
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या सप्टेंबर २०२५ मधील निर्णयानुसार इयत्ता १ ते ८ साठी TET (शिक्षक पात्रता परीक्षा) अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, सेवानिवृत्तीला पाच वर्षे किंवा अधिक कालावधी असलेल्या शिक्षकांनी दोन वर्षांच्या आत TET उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, पदोन्नतीसाठी TET अनिवार्य असून, अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांनाही TET उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा आदर राखून, शिक्षकांच्या हितासाठी कायदेशीर मार्ग स्पष्ट करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने डॉ. विशाल कडणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत शिक्षक बांधवांकडून सातत्याने मागणी होत आहे. शासनाच्या धोरणांचा आदर राखून, शिक्षकांच्या हितासाठी कायदेशीर पर्यायांचा विचार करणे ही काळाची गरज आहे.
TET सक्ती लागू असलेल्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असून, त्यासाठी सविस्तर कायदेशीर मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५, शनिवार, सकाळी ११:०० वाजता, बॅ. नाथ पै विद्यालय, नरदास नगर, भांडुप पश्चिम येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात ज्येष्ठ कायदेपंडित, ऍडव्होकेट रणजित चौहान मॅडम (नोटरी, भारत सरकार) कायदेशीर मार्गदर्शन करतील. यावेळी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे प्रमुख नेते डॉ. विशाल कडणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. अनिल बोरनारे, मराठी अध्यापक संघाचे डॉ. चंद्रशेखर भारती, तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र शासनाशी समन्वय साधून शिक्षकांच्या हितासाठी योग्य शिफारशी करता येतील, यावरही चर्चा होणार आहे. शासनाकडे असलेल्या अधिकारांचा सकारात्मक वापर करून शिक्षकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पुढील दिशा ठरविणे हे या चर्चासत्राचे उद्दिष्ट आहे, , असे डॉ विशाल कडणे यांनी सांगितले.
चर्चासत्रास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांनी https://forms.gle/9PK5B5VNLer4KbnA9 ह्या लिंकवर क्लिक करून गूगल फॉर्मवर नोंदणी करावी, असे आवाहन श्री. अनिल बोरनारे यांनी केले आहे. शिक्षकांच्या हितासाठी एकत्र विचारमंथन होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. चंद्रशेखर भारती, भगवान सागर, अनिल मुंडे, आरती बागले, दीपा सावंत यांनी केले आहे.