलेला आहे. कवठेमहंकाळ तालुक्यात ‘जुना पन्हाळा’ या नावाने परिचित एक भला मोठा डोंगर लांब रुंद उभा ठाकलेला आहे. इथे म्हणे पूर्वी किल्ला बांधणार होते. ते नियोजन बदलेले गेले असे म्हणतात. याठिकाणची प्राणी व वनस्पती विविधता विपुल आहे. कुकटोळी नावाचे गाव पायथ्याला आहे. हे गाव झाड जपणारं आहे. इथले शेतकरी महादेवाला मानणारे आहेत. शंभू महादेव डोंगररांगेतील या गावाजवळ गिरलिंगाची स्थापना काहीशे हजार वर्षांपूर्वी झाली. जांभा दगडी गुहेतले हे मंदिर. बाजूला पराशर ॠषींची तपाची जागा. नाथ पंथाचे हे स्थान. जिथे नाथपंथ तिथे झाडं राई हे गणित आहे. नाथांचे झाडांवर नितांत प्रेम.
 
मंदिराच्या पायर्‍या चढून गेलात की, माधवीलतेच्या वेलींनी इथल्या मठाधिकार्‍यांनी सुंदर नैसर्गिक मंडप घातलेला आहे. तसा हा सगळा भाग माधवीलता (Hiptage beghalensis) या प्रदेशनिष्ठ वेलप्रजातीचे वर्चस्व असलेला. ही वेल वृक्षवेल म्हणजे शास्त्रीय भाषेत Woody Liana या प्रकारात मोडते. सर्वदूर कड्याला लगटून सगळी माधवीलता निर्विलास पसरलेली आहे. शालपर्णीच्या वेली आणि पाचुंदा मंदिराच्या पायथ्याशी दिसतात. त्यापुढे भारतीय शेंद्रीचे गर्द हिरवे झाड आहे. तिला या दिवसांत फुलांच्या मंजिर्‍या दिसू लागतात आणि फळं मार्चला उकलू लागतात. या भारतीय शेंद्रीचा वापर खाण्यातला रंग करण्यासाठी व कापडाला रंगावण्यासाठी करतात. मंदिराला वळसा घालून पायर्‍यांच्या डाव्या बाजूला जांभा दगडात एक बराच जुना खरमाटी हा धामण/फालसा कुळातला वृक्ष आहे. याचे शास्त्रीय नाव Grewia Villosa. मधाकरिता फुलपाखरांचे आणि फळांकरिता पक्ष्यांचे हे आवडीचे झाड. जतन करावे असे झाड.
 
पायर्‍या चढून डावीकडे वळलो की, मोठा कातळ सडा चालू होतो. सुरूवातीला काळा कुड्याची बरीच झाडे इथे दिसतात. काळा कुडा किंवा कूटज म्हणजे Wrightea Tinctoria. बाजूला खुरटी कारीची काटेरी झाड आहेत. मानवनिर्मित छोटा तलाव ओलांडून गेलो की, हिवराची झाड आणि त्यात मध्येअध्ये गुंफलेली बारतोंडी दिसते. बारतोंडीच्या खोडावर शालपर्णी, पाताळगारूडी आणि अनंतमुळाच्या सडपातळ वेली ठिय्या मांडून बसलेल्या दिसतात. डाव्या कड्याखाली चिल्लार मधला एक काटेरी प्रकार जोमाने फोफावलेला आहे. Seneggalia pennata याचे शास्त्रीय नाव. मात्र इथे तो खूपच फोफावलेला आहे. थोड पुढे गेले की, हळदवेल किंवा पिलुकीचे (Combretum ovalifolium) जाडजूड वृक्षात बदललेले वेल दिसतात.
 
इथूनच पुढे उन्हाची धार चुकवत पुढे जावे लागते. शिल्लक राहिलेले हिरवे गवत चरायचे थांबवून आपल्याकडे बघणारी खोंडं म्हसरं सोडून, बाकी तिथे शुकशुकाट असतो. तसेच बघत गेलो की, लाल भडक पानांनी भरलेला नांदरूख (Ficus microcarpa) दिसतो. कपारीला Pimpinella wallichianaची वितभर झुडूप आणि त्याच्या पुढे रांगेने कपारीत उगवलेले खडक पिंपळ म्हणजे Ficus arnottiana आपल्याला दर्शन देत राहतात. पावसाळ्यात आलात तर सड्यावर पाण्यात उगवणार्‍या धिटुकल्या पसर्‍या वनस्पतींनी तो सडा भरलेला असतो. शरपुंखा, शेवर्‍याचे विविध प्रकार, विष्णूक्रांता, घाटी पित्तपापडा, पिवळे टारफूल, सफेद टारफुलपासून ते रानतीळ, रानकांदे, पेंटानेमा, ब्रह्मदंडी, गोलगोंडा, दुधानी यांची भरमार इथे असते. आग्या आणि सह्याद्री उंटफळाची काटेरी झाडं हे इथल्या जैववैविध्याचे सामान्य वनस्पती लक्षण आहे. भारंगीची तजेलदार झुडूप इथे रिंगा-पिंगा घालत उभी असतात. संबंध पठारावर एकमेव घाटबोराचे (Ziziphus xylopyrus) झाड आहे. अध्येमध्ये मांसतोडी, गोड बोर, मेढशींगी, नेपतीची झाडे दिसतात. काटेरी धाकटा हेंकळची झुडूपं हेही या दुष्काळी सांगली भागाचे वैशिष्ट्य. उंच गेलेला आठरून मध्येच दर्शन देतो.
गिरलिंग मंदिर तसे बरेच पुरातन. इथे आसपास बौद्धकालीन विश्रांती गुंफापण आहेत. पराशर ऋषींचे तपस्थान व समाधीदेखील इथे आहे. नाथपंथाचे अतिशय महत्त्वाचे स्थान हे आहे. जिथे नाथपंथ तिथे निसर्ग आहे. झाडी आहे आणि ती जपण्याची पराकाष्ठा आहे. मठाधिपतींनी काही चांगली झाडं मंदिराजवळ लावलेली दिसतात. त्यात खर्‍या रूद्राक्षाचे झाडदेखील त्यांनी चांगले जपलेले आहे. इथे तुम्हाला कचरा दिसणार नाही. शुद्ध हवा आहे. सात्विक पर्यटन आहे. या सगळ्या आडवाटा आहेत. रपरप पाऊस पडणार्‍या जागा, धबधबे यांचे आकर्षण मानवाला पूर्वीपासून आहे. त्यातला निसर्गाचा अहंकार उग्र आणि त्याचवेळी अल्हाददायक आहे. मात्र, दुष्काळी रानसड्यावरचे फुफाटे आणि झळा यांचे माणसाशी असणारे ऋणानुबंध तीक्ष्ण असतात. सहजासहजी तुम्ही त्यांना विसरत नाही आणि ते तुम्हाला. या वाटा पावसाळा संपला की, पर्यटनाला पोरक्या होतात. कातळावरचे वृक्षवेली मात्र तेव्हाही मूळं घट्ट रोवून पाण्याच्या शोधात पुढे मार्गक्रमण करतच राहतात. गिरलिंगची ही देवराई म्हणजे गिरेश्वरावराच्या दगडी मुकूटात खोचलेले मोरपंखच.
रोहन पाटील
(लेखक वनस्पती व देवराई अभ्यासक आहेत.)

७३८७६४१२०१