संघ म्हणजे आपुलकीचा विस्तार...

    02-Oct-2025
Total Views |

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली नागपुरात झाली. ही संघटना आज १०० वर्षांनंतर देशव्यापी झाली आहे आणि समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संघस्वयंसेवक कार्यतत्पर आहेत. संघस्थापना आणि संघशताब्दीच्यानिमित्ताने संघकार्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचा आढावा घेणारा हा लेख...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा शताब्दीपर्यंतचा प्रवास ही संघगाथा आहे, असे म्हणता येईल. प्रारंभी झालेली उपेक्षा, निंदा, त्यानंतर झालेला विरोध, सातत्याने झालेली टीका, त्यानंतर संघाबद्दल निर्माण झालेले कुतूहल आणि त्यानंतरच्या टप्प्यात संघविचाराला समाजाकडून मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा, संघाचे सर्वत्र होत असलेले स्वागत असा संघाचा शतकभरातील प्रवास राहिला आहे. हा प्रवास निश्चितपणे स्वयंसेवकांच्या त्याग आणि परिश्रमातून झालेला आहे. संघाला झालेला विरोध पचवून आणि त्याबरोबरच कोणाशीही वैर न राखता, समाजात कटुता उत्पन्न होऊ न देता, संघाने सारा समाज आपलाच आहे, या भावनेने हे काम सुरू ठेवले, त्याचेच हे फळ. त्यामुळेच देशात सर्वत्र संघविचारांचे स्वागत तर होत आहेच, शिवाय संघाच्या कामात सहभागी होण्यासाठीदेखील समाज उत्सुक आहे.

संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी १९२५ साली केलेल्या संघाच्या स्थापनेपासूनच ही संघटना अत्यंत रसरशीत राहील, अशाच पद्धतीने संघाची कार्यपद्धती विकसित केली. डॉ. हेडगेवार समाजकारणात सक्रिय होते, ते काँग्रेसमध्येही सक्रिय होते. हिंदू समाजाचे संघटन बांधून या देशाला परमवैभवाला नेण्याचे ध्येय त्यांनी, मनात बाळगले होते आणि त्यांची या विचारांची भट्टी कितीतरी वर्षे आधी अखंडपणे सुरू होती. त्या भट्टीतून, त्या मुशीतून संघ तयार झाला. आपण पारतंत्र्यात का गेलो याचे उत्तर शोधताना त्यांच्या हे लक्षात आले की, बहुसंख्य असलेल्या या देशातील हिंदू समाज असंघटित आहे, विस्कळीत आहे, भेदा-भेदांमध्ये विभागला गेलेला आहे. त्यामुळे या देशातील हिंदू समाजाला संघटित करण्याचे मोठे लक्ष्य त्यांनी समोर ठेवले होते. जे आवश्यक काम असेल ते तातडीने सुरू करायचे, अशी डॉक्टरांच्या कामाची पद्धत होती. म्हणून आवश्यक काय होते, तर हिंदू समाजाचे संघटन, ते त्यांनी हाती घेतले. संघाच्या स्थापनेनंतर संघाचे नाव ठरले, कार्यपद्धती विकसित होत गेली परंतु, या सर्व गोष्टी नंतर घडल्या. आधी समाज संघटित करण्याचे काम सुरू झाले.

कार्यकर्ते घडविण्याचे सूत्र

संघाला मिळालेले परिश्रमी, अडचणींवर मात करणारे आणि निःस्वार्थी असे लाखो कार्यकर्ते, हीच संघाची फार मोठी उपलब्धी म्हणता येईल. हे कार्यकर्ते कसे मिळाले, तर संघाचे याबाबतीतही एक सूत्र राहिले. ते म्हणजे, ‘आहे तसा घ्यायचा आणि पाहिजे तसा घडवायचा,’ या सूत्राने संघ काम करत राहिला. कार्यकर्त्यांना संस्कार देत राहिला. त्यातूनच कार्यकर्त्यांची जडणघडण झाली. संघाच्या कार्यपद्धतीमध्ये ज्या गोष्टीला अनन्य महत्त्व आहे, ती गोष्ट म्हणजे संघाची शाखा. ही शाखा म्हणजे एकार्थी ‘पॉवर हाऊस’ आहे. ‘पॉवर हाऊस’मध्ये जशी वीज तयार होते आणि तिचा वापर अनेक कारणांसाठी पुढे होतो, तशाच पद्धतीने संघशाखेत कार्यकर्ते तयार होतील आणि समाजजीवनाच्या सार्‍या क्षेत्रांमध्ये जाऊन ते आवश्यक ते समाजपरिवर्तनाचे काम करतील, हा संघविचार आहे. संघाला सातत्याने विचारणा होत राहिली की, ‘संघ काय करणार?’ त्यावर संघाचे उत्तर असायचे की, ‘संघ संघटना करणार.’ संघटना करून काय करणार, तर पुन्हा हेच उत्तर असायचे की, ‘आम्ही संघटना करणार.’ या विचारामागील इंगित हेच होते की, संघसंस्कारित कार्यकर्ते सारे काही करतील आणि खरोखरच समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संघ कार्यकर्ते उत्कृष्ट काम करत आहेत. संघ दीर्घकाळ टिकला त्याचे हेच सूत्र आहे की, संघटनात्मक कामाला संघाने विलक्षण महत्त्व दिले.

