मुंबई : समाजातील विविध स्तरांवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्धारित केलेल्या स्वदेशीचा वापर, नागरिक कर्तव्ये, पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन या पंच परिवर्तनाची गरज आहे जेणेकरून समाजव्यवस्था अधिक सक्षम होईल. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य भूषण दामले यांनी व्यक्त केले.
लालबाग नगरच्या वतीने संघ शताब्दी विजयादशमी उत्सव गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा येथे साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात डॉ. शिरीषकुमार बांबरकर तसेच प्रमुख वक्ता भूषण शरच्चंद्र दामले यांच्यासह दिपक मालवीय (सह - संघचालक - मुंबादेवी भाग), राहुल संकलेचा (नगर कार्यवाह) उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
संघकामात मोलाचे योगदान असलेल्या लालबाग नगरातील दिवंगत स्वयंसेवकांना आदरांजली म्हणून त्यांच्या छायाचित्रांसह दिलेल्या योगदानाची माहिती याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उत्सवादरम्यान गणवेशातील स्वयंसेवकांसह समाजातील विविध स्तरांवरील सृजनशील पुरूष व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.