बीड : दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा. कुणाचे पैसे घेऊ नका, खोटे कामे करू नका. चांगल्या माणसाचे चांगलेच होते, असे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्यातून केले.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. याप्रसंगी आ. धनंजय मुंडे, माजी खासदार प्रितम मुंडे, माजी आ. महादेव जानकर, आ. मोनिका राजळे, आ.नमिता मुंदडा यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "भगवानबाबांनी सुरु केलेले सीमोल्लंघन आज एवढा पूर, अतिवृष्टी आणि अत्यंत अडचणीच्या काळातदेखील यशस्वी करून दाखवल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते. सीमोल्लंघन ही एक परंपरा आहे. सीमोल्लंघन किंवा आपला दसरा हा केवळ मेळावा नसून डोंगर कपाऱ्यांमध्ये कष्ट करणाऱ्या, ऊस तोडणाऱ्या आणि संघर्षाने उभे राहिलेल्या साध्या, फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे. एवढा नदीला पूर आलेला असतानाही संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मेळाव्याला आले आहेत. सोन्यासारखी माणसे इथे सोने लुटण्यासाठी आलेत."
जातीपातीच्या भींती गळून पडताना बघून आनंद झाला
"आज लोकांचे संसार पूरात वाहून गेले. त्यांचे दु:ख बघून माझ्या डोळ्यात अश्रू आलेत. पण या परिस्थितीत जातीपातीच्या सगळ्या साखळ्या गळून पडल्या आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला. या जातीपातीच्या भींती गळून पडताना बघताना मला खूप आनंद झाला. असा समाज आणि साखळी घडवणारा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. या लोकांचे दु:ख बघून मला झालेल्या वेदना शब्दांत मांडू शकणार नाही. पण या शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे, असा शब्द मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने देते," असे त्या म्हणाल्या.
आमच्या लेकराच्या ताटातून घेऊ नका
"एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी काम करते. सावरगाव लोकांना माहित नव्हते. पण मी इथे भगवानबाबांची मोठी मुर्ती उभी केली. ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून भगवान बाबांचे हे स्मारक तयार झाले. मुंडे साहेबांनी दिलेला वसा आणि वारसा मी कधीही खाली मान घालायला लावणार नाही. सामान्य माणसाचे हित माझ्यापासून कधीही दूर जाणार नाही. प्रत्येक जातीपातीच्या माणसासाठी मी लढणार आहे. गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. आमचाही विरोध नाही. पण आमच्या लेकराच्या ताटातून घेऊ नका एवढीच विनंती आहे. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यात रेल्वे आणली आणि आता इथे पाणी आणल्याशिवाय मला झोप येणार नाही," असेही मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.