मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जगप्रसिद्ध वानरशास्त्रज्ञ आणि संयुक्त राष्ट्र परिषदे’च्या शांतिदूत डॉ. जेन गुडाल यांचे वयाचा ९१ व्या वर्षी १ आॅक्टोबर रोजी केलिफाॅर्निया येथे निधन झाले (Dr. Jane goodall). अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला (Dr. Jane goodall). डॉ. जेन गुडाल यांनी आफ्रिकेत केलेल्या चिम्पांझीविषयीच्या संवर्धन आणि संशोधनकार्यासाठी त्या ओळखल्या जातात (Dr. Jane goodall).
सहृदय असणारी माणसे दुर्मीळ होत चालली आहेत. माणसे वयाने मोठी होत गेल्यावर ती कालबाह्य होतात. परंतु, डॉ. जेन गुडाल याला अपवाद होत्या. बदलत्या काळाशी सुसंगत होऊन त्याप्रमाणे वैचारिक ठेवण मांडणार्या तत्त्वज्ञ म्हणून जेन ओळखल्या जाता होत्या. गेल्यावर्षी ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत त्या पाच दिवसीय मुंबई दौर्यावर आल्या होत्या. त्यावेळी दै. मुंबई तरुण भारतच्या टीमने त्यांची भेट घेतली होती. गेल्या काही वर्षात पर्यावरणीय चळवळींना विद्रोहाचे रुप मिळाले आहे. पर्यावरणीय समस्यांची उकल ही विद्रोहातूनच होऊ शकते, असे भासवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. अशा परिस्थितीत गुडाल यांनी अत्यंत शांतपणे, सामंजस्याने पर्यावरणीय समस्यांची उकल ही निसरनवादी दृष्टिकोन ठेवूनच होऊ शकते, असे ठासवून सांगत.
डॉ. जेन गुडाल यांनी टांझानियात जाऊन चिम्पांझीविषयी केलेल्या संशोधनामुळे वानरविज्ञानात क्रांतिकारक भर पडली. चिम्पांझी वेगवेगळी साधने बनवू शकतात आणि त्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व असते, याचा उलगडा गुडाल यांनी केला. चिम्पांझी झाडाच्या छोट्या फांदीचा हत्यार म्हणून उपयोग करतात. जेन यांच्या संशोधनाने ‘हत्यार वापरणारा आणि बनवणारा प्राणी म्हणजे माणूस,’ ही माणसाची व्याख्या अपुरी आणि संदिग्ध ठरली. वारुळात डहाळी अलगद खुपसून त्यावरील मुंग्या खाण्याची युक्ती लहान चिम्पांझी हे मोठ्या चिम्पांझींचे निरीक्षण करून शिकतात, याचा उलगडा त्यांनी केला. या प्राण्यांच्या बुद्धिमत्तेबाबत गुडाल यांच्या इतके संशोधन कोणी केलेले नाही. २०२२ साली ‘संयुक्त राष्ट्र परिषदे’ने त्यांच्या नावाची घोषणा शांतिदूत म्हणून केली.
मैत्रीपूर्ण वर्तन
चिम्पांझी पूर्णतः शाकाहारी असतात, असा पूर्वी समज होता. परंतु, ते कीटक खातात. एवढेच नाही, तर ’कोलोबस’ जातीची छोटी माकडे आणि इतर छोटे प्राणी संगनमताने कोंडी करून शिकार करून खातात, असे जेन यांच्या निरीक्षणामुळे समजले. चिम्पांझींच्या गटात शारीरिक ताकदीप्रमाणेच आवाज मोठा असणे महत्त्वाचे असते. कारण, शत्रूला पळवून लावण्यास मोठा आवाज उपयोगी पडतो. ‘डेव्हिड’ नावाच्या लहानशा चिम्पांझीचा आकार आणि आवाजही लहान होता. एकदा त्याला जेनच्या तंबूत बिस्किटांचा पत्र्याचा रिकामा डबा सापडला. तो घेऊन डेव्हिड बाहेर पळाला. डब्यावर हाताने ठोकत, उतारावर डबा घरंगळवत धावू लागला. स्वतःबरोबर सतत डबा बाळगणे आणि जंगलात घुमत राहील असा आवाज करत राहणे, यांमुळे त्याला गटात पदोन्नती मिळाली. आता तो अधिकारक्रमात अव्वल गणला जाऊ लागला. डबा फुटून त्यातून घनगंभीर आवाज येणे बंद होईपर्यंत डेव्हिडचा अव्वल क्रमांक टिकला. नंतर मात्र त्याला पदावनती स्वीकारावी लागली. जेन या मानव असूनही गोम्बीतील चिम्पांझींनी त्यांचा स्वतःच्या टोळीत समावेश केला होता. सुमारे दोन वर्षे जेन एका टोळीतील सर्वांत शेवटच्या क्रमांकावरच्या अतिदुबळ्या चिम्पांझी-सदस्या होत्या.
व्यक्तिमत्त्व म्हणून अभ्यास
चिम्पांझींचा व्यक्ती म्हणून जेन यांनी अभ्यास केला. दोन प्रौढ व्यक्तींचे एकमेकांशी, आई आणि मुलाचे, भावंडांचे आपसांत, प्रौढ व्यक्तींचे गटात-सामाजिक वर्तन, चिम्पांझींच्या दोन गटांचे जमिनी क्षेत्रावर मालकी अधिकार राखतानाचे वर्तन अशा बाबींचे निरीक्षण आणि नोंदी जेन यांनी ठेवल्या. चाणाक्ष डेव्हिड, कपटी माईक, धीट गटप्रमुख गोलिथ, दांडगा हम्फ्रे, माणसाच्या मुलांवर माया करणारी गिगी मावशी, फ्लो माता आणि तिची मुले-फिगन, फेबन, फ्रॉइड, फिफी, आणि फ्लिटं, जेन यांना टोळीतून हाकलून काढणारा फ्रोडो या चिम्पांझींचे वर्णन जेन यांनी केले आहे. जेन यांची हजारो टिप्पणे ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा’ने अभ्यासकांसाठी जपून ठेवली आहेत.