दसरा : भारताचा पहिला स्वातंत्र्योत्सव

02 Oct 2025 12:56:34


आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा संहार करून, प्रजाजनांना त्याच्या भयापासून मुक्त केले. प्रभू श्री रामाचा पराक्रम सर्वांनाच ठावूक आहे. हा पराक्रम, त्यामागील भूमिका आणि दसरा म्हणजे विजयादशमी हा स्वातंत्र्यदिन कसा याचा घेतलेला मागोवा...

रामाचा १६वा वाढदिवस नुकताच झाला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी विश्वामित्र ऋषींचे राजा दशरथाकडे येणे झाले. राजाने त्यांचे स्वागत केले, त्यांना उच्चासनावर बसवले, त्यांचा सत्कार केला. ऋषींनी राजाचे, परिवाराचे आणि त्याच्या मित्रांचे कुशल पुसले. तसेच प्रजेचे आणि ग्रामीण भागाचेही कुशल विचारले. त्याने जिंकून घेतलेले राजे त्याच्या आज्ञेत आहेत ना, हेदेखील विचारले. सर्व समाधानकारक असल्याचे सांगून राजा म्हणाला, “मुने! तुम्हाला काय हवे ते सांगा; मी तुमची इच्छा निश्चित पूर्ण करेन!”

विश्वामित्रांनी दशरथाला त्यांच्या यज्ञात विघ्न आणणार्‍या राक्षसांबद्दल सांगितले, “मारीच आणि सुबाहू हे दोन मायावी राक्षस यज्ञ वेदीवर रक्त आणि मांस टाकतात. त्या राक्षसांचे दमन करण्यासाठी, मला तुझा ज्येष्ठ पुत्र राम हवा आहे. केवळ दहा दिवसांसाठी रामाला माझ्याबरोबर पाठव. या राक्षसांचा नाश करण्यास तो समर्थ आहे.” दशरथ राजा विचारात पडला, जेमतेम १६ वर्षांचा राम कसे काय त्या क्रूर राक्षसांशी लढू शकेल? हे राक्षस कूटयोद्धे आहेत. ते समोरासमोर लढाई करत नाहीत, तर ते मायावी शक्ती वापरतात, ते फसवतात. त्यांच्याशी माझा लहान राम कसं लढेल?

विश्वामित्रांनी पुढे त्राटिकेची कथा सांगितली, पूर्वी सुकेतू नावाचा एक यक्ष या भागात राहात होता. त्याला एक अतिशय सुंदर कन्या होती, त्राटिका. तिचा विवाह झाला; तिला दोन मुले झाली मारीच आणि सुबाहू. परंतु, दुर्दैवाने तिच्या पतीचा लवकरच मृत्यू झाला. त्यानंतर तिच्यामध्ये सत्तेचा मोह आणि धनाचा लोभ निर्माण झाला. ती आणि तिची मुले अत्यंत क्रूर झाले. ते कोणावरही अन्याय करण्यास मागे पुढे पाहीनासे झाले. तिच्यामुळे कारूष आणि मालद ही दोन जनपदे निर्मनुष्य झाली. त्यांच्या दहशतीमुळे तेथील नागरी व्यवस्थाच पूर्णपणे कोलमडून गेली.

एके काळी समृद्ध आणि सुंदर असलेली ती दोन्ही गावे, त्राटिकेच्या अत्याचाराने ओसाड पडली. घरे उजाड झाली, रस्ते निर्मनुष्य झाले, शेती नापीक झाली. व्यापार, उद्योगधंदे थांबले, अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. त्राटिकेच्या भयाने हैराण होऊन, तेथील लोक गाव सोडून पळून गेले. वनांमध्ये जे ऋषींचे आश्रम होते, त्यांच्यावरसुद्धा यांचे हल्ले सुरू झाले. अगस्ती मुनींचा आश्रम याच प्रदेशात होता. या त्रासाला कंटाळून तेही तिथून निघून गेले.

“राजा दशरथा! हा खेळ केवळ मारीच आणि सुबाहू यांचा नाही. याचे मूळ दूर लंका नगरीत आहे. तिथे बसून तो राक्षसराज रावण यांना कळसूत्रीसारखे नाचवतो. रावण स्वतः विद्ध्वंस करायला कुठेही जात नाही. ही कामे तो मारीच आणि सुबाहूसारख्या लोकांकडून करवून घेतो. राजन्! इक्ष्वाकूंनी उभे केलेले हे साम्राज्य आणि ही संस्कृती तो रावण उद्ध्वस्त करू पाहात आहे. त्याला थांबवायलाच हवे! ” रावण काय करतो, हे आपल्याला चित्रकूट आणि नंतर दंडकरण्यात राहणार्‍या ऋषींकडून कळते.

