मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा यासाठी 'आपली एसटी' या नावाने नवीन ॲपचे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण करण्यात आले. भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल. हे ॲप १२ हजारपेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे विकसित केले करण्यात आले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
तसेच, भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास, प्रवाशांनी त्या जरूर सुचित कराव्यात, जेणेकरून हे ॲप परिपूर्ण होण्यास मदत होईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी 'आपली एसटी’ असे मराठमोळे नाव या ॲपला देण्यात आले आहे. या ॲपमुळे सर्वसामान्य मराठी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल यावर अधिक भर दिला जाणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या सहाय्याने विकसित केलेल्या 'आपली एसटी' ॲपमुळे प्रवासी आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकणार असून प्रवासी माहिती केंद्राद्वारे बस कुठून सुटणार आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार याची वस्तुस्थिती जन्य (रिअल-टाइम) माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही, तर ते थेट बस उपलब्धतेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील. ॲपमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागोवा (लाईव्ह ट्रॅकिंग करणे) घेणे, यांचा समावेश आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली असून, एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे. सध्या असलेल्या तिकिट बुकिंग ॲपमध्येही बसची थेट माहिती समाविष्ट केली जाणार आहे, ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.