मनाचा ठाव घेणारी ‘सिध्दी’

20 Oct 2025 12:04:41

मनावर अंकुश मिळवणे हे सिद्धी मिळवण्यासारखेच. मनस्वास्थ्याच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत नाव सार्थ करणार्‍या सिद्धी वैद्य यांच्याविषयी...

सिद्धी वैद्य यांचा जन्म दि. १६ नोव्हेंबर १९९१ रोजी डोंबिवली येथे झाला. दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण टिळकनगर विद्यामंदिर येथे घेतल्यानंतर, पुढे महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयातून घेतले. मानसशास्त्राची आवड जपत मुंबई विद्यापीठातून त्यांनी ‘काऊन्सिलिंग सायकोलॉजी’ या विषयात, २०१४ साली पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर सिद्धी यांनी डोंबिवलीतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांच्या ‘मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर’ आणि ‘मनोदय ट्रस्ट’ या संस्थेत, मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम सुरू केले. विविध वयोगटातील मानसिक समस्या हाताळण्याची तसेच, आधारवड या स्किझोफ्रेनिया रुग्णांच्या स्वमदत गटासाठी काम करण्याची संधी त्यांना इथेच मिळाली. पुढे पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये, समुपदेशक म्हणूनही त्यांनी काम केले. याकाळात त्यांना लहान मुलांशी निगडित विविध समस्यांवर काम करण्याचा अनुभवही मिळाला. तसेच, पालक, शिक्षक यांच्यासाठी त्यांनी कार्यशाळाही घेतल्या. बडोदा, लातूर, नांदेड इथल्या काही शाळांमध्ये जाऊन तिथल्या शिक्षकांना, मुलांमधील समस्यांबाबत मार्गदर्शन करणे, तेथील समुपदेशकांना ट्रेनिंग देण्याचे कार्यही केले. यादरम्यान सायकोलॉजी विषयातील प्रगत शिक्षणही त्यांनी सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिशिर पळसापुरे यांच्या ‘मोर्फिक माईंड्स’ या संस्थेतून पूर्ण केले.

सायकोलॉजी विषयाची आवड आणि गाठीशी असलेला अनुभव, याच्या जोरावरच सिद्धी यांनी स्वतःचे लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘मुदिता सायकोलॉजिकल वेलनेस अ‍ॅण्ड काऊन्सिलिंग सेंटर’ या नावाने त्यांनी, स्वतःचे लिनिक डोंबिवली येथे २०१८ साली सुरू केले. मोद म्हणजे आनंद. विविध मानसिक समस्यांशी झटणार्‍यांना आनंद मिळावा, हाच ‘मुदिता’ सुरू करण्यामागचा त्यांचा मुख्य उद्देश होता. ‘मुदिता’ अंतर्गत सिद्धी यांनी अनेक संस्थांसाठी अनेक कार्यशाळा, व्याख्याने दिली आहेत. डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कर्मचार्‍यांसाठीही ‘पोसो कायद्या’वर व्याख्यान, कर्जत येथील आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसाठी ‘नातेसंबंध आणि संवाद कौशल्य’ या विषयावरील कार्यशाळा, बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टेनोलॉजीचा वाढता वापर आणि त्यामुळे होणारे परिणाम’ यावर मार्गदर्शन, कल्याण येथील आर्य गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लैंगिक शिक्षण आणि कुमारवयीन समस्या’ यावर मार्गदर्शन, दादर येथील कीर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख स्वतःची’ या विषयावरील कार्यशाळा, अशा इनेक कार्यशाळादेखील घेतल्या आहेत.

‘मुदिता’चे काम सुरू असतानाच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ इथे एका छोट्या प्रकल्पावर काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. याशिवाय डोंबिवलीमधील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर वर्ग आणि मुलुंड येथील ‘अल्फा आटर्स अ‍ॅकेडमी’च्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायकोलॉजी विषयासाठी लेचरर म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. ‘विवेक’ या साप्ताहिकामध्ये ‘वयात येताना’ या नावांतर्गत कुमारवयीन ‘मुलांच्या समस्या आणि त्यावरील उपाय’ ही सिद्धी यांची लेखमाला प्रसिद्ध झाली होती. ‘कोविड’दरम्यान मनःस्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी, या विषयावर अनेक ऑनलाईन सत्रेही सिद्धी यांनी घेतले आहेत.

महाविद्यालयीन जीवनातच सिद्धी यांनी जपानी भाषेचेही शिक्षण घेतले होते. सिद्धीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. शालेय काळातच त्यांनी गुरू लीना भट यांच्याकडे भरतनाट्यमचे शिक्षण घेऊन, त्यात विशारद पूर्ण केले. नंतर महाविद्यालयामध्ये असताना, गुरू डॉ. राजकुमार केतकर यांच्याकडे कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यासही सुरुवात केली. त्यांनी अनेक नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. मास्टर्स करत असताना ‘युथ फेस्टिवल’मध्ये सामूहिक नृत्यात रौप्यपदक मिळाले.

पुढे २०२२ साली कुटुंबासोबत सिद्धी बंगळुरु येथे स्थलांतरित झाल्या. तेथील समाजजीवन समजून घेण्यासाठी, त्यांनी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ‘ऍड्रेस हेल्थ’ या संस्थेतर्फे बंगळुरुमधील विविध शाळांमध्ये जाऊन, विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी कार्यशाळा घेण्याची संधी मिळाली. नंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्यांनी दोन वर्षे मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम केले. यादरम्यान कॉर्पोरेट विश्वातील, जवळजवळ एक हजारांहून अधिक लायंट्सच्या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी सिद्धी, बंगळुरु येथील ‘युवा मराठी संघ’ आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागल्या. यादरम्यान त्यांनी युवा एकांकिका, लेझिमसारख्या कलाप्रकारांचे सादरीकरण बंगरूळ येथील जीवनात केले.

जून २०२५ साली पुन्हा एकदा सिद्धी कायमस्वरूपी मुंबईत स्थायिक झाल्या. सध्या त्या ‘मुदिता’अंतर्गत ऑनलाईन काऊन्सिलिंग सेशन्स घेत आहेत. मानसिक स्वास्थ्याबद्दल जागरूकता यावी, तसेच मानसिक आजारांविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत, यासाठी त्या TOWARDS A DELIGHTFUL MIND या त्यांच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करतात. यावर्षी नवरात्रात डोंबिवलीतील ‘शिवाई बालक मंदिर ट्रस्ट’ने सिद्धी यांच्या कार्याचा, ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करून सन्मान केला आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0