रावणाचे भाऊ-खर आणि दूषण, बहीण-शूर्पणखा आणि त्याने नेमलेले राक्षस, दंडकारण्यापासून ते जवळपास बिहारपर्यंतच्या प्रदेशात दहशत माजवत आहेत. ते नरभक्षक आहेत. त्यांनी वनात राहणार्‍या लोकांना मारले आहे, तेथील आश्रमात राहणार्‍या ऋषींना मारले आहे. शूर्पणखा जेव्हा रामाकडे येते, तेव्हा तीसुद्धा म्हणते, “तू जर एकपत्नीव्रत घेतले असशील, तर ही मी आत्ता या सीतेला मारून खाते! मग तू आणि मी या वनात आनंदाने विहार करू!” रावणाने आणि याच्या इतर राक्षसींनीदेखील, सीतेला अशीच मारून खाण्याची धमकी दिली होती.

विश्वामित्र सांगतात, “या राक्षासाला आवरणे एक मोठाच प्रश्न आहे आणि त्यासाठी मला रामाशिवाय दुसरा कोणीच दिसत नाही.” शेवटी वाशिष्ठांच्या सांगण्यावरून दशरथ राजा, विश्वामित्रांच्या बरोबर रामाला पाठवायला तयार होतो. सावलीप्रमाणे त्याची सोबत करणारा लक्ष्मणदेखील त्याच्याबरोबर निघतो. ज्यावेळी त्राटिकेवर बाण चालवायची वेळ येते तेव्हा मात्र, स्त्रीवर कसे काय शस्त्र चालवायचे? अशा विचाराने राम थबकतो. तेव्हा विश्वामित्र रामाला सांगतात, “ही राक्षसी प्रजेला त्रास देते. देश निष्कंटक करायची जबाबदारी राजाची असल्याने तिचा वध करून, चारही वर्णांचे रक्षण करणे तुझी जबाबदारी आहे.

चारही वर्णांच्या हिताचे काम करणे, तुझी जबाबदारी आहे. रामा! मागे एक मंथरा नावाची भृगु ऋषींची पत्नी होती. ती स्वतःला विद्वान समजत असे. ती लोकांना चुकीचे शिकवू लागली, आपल्याला राजाची गरज नाही. राजाशिवायसुद्धा आपला समाज चालू शकतो. अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था मोडायला निघालेल्या या ऋषिपत्नीचा वध विष्णूने केला होता. रामा! ते स्मरून तू या त्राटिकेचा वध कर! क्षत्रिय म्हणून हे तुझे कर्तव्य आहे. तुला तुझे कर्तव्य कठोर वाटले, तरी ते केले पाहिजे.” विश्वामित्रांनी कर्तव्याची आठवण करून दिल्यावर, रामाने त्राटिकेचा वध केला. त्याने सुबाहूचाही वध केला, मारीच मात्र पळून गेला. कुठे? लंकेत, रावणाकडे! कारण या सगळ्याचे मूळ लंकेत होते.

पुढे श्रीरामाने दंडकारण्यात मोठा पराक्रम केला. १४ हजार नरभक्षक राक्षसांचा संहार करून, त्यांना यमसदनी पाठवले आणि ते वन सुरक्षित केले. त्यामुळे तेथील वनवासी आणि ऋषी भीतीमुक्त झाले. नंतर जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले, त्यावेळी रामाने सुग्रीवाशी मैत्री केली. अधर्माशी होऊ घातलेल्या निर्णायक संग्रामाची ही सुरुवात होती. सुग्रीवाच्या मदतीने रामाला राक्षसी शक्तींच्या मुळाशी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. उत्तरेतील राजा रामाने आणि दक्षिणेतील राजा सुग्रीवाने एकत्र येऊन राक्षसांच्या केंद्रावरच म्हणजे लंकेवर हल्ला केला. तिथे रावणाशी महासंग्राम झाला. अखेरीस रामाने रावणाचा वध करून धर्माचा विजय निश्चित केला. या एका घटनेने केवळ भारतच नव्हे, तर लंकासुद्धा भयमुक्त झाली.

रामाने केवळ दहशतीचा नाश केला नाही, तर त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजीही घेतली. त्याने रावणाच्या जागी सात्त्विक वृत्तीच्या विभीषणाला राजगादीवर बसवले. तो आयोध्येच्या राजाच्या अमलाखाली राहिला. पुन्हा कधीही लंकेच्या राक्षसानी भारताकडे डोळे वर करून पहिले नाही. या युद्धात रामाकडे केवळ युद्धकौशल्य आहे असे नाही, तर त्याच्याकडे विविध ऋषींनी संशोधन करून दिलेली दिव्य अस्त्र आहेत. नवरात्रीमध्ये केली जाणारी शारदेची पूजा ही अशाच संशोधनाची पूजा आहे.

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दशमीला रावण मारला गेला, तो दिवस भारतातील लोक अत्यंत आनंदाने साजरा करू लागले. हा दिवस म्हणजे रावणाच्या पारतंत्र्यातून मुक्तीचा दिवस. रावणाचे राक्षस जे दंडकारण्य, चित्रकूट आदि ठिकाणी राज्य करून तेथील राहिवासींना छळत होते, त्यांच्या त्रासापासून सुटका झाल्याचा आनंद इतका विलक्षण होता की, अजूनही आपण तो स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. कसा? तर सीमोल्लंघन करून आणि आधर्माशी लढायला सदैव सज्ज असावे म्हणून, शस्त्रांची पूजा करून!
Powered By Sangraha 9.0