राष्ट्रसेवेची शंभर वर्षे

    02-Oct-2025
Total Views |

डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली फक्त दहा बारा जणांना बरोबर घेऊन सुरू झालेली संघटना. खरं तर ती संघटना तरी कुठे होती? हे हिंदुराष्ट्र आहे हा विचार घेऊन, हाच विचार कोट्यावधी लोकांमध्ये रुजवण्यासाठी सिद्ध झालेले काही मोजके तरुण, प्रौढ लोक. सुरुवातीला चर्चा करणे हे स्वरूप. त्याकाळची स्थिती पाहता हे मोठे धाडसाचेच काम होते. काही ४ लोकांच्या मते वेडेपणाचे.

डॉ हेडगेवार यांनी अतिशय मूलभूत प्रश्नांचा विचार केला होता.. समस्येच्या अगदी मुळाशी जाण्याचा तो प्रयत्न होता. स्वातंत्र्य मिळवले पाहिजे हे खरेच आहे. पण स्वातंत्र्य मिळवल्यावर ते टिकलेही पाहिजे. ते कसे टिकेल? आपण पारतंत्र्यात गेलोच कशामुळे? कधीपासून गेलो? आपली भारतभूमी तर संपन्न, जगाला ज्ञान देणारी होती, इथल्या विद्यापीठात शिकण्यासाठी जगभरातून लोक येत, तरी अशी अवस्था का झाली?

डॉ हेडगेवार यांना त्यांच्या अभ्यासातून, विचारमंथनातून एक निश्चित दिशा मिळाली होती. -

" हे हिंदुराष्ट्र आहे. हिंदू समाज हा या देशाचा कणा आहे.अतिशय वैभवशाली इतिहास असणारा हा समाज होता . तरीही परतंत्र का झाला? कारण तो स्वत्व विसरला. विस्कळीत झाला. स्वार्थी वृत्ती वाढली. विविध जातींमध्ये उच्चनीच मानसिकता वाढली. हिंदू समाजाने राष्ट्रीय वृत्ती गमावली. या कारणांमुळे हिंदू समाजाची गलितगात्र अवस्था झाली. भारताला जर पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर आधी हिंदू समाजाला त्याच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून द्यायला हवी. स्वार्थी वृत्ती टाकून द्यावी लागेल, उच्चनीच मानसिकता टाकून द्यावी लागेल. जातीपाती विसरून देशासाठी एकत्र येण्याची मानसिकता घडवावी लागेल.

पण हे घडणार कसे? कोट्यवधी लोकांमध्ये बदल घडवणे सोपे नाही. मग? त्यासाठी आपण आपल्यासारखा विचार करणारे लोक घडवावे लागतील? लोक कसे घडतील? आपले अनुकरण करून? त्यासाठी आपल्याला चारित्र्यवान, देशासाठी घरादाराचा त्याग करून, स्वतःपेक्षा देशाला महत्व देऊन, कुठेही जाऊन काम करण्याची तयारी असणाऱ्या व्यक्ती घडवाव्या लागतील. हा संपूर्ण हिंदू समाज माझा आहे ही आपलेपणाची, एकमेकांबद्दल आपुलकी असणारी जाणीव निर्माण केली तरच लोक एकत्र येतील. आणि जर हिंदू समाज एकत्र आला तर भारताला पुन्हा गुलाम करण्यास कोणीही धजावणार नाही. .. "

ठरले.. संघाची शाखा सुरू झाली. व्यक्तीनिर्माणाचे स्थान. कोणा व्यक्तीला नव्हे तर भगव्या ध्वजाला गुरू मानून त्याच्यासमोर खेळ आणि देशभक्ती रुजवणारे खेळ सुरू झाले.
हमे भय नहीं दुर्जनोंकी दुष्टता से,
हमे भय है सज्जनो की निष्क्रियता से


