अर्गला स्तोत्र पठण का करावे?

    02-Oct-2025
Total Views |






दुर्गा सप्तशती पठण करण्यापूर्वी कवच, अर्गला आणि कीलक स्तोत्र पाठ करण्याचा प्रघात आहे. आपण मागील भागात कवच पठणाचे महत्त्व जाणून घेतले होते. आजच्या भागात आपण अर्गला स्तोत्र का पठण करावे, हे जाणून घेणार आहोत.

भारतीय अध्यात्मशास्त्रात मंत्र, स्तोत्र आणि पाठ यांना केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे, तर अंतःकरणाच्या शुद्धीचे, चैतन्य जागवण्याचे आणि आत्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करणारे साधन मानले जाते. अर्गला स्तोत्र हे देवीमहात्म्याचा एक महत्त्वपूर्ण भाग असून, त्याचे स्थान चंडी पाठाच्या पूर्वसंधीला आहे. जिथे साधकाचे चित्त बाह्य विषयांपासून मुक्त करून मातृशक्तीकडे वळवले जाते. अर्गला स्तोत्र हे भक्ताच्या अंतःकरणातील अडथळे दूर करून त्याला देवीच्या सान्निध्यात नेणारे, देवीतत्त्वाशी मानसिक पातळीवर संलग्न होण्याचे एक प्रभावी साधन आहे. श्रद्धा, भावना आणि मंत्रचैतन्य यांच्याशी एकरूप होऊन केलेले अर्गला स्तोत्राचे पठण हे केवळ शब्दांचा उच्चार नसून, आत्मा आणि परमात्म्याच्या संवादाचे द्वार आहे.

‘अर्गला’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे अडसर, अडथळा किंवा बंद करणारा. जर घराचे दरवाजे बंद असतील, तर कोणीही सहज प्रवेश करू शकत नाही. तसेच अर्गला स्तोत्र हे चित्ताच्या द्वारावर एक आध्यात्मिक कवच निर्माण करते. हे स्तोत्र वाचल्याने बाह्य विकार, अस्थिरता आणि चित्तविचलन साधकाच्या मनात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे अर्गला स्तोत्र हे चंडी पाठाच्या आधी वाचले जाते, जेणेकरून साधकाचे मन अंतर्मुख होऊन देवीच्या तत्त्वाशी जोडले जाईल.


साधना सुरू करण्यापूर्वी चित्तशुद्धी आवश्यक असते. अर्गला स्तोत्र हे चित्ताला देवीमुखी करण्याचे कार्य करते मात्र, केवळ पाठ पुरेसा नाही, मंत्रचैतन्य म्हणजे श्रद्धा, भावना आणि एकाग्रतेने उच्चारलेला मंत्रच साधकाला फल देतो. भावनाशून्य पाठ केवळ शब्दांचा उच्चार ठरतो; त्यातून साधकाला अपेक्षित आध्यात्मिक परिणाम मिळत नाही. मंत्रात चैतन्य जागवण्यासाठी साधकाने प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून, भावनेने उच्चार करणे आवश्यक आहे. अर्गला स्तोत्रात देवीच्या विविध रूपांची स्तुती आहे. जयंती, मंगला, काली, भद्रकाली, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा, स्वधा ही सर्व रूपे देवीच्या विविध शक्तींचे प्रतीक आहेत.

जीवनाच्या चार गरजा आणि देवीची कृपा

अर्गला स्तोत्रात चार मूलभूत प्रार्थना आहेत, रूपं देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि. रूपं देहि म्हणजे सौंदर्य, आरोग्य, तेज, ओज, वाणीची मधुरता, मनाची प्रसन्नता याची प्राप्ती मला या स्तोत्र पठणातून प्राप्त व्हावी अशी देवीकडे मागणी केली आहे. जयं देहि म्हणजे विजय, केवळ युद्धात नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जय प्राप्त व्हावा अशी कामना केली आहे. यशो देहि म्हणजे कीर्ती, प्रतिष्ठा, सत्कर्मांची प्रशंसा आणि समाजात सन्मान यश, हे तुम्हाला केवळ लौकिक जगतातील प्रसिद्धी प्रदान करत नसून, पारलौकिक जगतातसुद्धा तुम्हाला आत्मउन्नतीचा मार्ग प्रशस्त करून देत असते. द्विषो जहि म्हणजे शत्रूंचा नाश, केवळ बाह्य नव्हे, तर अंतःशत्रू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. इथे मनाला संभ्रमित करणारे, विचलित करणारे जे षड्रिपु आहेत, त्यांच्यावर मात करण्याचे सामर्थ्य देवीने प्रदान करावे, अशी आळवणी केली आहे. त्याचप्रमाणे लौकिक जगतात तुमच्या उन्नतीचा मार्ग अवरुद्ध करणारे जे हितशत्रू आहेत, त्यांचासुद्धा विनाश होवो, ते निष्प्रभ होवो, अशी कामना केली आहे.

