समग्र व एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित 'स्व'चा विकास यातूनच जगासमोर गौरवशाली उदाहरण प्रस्तुत होईल: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

02 Oct 2025 18:48:04

मुंबई : भारताच्या उत्थानाची प्रक्रिया वेगाने घडते आहे. तथापि आपण अजूनही त्याच धोरणांच्या, व्यवस्थांच्या चौकटीत राहूनच विचार करत आहोत. आपण इतर राष्ट्रांसोबत इतके पुढे गेलो आता अचानक बदल करणे लगेच शक्य होणार नाही. समग्र आणि एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित स्वतःचा विकास मार्ग आखून आपण जगासमोर एक गौरवशाली उदाहरण प्रस्तुत केले पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

संघ शताब्दीनिमित्त देशभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात विजयादशमी उत्सव संपन्न झाले. गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या रेशीमबाग येथील मैदानावर भव्य स्तरावर हा उत्सव संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, प्रयागराजमध्ये महाकुंभ झाला. आधुनिक व्यवस्थापनाचे सर्व किर्तीमान बिंदू भेदून एक विश्वविक्रम महाकुंभने केलाच. मात्र भारतात श्रद्धा आणि एकात्मतेची एक लाट यावेळी दिसून आली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात प्रचंड दुःख आणि क्रोधाची लाट पसरली. सरकार आणि भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सेनेचे शौर्य, कौशल्य यावेळी दिसून आले. ती घटना आपल्याला एक गोष्ट शिकवून गेली की, जरी आपण सर्वांप्रती मित्रभाव ठेवायचा प्रयत्न करत असू तरी, आपल्या सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला अधिक सजग राहिले पाहिजे, समर्थ बनले पाहिजे.

पुढे ते म्हणाले, अमेरिकेने आपल्या फायद्यासाठी आयात शूल्क धोरण लागू केले. मात्र त्याचा फटका इतर राष्ट्रांना बसतोय.अमेरिकेने स्वतःच्या स्वार्थासाठी अलिकडेच लागू केलेले आयात शुल्क धोरण आपल्याला काही पैलूंवर पुनर्विचार करण्यास नक्कीच भाग पाडणार आहे. जग परस्परावलंबनावर चालते. तथापि वैश्विक जीवनाची एकता लक्षात घेऊन स्वावलंबी होऊन जीवन जगणे आवश्यक आहे. दुसऱ्या देशांवर असलेली आपली निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी, स्वावलंबनाला दुसरा पर्याय नाही.

श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ मधील झालेल्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की, अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे. सरकार आणि प्रशासनाचे समाजापासून, समाजाच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष, कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासकीय प्रक्रियांचा अभाव ही असंतोषाची नैसर्गिक कारणे आहेत. केवळ लोकशाही मार्गांनीच समाज आमूलाग्र बदल साध्य करू शकतो. आपल्या शेजारी देशांमध्ये आपल्या स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यापेक्षा शांतता, स्थिरता, प्रगती भारताच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

संघाचे शताब्दी वर्ष हा दृढसंकल्प करण्याचा क्षण असल्याचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. ते म्हणाले, संकल्प कितीही मोठा असो त्याग, तपस्या आणि सत्याच्या प्रति निष्ठा असेल तर केलेला संकल्प पूर्ण होईल. समरस-संघटित समाजासाठी तसेच समाजात एकता व बंधुत्वाची भावना मजबूत करण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. समाजात सेवा, सद्भाव आणि विशेषतः स्वावलंबनात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवी. यासाठी निश्चितच प्रत्येक स्वयंसेवकाचे जीवन धर्म आणि राष्ट्रापती समर्पित राहिल.

कार्यक्रमादरम्यान व्यासपिठावर विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते. यावेळी नागपुरातील २० हजारहून अधिक पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवक संघासाठी उपस्थित होते. त्याचबरोबर देश विदेशातील मान्यवर व्यक्ती, संत-महंतगण देखील कार्यक्रमाला उपस्थित होता.

सामाजिक वर्तनात बदल केवळ भाषणे किंवा ग्रंथांमधून येत नाही. त्याकरिता समाजाचे व्यापक प्रबोधन आवश्यक आहे. व्यक्ती निर्माणातून समाज परिवर्तन आणि समाज परिवर्तनातून व्यवस्थापरिवर्तन हाच देशात परिवर्तन आणण्याचा मार्ग आहे. आपल्या देशात विविधता असूनही, आपण सर्व एका मोठ्या समाजाचा भाग आहोत. समाज, देश, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून आपण एक आहोत. ही मोठी ओळख आपल्यासाठी सर्वोपरि आहे, आपण ती नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे; असे सरसंघचालक म्हणाले.

एकात्म भारत निर्माणात संघाचे महत्त्वाचे योगदान राहील

नागपूरची पवित्र धरती आधुनिक भारताचे विलक्षण निर्माते असलेल्यांच्या पावन स्मृतींनी जोडलेली आहे. त्यामध्ये डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर या दोन्ही डॉक्टरांच्या विचारांचा माझ्या जीवननिर्माणात महत्त्वाचे स्थान राहिले. डॉ. आंबेडकरांच्या संविधानामुळे मी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकलो, तर डॉ. हेडगेवारांच्या विचारांमुळे समाज आणि राष्ट्राकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन तयार झाला. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक समरसता यामुळे माझी जनसेवेप्रतिची भावना अनुप्राणित राहिली. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जितका विशाल झालाय, तितकाच तो सशक्तही झाला आहे. समरस आणि एकात्म भारत निर्माणात संघाचे महत्त्वाचे योगदान राहिल, हा मला विश्वास आहे.
- रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती


Powered By Sangraha 9.0