पाकी पापाचा भरता घडा...

02 Oct 2025 10:41:07

पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओकेमधील स्थानिकांच्या मूलभूत मागण्यांसाठीचे आंदोलन दडपण्यासाठी, पाकिस्तान सरकारने सैन्य कारवाईचा आधार घेतला. त्यामुळे हे आंदोलन अधिकच हिंसक झाले. पीओकेमधील जनतेने अलीकडेच पिठांच्या वाढत्या किमती, नियमित वीजपुरवठा अशा दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठीच्या मागण्यांबरोबरच काही राजकीय मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. यामध्ये ‘संयुक्त अवामी अ‍ॅक्शन कमेटी’च्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन हिंसक झाले. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले आणि २२ पेक्षा अधिक जखमी झाले. या घटनेनंतर इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आंदोलनकर्त्यांवर पाकिस्तान सरकारने केलेली ही हिंसक कारवाई पाकिस्तानच्या अत्याचारी राजवटीचा चेहरा ठरतो.

शाहबाज शरीफ यांच्या सरकारविरोधात पाकिस्तानच्या विविध प्रांतांत असंतोष आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात तेथील पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व. परिणामी, प्रशासनामध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली असून, त्यामुळे सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि पीओकेसारख्या प्रांतांमध्ये स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पाकिस्तानच्या राजकारणातील लष्कराचा वाढता हस्तक्षेप आणि शाहबाज शरीफ यांच्या निष्क्रियतेमुळे पाकिस्तानी नागरिकांच्या नशिबी संघर्ष नित्याचाच. बलुचिस्तानमध्ये महिलांचे गायब होणे, छळ आणि अत्याचार यांसारख्या घटनांनी सामाजिक असंतुलन अधिक वाढले. यामुळे तेथील जनता त्रस्त आहे.

पीओकेमधील जनतेचा उठाव पाकिस्तानातील दीर्घकालीन सामाजिक आणि प्रशासनिक दोषांवर प्रकाश टाकतो. आज पाकिस्तानात मानवाधिकारांचे उल्लंघन हा आणखी गंभीर मुद्दा झाला आहे. बलुचिस्तान, पीओके आणि इतर सीमावर्ती प्रांतांमध्ये राहणार्‍या जनतेच्या स्वातंत्र्याचा सर्वार्थाने संकोच होत असताना, जागतिक समुदाय मात्र याकडे दुर्लक्ष करतात. सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे पसरलेला असंतोष आणि राजकीय अस्थिरता हे दीर्घकालीन संकट आज पाकिस्तानसमोर आहे. मात्र, भारताला पाण्यात पाहणे हे एकमेव जीवनाचे ध्येय असलेल्या पाकिस्तानी राजकारण्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, ही सत्य परिस्थिती.

पाकिस्तानने आजवर पंजाबमधील मुस्लिमांनाच स्थान दिले, मोठे केले. या पंजाबी मुस्लिमांनी बलुचिस्तानसारख्या प्रांतातून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपसा केला. मात्र, त्या बदल्यात बलुचिस्तानला मिळाली ती फक्त आश्वासनेच! यासाठी जेव्हा बलुचिस्तानने आंदोलन सुरू केले, तेव्हा याच पाकिस्तान सरकारने लष्कराच्या प्रभावाखाली येत, बलुचिस्तान आर्मीला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून संबोधले. त्यांच्यावर सातत्याने हल्ले केले. आज पाकिस्तानचा डोळा पीओकेमधील नैसर्गिक साठ्यांवर आहे. पाकिस्तानातील असे नैसर्गिक साठे अमेरिकेच्या दावणीला बांधून, त्याबदल्यात पैसे उभे करण्याचा विचार पाकिस्तानी सरकार करत असल्याची चर्चा जागतिक राजकारणाच्या पटलावर आहे. एखाद्या सरकारने निधी उभारणी कशी करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र, हे करताना किमान त्या भागातील नागरिकांचे हित जपण्याचे सौजन्यही पाकिस्तानातील शरीफ सरकार दाखवू शकलेले नाही.

आज पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची खालावलेली असून, सातत्याने प्रत्येक देशाकडे आशेने बघण्यापलीकडे शरीफ सरकारकडे काहीही पर्याय नाही. पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईमुळे आधीच माणसे मरत आहेत, जी कशीबशी जगली आहेत, त्यांना सरकारी धोरणे मारत आहेत आणि याविरोधात जाऊन आपले म्हणणे मांडणार्‍यांचा खून खुद्द पाकिस्तानचे सरकारच सैन्याला सुपारी देऊन करत आहे. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये असंतोष वाढीस लागला असून, या असंतोषाने सैन्यातही शिरकाव केला आहे. सध्या पीओकेमध्ये असलेले पाकिस्तानी सैन्य वेतनवाढीच्या मागणीवरून बंड पाकिस्तानी हुकुमतीचे ऐकत नाही. त्यामुळे पीओकेमधील आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी इस्लामाबादवरून तीन हजार सैनिकांची कुमक पाठवावी लागली होती. शरीफ सरकारची पाकिस्तानी लष्कर नावाच्या गुंडाच्या ताकदीवरची बदसुलुखी अशीच सुरू राहिली, तर लवकरच नेपाळसारखेच संपूर्ण पाकिस्तानमध्ये आंदोलन भडकेल, यात शंका नाही!



- कौस्तुभ वीरकर






Powered By Sangraha 9.0