राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य संपूर्ण हिंदू समाजासाठी: सुरेंद्र चंपानेरकर

    02-Oct-2025
Total Views |

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे केवळ स्वयंसेवकापुरते मर्यादित नसून संपूर्ण हिंदू समाजाच्या संघटनासाठी आणि ऐक्यासाठी आहे. राष्ट्राला परमवैभवाच्या शिखरावर नेणे हे संघाचे ध्येय असून हिंदू समाजाच्या प्रत्येक घटकाला समरसतेच्या धाग्यात जोडण्यासाठी संघ गेली शंभर वर्षे सातत्याने कार्यरत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण सहप्रांत प्रचारक सुरेंद्र चंपानेरकर यांनी केले.

कुर्ला सर्वेश्वर नगरातील प्रमोद महाजन सभागृह, गाडगे महाराज शाळेजवळ हलाव पूल येथे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नगरातील १२५ स्वयंसेवकांनी गणवेशात सहभाग नोंदविला. शाखेतील व्यायाम, गीत-प्रार्थना आणि संघशिस्तीच्या प्रस्तुतीमुळे वातावरण भारावून गेले. या वेळी नगर संघचालक प्रभाकर परांजपे अध्यक्षस्थानी होते, तर मुख्य अतिथी म्हणून कुर्ला तेरापंथीय जैन समाज सभेचे माजी अध्यक्ष कांतीलाल कोठारी, विभाग सहकार्यवाह अंकुश पटेकर उपस्थित होते.

मुख्य वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना सुरेंद्र चंपानेरकर म्हणाले की, आपण भारत देशाला माता मानून तिच्या सेवेसाठी गेली शंभर वर्षे संघाच्या शाखेद्वारे कार्य करत आहोत. शाखेतील प्रत्येक खेळ, प्रत्येक कृती आणि प्रत्येक प्रार्थना ही केवळ वेळ घालवण्याची साधने नसून ती राष्ट्राभिमान जागवणारी, आत्मसन्मान वाढवणारी आणि राष्ट्रीय बांधिलकी दृढ करणारी आहेत. हिंदू समाजातील व्यक्तीला स्वतःला हिंदू म्हणताना अभिमान वाटावा इथपर्यंत संघाने आणि संघपरिवाराने कार्य केले आहे.

ते पुढे म्हणाले की, संघाचे काम केवळ स्वयंसेवकापुरते मर्यादित नाही. जोपर्यंत सामान्य माणूस समाजात समरस होत नाही तोपर्यंत संघाचे काम अपूर्ण आहे. समरस समाजाशिवाय राष्ट्राचे वैभव वाढू शकत नाही. म्हणूनच संघ सतत संघटन, स्वावलंबन, सेवा आणि समरसता या मूल्यांवर काम करत आहे. विकसित राष्ट्र घडविण्यासाठी संविधान हीच सर्वात महत्त्वाची चौकट आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य, शिष्टाचार आणि जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजेत, तेव्हाच संविधानाचे सामर्थ्य प्रकट होऊन राष्ट्र उभारी घेईल.

चंपानेरकर यांनी आपल्या भाषणात पंच परिवर्तन या महत्त्वपूर्ण संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की विचारांमध्ये, संस्कारांमध्ये, आचार-विचारांमध्ये, आर्थिक जीवनात आणि संघटनात्मक प्रवृत्तीमध्ये परिवर्तन घडवून आणल्याशिवाय समाजाचे खरे रूपांतर होणार नाही. या पंच परिवर्तनाद्वारे प्रत्येक स्वयंसेवक व प्रत्येक सज्जनशक्ती राष्ट्रकार्यात सामील होईल आणि अखंड हिंदू समाजाची उभारणी साधेल.

या प्रसंगी बोलताना मुख्य अतिथी कांतीलाल कोठारी म्हणाले की, संघ गेल्या शंभर वर्षांपासून समाजात सकारात्मक कार्य करत असून जैन समाज हा नेहमीच राष्ट्रहिताच्या कामात आणि हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी संघासोबत उभा राहिला आहे आणि राहील.

कार्यक्रमात स्वयंसेवकांनी व्यायाम, दंडप्रदर्शन, गीत व प्रार्थना सादर केली. शिस्तबद्धतेने साकारलेल्या या प्रस्तुतीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला. कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवकांनी सामूहिक प्रार्थना करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.