अनेक स्वयंसेवक सक्रिय झाले. नागपूर हून देशाच्या विविध भागांत प्रचारक म्हणून गेले. चांगले शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय न करता, लग्न न करता फक्त देशासाठी सर्वस्वाचा होम करण्यासाठी गेले. त्यांच्यासमोर आदर्श होते डॉ हेडगेवार. प्रत्येकाशी आपलेपणाने वागणारे, अगदी विरोधक सुद्धा ज्यांच्या शब्दाला मान देऊन मदत करत असे डॉ हेडगेवार. अनेक उच्चशिक्षित तरुणांनी डॉ हेडगेवारांनी सांगितले त्या अनोळखी प्रदेशात जाऊन तिथे राहून लोकांमध्ये मिसळून, त्यांना आपलेसे करून घेऊन संघ शाखा सुरू केल्या, राष्ट्रीय विचार रुजवला.

आजही हजारो स्वयंसेवक दरवर्षी उच्चशिक्षण घेतल्यावर संघ सांगेल त्या भागात जाऊन काही वर्षे देशासाठी समर्पित करतात. लाखो स्वयंसेवक स्वतःचा संसार सांभाळून बराचसा वेळ संघ कार्यासाठी देतात. त्यांच्याकडे पाहून घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणजे काय याची अनुभूती येते.

सुरवातीला दुर्लक्ष , त्यानंतर विरोधी विचारांचे अस्तित्वच राहू नये म्हणून १९४८ साली खोट्या आरोपाखाली बंदी घालून दाबण्याचा प्रयत्न, त्यानंतर १९७५ मध्ये स्वयंसेवकांचा छळ करून संघाला संपवण्याचा प्रयत्न, तरीही संपत नाही पाहिल्यावर आणि हजारो सेवाकार्य करणारे कार्यकर्ते पाहून लोकांमध्ये संघाबद्दल कुतूहल निर्माण झाले नंतर अनेक देशव्यापी कार्यक्रमातून अनुकूलता निर्माण झाली आणि नंतर संघच या देशाला चांगली दिशा देईल हा विश्वास आणि लोकांच्या संघाकडून वाढलेल्या अपेक्षा...

दुर्लक्ष, विरोध, कुतूहल, अनुकूलता आणि वाढलेल्या अपेक्षा असा हा शंभर वर्षांचा प्रवास..  

एक संघगीत सार्थ ठरवले जात आहे

करवट बदल रहा है देखो भारत का इतिहास
जाग उठा है हिंदू हृदय में विश्व विजय विश्वास

आज शताब्दीनिमित्ताने ही संघ गाथा शंभर रुपयांच्या नाण्यावर एकेकाळी संघाचे प्रचारक राहिलेल्या भारताच्या पंतप्रधानांनी प्रकाशित केली. शंभर वर्षांत प्रचंड बदल घडलाय. एक समर्पित भावनेने काम करणारा संघ कार्यकर्ता देशाच्या प्रमुखपदी पोहोचून जगात भारताचे स्थान मोठे करण्यासाठी झटतो आहे, त्यात यश मिळवतो आहे हे खूप आनंददायी आहे.

पण वरील गीतातल्या पुढील ओळी जास्त महत्त्वाच्या आहेत असे संघ मानतो

केवल सत्ता से मत करना परिवर्तन की आस
जागृत जनता के केंद्रो से होगा अमर समाज

त्यामुळेच शताब्दी हा विषय संघासाठी सेलिब्रेशन करण्याचा विषय नाहीच. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत संघ विचार अर्थात राष्ट्राचा विचार पोहोचवणे हे ध्येय असल्याने कार्यकर्त्यांना हे वर्ष जास्त काम करण्याचे वर्ष आहे. येत्या काळात पंच परिवर्तन - नागरी कर्तव्य पालन, सामाजिक समरसता वाढवणे, कुटुंब पद्धतीची जपणूक, पर्यावरण रक्षण, स्व चे भान ठेवून स्वदेशी, स्वभाषा जपणे.- विषय घेऊन स्वयंसेवक जागरूकता आणणार आहेत. देशाला पुन्हा वैभवशाली बनवण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी जनतेलाही या यज्ञात सहभागी व्हावे लागेल.

- भूषण नवीनचंद्र मेंडकी