या प्रार्थना साधकाच्या जीवनात समृद्धी, शांती आणि आत्मिक उन्नती घडवतात. अर्गला स्तोत्र हे केवळ भौतिक लाभासाठी नाही, तर अंतःकरणाच्या विकारांवर विजय मिळवण्यासाठी आहे. बाह्य विकारांपासुन संरक्षण, अंतर्मुख होणे आणि चंडी पाठ करण्यापूर्वी साधक सर्वार्थाने देवीच्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी आतुर होणे आवश्यक असते. हे घडल्याशिवाय चंडी पाठाचे मनोवांछित फळ प्राप्त होत नाही. अर्गला स्तोत्र हे चंडी पाठरूपी आध्यात्मिक प्रवेशाचा मार्ग प्रशस्त करते.

अर्गला स्तोत्राच्या प्रभावाने साधक मंत्रचैतन्याने युक्त होतो. मंत्रचैतन्य म्हणजे मंत्रात जागवलेली शक्ती, जी श्रद्धा, भावना आणि एकाग्रतेतून प्रकट होते. अर्गला स्तोत्र हे साधकाच्या चित्ताला शुद्ध करते, भयमुक्त करते आणि देवीच्या कृपेचा अनुभव घडवते. नियमित पठणाने साधकाला आत्मबल प्राप्त होते आणि तो देवीच्या साक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करू लागतो. अर्गला स्तोत्र हे केवळ स्तुती नव्हे, तर एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. हे साधकाच्या चित्ताला शुद्ध करते, त्याला अंतर्मुख करते आणि देवीच्या कृपेचा अनुभव घडवते. हे स्तोत्र साधकाला आत्मिक उन्नतीच्या दिशेने नेते, त्याच्या जीवनात शांती, समृद्धी आणि विजय निर्माण करते. अर्गला स्तोत्र म्हणजे चित्तशुद्धीचा मंत्र, साधनेचा पहिला टप्पा आणि मातृशक्तीशी संवाद साधण्याचे सशक्त माध्यम. श्रद्धा, भावना आणि मंत्रचैतन्य यांच्याशी एकरूप होऊन केलेले अर्गला स्तोत्राचे पठण, हे आत्मा आणि परमात्म्याच्या संवादाचे द्वार उघडते.


ज्याचे चित्त बाह्य विषयांकडे झुकलेले आहे किंवा एकांतातही अस्थिर आहे, अशा व्यक्तीसाठी चंडी तत्त्वात प्रवेश करणे कठीण असते. म्हणूनच पूर्वाचार्यांनी अत्यंत करुणेने, चंडी पाठाच्या आधी चित्ताची वृत्ती देवीकडे वळवण्यासाठी अर्गला स्तोत्र, कीलक आणि देवी कवच यांचे पठण करण्याचे विधान केले आहे. मंत्रात चैतन्य नसेल, तर स्तोत्रांचे पठण केवळ सामान्य फल देणारे ठरते. देवीमाहात्म्याच्या ब्रह्मस्तोत्रात मंत्रचैतन्य म्हणजे काय, याचे वर्णन केलेले आहे. या स्तोत्रात सुरुवातीला ‘जय त्वं देवी’ या वाक्याद्वारे ‘जय’ या शब्दाचा उच्चार करून, चित्ताची वृत्ती देवीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. हे स्तोत्र साधकाला आत्मिक बल प्रदान करते आणि त्याला चंडी तत्त्वात प्रवेश करण्यास योग्य बनवते. या स्तोत्राचा पाठ साधकाचे चित्त शुद्ध करतो, त्याला भयमुक्त करतो आणि देवीची कृपा प्राप्त करण्यास साहाय्यक ठरतो.


सुजीत भोगले