सार्‍या समाजाचे संघटन

संघाच्या उपलब्धीतील किंवा संघाने काय साधले, यातील आणखी एक गोष्ट म्हणजे संघ एवढे काम कशामुळे उभे करू शकला, तर ‘आपुलकीचा विस्तार म्हणजे संघ’ हे त्याचे उत्तर होय. ‘हा समाज माझा आहे’ असे केवळ घोषणेपुरते न म्हणता, स्वयंसेवकांचा व्यवहारही समाजात तसाच असेल, याची उदाहरणे डॉ. हेडगेवार यांनी घालून दिली. मुळात, डॉक्टरांच्या विचारांमध्ये, कृतीमध्ये कोठेही नकारात्मकता नव्हती. हे काम होकारात्मक, सकारात्मक पद्धतीनेच चालेल, वाढेल हेच संघात सतत सांगितले जाते, शिकवले जाते. वास्तविक जाती, प्रांत, भाषा यांचा आधार घेऊन अनेक संघटना उभ्या राहिल्या; पण ते काम जातीय ठरले नाही. उलट, “समग्र हिंदू समाजाचे संघटन करणार्‍या संघाचे काम मात्र जातीय,” अशी टीका केली गेली. वास्तविक संघाची नेहमी हीच भूमिका राहिली आहे की संघाला समाजात वेगळे संघटन उभे करायचे नसून, सार्‍या समाजाचेच संघटन करायचे आहे. सार्‍या समाजाचेच संघटन बांधायचे असल्यामुळे, सर्वांना आपल्या प्रेमाच्या व्यवहाराने आपलेसे करण्यावर संघाचा भर राहिला आहे. जे संघात येत नाहीत, त्यांच्याबद्दलही संघकार्यकर्ते नेहमीच आशावादी असतात. म्हणून संघात नेहमी हेच सांगितले जाते की, संघस्थानावर काहीजण पोहोचले आहेत आणि काहीजण पोहोचायचे आहेत. यातून संघ कशापद्धतीने काम करतो, याचा नेमका बोध सहजच होईल.

संघाच्या कार्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, संघात कधीही व्यक्तिमाहात्म्याला किंवा व्यक्तिस्तोमाला जागा दिली गेली नाही. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनीच घालून दिलेला हा धडा आहे. ते तर या संघटनेचे संस्थापक होते, त्यांना हे सहज शक्य होते. मात्र, जाणीवपूर्वक त्यांनी व्यक्तिस्तोम टाळले. डॉ. हेडगेवार यांची जन्मशताब्दी १९८८-८९ साली, देशभर अनेकविध कार्यक्रमांनी संघाने साजरी केली. त्यावेळी समाजातील अनेकांना संघ माहीत होता किंवा या कार्यक्रमांमुळे संघ माहीत झाला. परंतु, या संघाचे संस्थापक कोण, हे मात्र अनेकांना माहितीच नव्हते. संघाने समाजहिताचा जो विचार मांडला, तो प्रत्येक विचार कृतीत आणला. त्यात कोणा व्यक्तीला महत्त्व दिले गेले नाही. विचारांना आणि त्यामागे शक्ती उभी करण्याला महत्त्व दिले, त्याचेच हे उदाहरण होय.

संघस्वयंसेवकांचा सेवाभाव

सेवेच्या क्षेत्रातही अगदी डॉ. हेडगेवार यांनी संघस्थापना केल्यापासून, स्वयंसेवक सक्रिय राहिले आहेत. त्याचेही उदाहरण डॉक्टरांनीच घालून दिले होते. भारत-चीन युद्धातही संघस्वयंसेवकांनी मोठ्या साहसाने, सैन्याला आवश्यक ती मदत केली होती. आंध्रमधील वादळ असो, मोरबीतील धरणफुटी असो किंवा कच्छमधील पूर असो वा कोणतीही आपत्ती आलेली असो, अशाप्रसंगी स्वयंसेवक मदतीसाठी धावून जातात. हा सेवाभावही त्यांच्यात संघसंस्कारांमधूनच उत्पन्न होतो. या सेवेच्या जोडीला, स्वयंसेवकांनी हजारो सेवाकार्ये देशात सुरू केली आहेत. ती करताना ‘सेवेसाठी सेवा’ हे सूत्र नाही, तर ‘समाजासाठी सेवा’ हे सूत्र असते. त्याबरोबरच ‘सेवा म्हणजे उपकार नाही, तर सेवा म्हणजे कर्तव्य,’ या भावनेने स्वयंसेवक सेवाकार्य करतात.

संघाचे काम सार्‍या समाजाला बरोबर घेऊन पुढे जाण्याचे आहे. त्यातूनच समाजाची आणि देशाची प्रगती होईल, यावर संघाचा विश्वास आहे. आम्हाला कोणालाही जिंकायचे नाही परंतु, आम्हाला कोणी जिंकू शकणार नाही, अशी शक्ती आमच्याकडे असायला हवी. संघाच्या प्रार्थनेतही स्वयंसेवक याचाच उच्चार करतात. हे सारे नक्कीच साकार होणार आहे.



- श्रीधरपंत फडके

(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)