नाक कापणारी कबुली!

02 Oct 2025 10:58:16

आजचा दिवस एकाअर्थाने विशेषच म्हणावा लागेल. आज २ ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची जयंती आणि विजयादशमीसुद्धा. म्हणजे एकीकडे अहिंसेच्या मार्गाचे पुरस्कर्ते गांधीजी आणि दुसरीकडे राक्षसी रावणाचा संहार करणारे प्रभू श्रीराम! महात्मा गांधींचे नाव घेत, काँग्रेसने कायमच अहिंसेचा केवळ बुरखा पांघरला, तर प्रभू श्रीरामांचे अस्तित्वच मुळी काँग्रेसला मान्य नसल्यामुळे, रामचरित्रातील आदर्श घेण्याचा दुरन्वयानेही संबंध नाहीच. परवा देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या अशाच एका गौप्यस्फोटामुळे काँग्रेसच्या गांधीगिरी नव्हे, तर भित्रेपणाचा पदार्फाश झाला.

२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात आक्रोश उफाळून आला होता. केंद्र सरकारने पाकिस्तानवर लष्करी कारवाई करून आयुष्यभराचा धडा शिकवावा, ही जनभावनाही प्रबळ होती. परंतु, काँग्रेसने लष्कराचे हात त्यावेळी बांधून ठेवले. आता या घटनेविषयी १७ वर्षांनंतर बोलताना पी. चिदंबरम यांनी यामागे अमेरिकेचा दबाव असल्याचे कबूल केले. एवढेच नाही, तर “अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री कॉन्डोलीझा राईस या त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मला भेटायला भारतात आल्या होत्या. त्यांनी तेव्हा तुम्ही पाकिस्तानला प्रतिसाद देऊ नका,” असे सांगितल्याची कबुलीही चिदंबरम यांनी दिली. “भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा व सेवेच्या दबावामुळे त्यावेळी रणांगणात थेट उत्तर देणे पाकिस्तानला टाळण्यात आले,” असे चिदंबरम म्हणाले.

याचाच अर्थ, तत्कालीन काँग्रेस सरकारने राष्ट्रहित, जनभावना झुगारून, अमेरिकेच्या इशार्‍यावर पाकिस्तानला तेव्हा अभय दिले. पण, आज तोच काँग्रेस पक्ष, त्या पक्षाचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकल्याच्या वल्गना करीत आहेत, असा हा विरोधाभास. एवढेच नाही, तर भारताने पाकिस्तानविरोधात राबविलेल्या आजवरच्या सगळ्या लष्करी कारवायांवरही राहुल गांधींनी वेळोवेळी प्रश्चचिन्ह उपस्थित करीत पाकिस्तानचीच तळी उचलली. असो. पण, चिदंबरम यांच्या या दाव्यांचे टायमिंगही महत्त्वाचे. नेमके राहुल गांधी द. अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना, चिदंबरम यांनी केलेला हा खुलासा राहुल गांधींनाच अडचणीत टाकण्यासाठी नाही ना, हाच खरा प्रश्न!

आझमींचा खोडसाळपणा


नवरात्रीमुळे देशभरात उत्सवी, चैतन्याचे वातावरण असताना, त्याला गालबोट लावण्याचा खोडसाळपणा समाजकंटकांकडून गेले काही दिवस सुरू होताच. मग ‘आय लव्ह मोहम्मद’चे स्टीकर्स चिकटवणे असेल, गरब्यामध्ये गैरहिंदूंची घुसखोरी असू दे की, नागपूरमधील देवीच्या मूर्तीच्या विटंबनेचा अश्लाघ्य प्रकार... या सगळ्यातून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी, दंगली भडकाव्या हाच कुटील हेतू. महाराष्ट्रातही आधीच अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात असताना, सरकार, प्रशासकीय व्यवस्थाही युद्धपातळीवर कार्यरत आहे. पण, तिथे मदतीचा हात देण्यापेक्षा काही नतद्रष्टांना मुद्दाम ‘कॉन्ट्रोवर्सी’ भडकावण्याची भारी हौस. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे त्यापैकीच एक. या महाशयांनी काल भिवंडीमध्ये माध्यमांनी मराठीत प्रतिक्रिया विचारली असता, “भिवंडीत मराठीची आवश्यकताच काय?” असे पत्रकारांना प्रत्युत्तर दिले.

एवढ्यावर थांबतील ते आझमी कसले. वर त्यांचे म्हणणे असे की, “मराठी आणि हिंदीमध्ये काय फरक आहे? मी मराठी बोलू शकतो, पण मराठीची आवश्यकता काय आहे? हे भिवंडी आहे. जर ही प्रतिक्रिया दिल्ली वा उत्तर प्रदेशात गेली, तर कोणाला समजणार आहे?” त्यामुळे आझमींच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले नसते तरच नवल! आधीच मराठी विरुद्ध हिंदी संघर्षावरून वातावरण संवेदनशील असताना, आझमींना अशी विधाने करण्याची मुळी आवश्यकताच नव्हती. नेतेमंडळींसह अगदी मुख्यमंत्रीही माध्यमांना मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे माध्यमांनी मराठीत प्रतिक्रिया विचारल्यावर मराठी येत असूनही त्यासाठी नकार देणे, हा निव्वळ खोडसाळपणाच!

भिवंडीमध्ये केवळ मुस्लीम समाज राहत नसून, मराठीभाषिकही वास्तव्यास आहेत. पण, तरीही आझमींनी मराठीत साधी दोन ओळीची प्रतिक्रिया देण्यास नकार देणे, हा त्यांचा आडमुठेपणाच. निवडणुका आल्या की, मतं मागताना मराठीत गोड बोलायचे आणि नंतर मराठी भाषेची आवश्यकताच काय, असा सवाल उपस्थित करायचा, हा शुद्ध हलकटपणा नाही, तर दुसरे काय? कदाचित २००९ साली आमदारकीची हिंदीत शपथ घेताना झालेल्या विरोधांतून श्रीमुखात बसलेली चपराक आझमी विसरले असावे. तशी वेळ पुन्हा आणू नका, एवढेच!




Powered By Sangraha 9.0