डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनातून विश्वाला सामाजिक समतेची दिशा दिली : देवेंद्र फडणवीस

02 Oct 2025 17:40:20

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनातून विश्वाला सामाजिक समतेची दिशा दिली. हा दिवस अखंड विश्वासाठी चिरंतन प्रेरणादायी ठरो, अशी मनोकामना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कामठी, नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ’६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त १ आणि २ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र महोत्सव आयोजत करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भगवान गौतम बुद्ध यांचे दर्शन घेतले आणि महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

संविधानाचा गौरव करत ते म्हणाले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे भारताच्या प्रगतीचे मूळ आहे. त्यातूनच देश आज चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसर्‍या क्रमांकावर पोहोचत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील म्हणाले गीता, बायबल व कुराणपेक्षा संविधान जास्त महत्त्वाचे आहे, कारण संविधानामध्ये शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार अंतर्भूत आहे. आपल्या संविधानावर भगवान गौतम बुद्ध यांच्या समता व बंधुतेच्या विचारांचा प्रभाव आहे.” दोन दिवस असलेल्या या धम्मचक्र महोत्सवामध्ये विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


Powered By Sangraha 9.0