'स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या सांगतेनिमित्त नवी मुंबईकरांनी साजरा केला ‘स्वच्छोत्सव’

02 Oct 2025 16:23:43

नवी मुंबई : 17 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची दिमाखदार सांगता स्वच्छताप्रेमी नागरिकांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात एकत्र येत अतिशय उत्साहाने साजरी केली. विशेष म्हणजे दस-याच्या सणाचा सुट्टीचा दिवस असूनही आबालवृध्द नागरिक स्वच्छतेचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी एकात्म भावनेने मोठ्या संख्येने जमले होते.

नवी मुंबईकर नागरिकांनी कायम जपलेली व दाखविलेली स्वच्छतेविषयीची बांधिलकी हेच आपल्या नवी मुंबई शहराच्या नावलौकिकाचे बलस्थान असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याच्या कालावधीत नागरिकांनी विविध उपक्रमांमध्ये दिलेल्या मोठ्या प्रमाणातील उत्स्फुर्त सहभागाबद्दल आभार व्यक्त केले.

सुपर स्वच्छ लीगमधील आपल्या शहराचे मानांकन स्वच्छतेविषयीची जबाबदारी वाढविणारे असून प्रत्येकाने स्वत:पासूनच नियमित स्वच्छता राखण्यास सुरूवात करूया, यातून आपले शहर रोल मॉडेल म्हणून पुढे येईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. याकरिता आपल्या कामाची गती आणि व्याप्ती वाढविली पाहीजे असे सांगतानाच आपले जीवन सुकर होण्यासाठी प्रत्येकाने आपले सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनानिमित्त प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे समवेत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभाग उपआयुक्त किसनराव पलांडे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ.अजय गडदे, परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग उपआयुक्त अभिलाषा पाटील, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, प्रवीण गाडे, राजेश पवार, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे उपस्थित होते.

प्लास्टिकपासून बनविलेल्या रावणाच्या प्रतिकृतीच्या प्रतिकात्मक दहनाचा अभिनव उपक्रम

यावेळी संकलित प्लास्टिकपासून बनविलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. ‘हा आहे दशानन प्लास्टिकरूपी रावण, आपल्या जीवनाना लागलेले संकटरूपी ग्रहण, दूर करू त्याला ठेवून निसर्गाची जाण, प्रतिकात्मक दहन करू राखू पर्यावरणाचा मान’ – अशा ओळींनी सजलेल्या फलकाव्दारे प्लास्टिक प्रतिबंधाचा संदेश थेट पोहचविण्यात आला.

शाळाशाळांमधून अभियानांतर्गत प्लास्टिक संकलन करण्याच्या विशेष मोहीमेमध्ये 56 शाळांमधून 1364 कि.ग्रॅ. प्लास्टिक बॉटल्स व इतर प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला होता. त्या प्लास्टिकच्या बाटल्या व प्लास्टिकपासून रावणाची भव्यतम प्रतिकृती तयार करण्यात येऊन आज दस-याचे अर्थात विजयादशमीचे औचित्य साधून त्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.

हे प्रतिकात्मक दहन म्हणजे या रावणाच्या प्रतिकृती स्वरूपात रचलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या व प्लास्टिक कचरा श्रेडरमध्ये टाकून त्या प्लास्टिकच्या तुकड्यांपासून विविध वस्तू तयार केल्या जाणार आहेत. प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी काम करणा-या प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या माध्यमातून ही प्लास्टिकच्या रावणाची प्रतिकृती नवी मुंबईतील विविध शाळा-महाविद्यालयांतून संकलित केलेल्या प्लास्टिकपासून विद्यार्थ्यांच्याच सहकार्याने तयार करण्यात आलेली आहे.

विजयादशमीला आपण नकारात्मक अनिष्ट गोष्टींचा त्याग करतो, हीच भूमिका प्लास्टिकच्या रावणाच्या प्रतिकृतीतून मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला असून यामध्ये शहराचे उद्याचे भविष्य असणा-या विद्यार्थ्यांचा प्राधान्याने सहभाग घेण्यात आला असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यावेळी सांगितले. आपले सर्व सण हे निसर्गाला जोडून असल्याचे सांगत आजची पर्यावरणाची स्थिती पाहता प्रत्येकाने निसर्गपूरक जीवनशैली अंगिकारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

मौलिक योगदान देणारे स्वच्छताकर्मी आणि स्वयंसेवी संस्थाचा स्वच्छताकार्यातील मौलिक योगदानाबद्दल गौरव

स्वच्छता ही सेवा अभियानाच्या पंधरवड्यात ज्या स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छता उपक्रमांमध्ये आपले अनमोल योगदान दिलेले आहे अशा 90 हून अधिक संस्थांच्या प्रतिनिधींचा तसेच विविध महाविद्यालयांच्या एनसीसी युनीट्सचा त्यांनी केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल यावेळी प्रशस्तिपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे शहर स्वच्छतेसाठी अथक योगदान देणा-या प्रत्येक विभागातील प्रातिनिधीक स्वच्छताकर्मींचा विशेष गौरव करण्यात आला.

सांस्कृतिक सादरीकरणातून प्रदर्शित झाले स्वच्छतेचे कलारंग

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान काळात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांतूनही स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात आला. यामधील एकपात्री अभिनय स्पर्धेतील प्रथम पारितोषिकप्राप्त ऐरोलीच्या विबग्योर हायस्कुलचा विद्यार्थी सिध्दार्थ कांबळे तसेच दिंडी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेती शाळा ज्ञानदीप सेवा मंडळाची प्राथमिक शाळा करावे यांच्या स्वच्छता दिंडीला मोठ्या प्रमाणावर उपस्थितांची दाद मिळाली. आरंभ क्रिएशन्सच्या कलावंत समुहाने सादर केलेले स्वच्छता जनजागृतीपर पथनाट्यही लक्षवेधी ठरले. याप्रसंगी स्वच्छता ही सेवा अभियान कालावधीत यशस्वी झालेल्या विविध उपक्रमांची लघुचित्रफित प्रसारित करण्यात आली. दस-याच्या परस्परांना शुभेच्छा देताना स्वच्छतेतील मानांकन उंचावण्याचा निश्चयही यावेळी नागरिकांनी आयुक्त महोदयांसमवेत सामुहिक शपथ ग्रहण करताना केला.



Powered By Sangraha 9.0