भविष्यातील शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पोशिर धरणातून ५०० एमएलटी पाणी आणणार! : गणेश नाईक
02-Oct-2025
Total Views |
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली १४ गावे, सिडकोच्या घराचा पुनर्विकासासाठी शहराच्या मर्यादापेक्षा जास्त देण्यात आलेले चटई क्षेत्र यामुळे शहराचे नियोजन बिघडले आहे. भविष्यात शहरातील नागरिकांना निर्माण होणारी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोशियार धरणातून ५०० एमएलडी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १०१ सेवाभावी सामाजिक उपक्रमाचा पंधरवड्या समारोप बुधवार १ ऑक्टोबर रोजी सिडकोच्या वाशी एक्झिबिशन सेंटरच्या भव्य सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी गणेश नाईक बोलत होते. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहराचे नियोजन, पाणी प्रश्न, आणि पालिकेच्या व्यवस्थे बाबत तीव्र नाराजीचा व्यक्त केली.
नवी मुंबईच्या भविष्यासाठी कर्जत तालुक्यातील पोशिर धरणातून ५०० एमएलडी पाणी आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखत असल्याचे जाहीर केले. यासाठी पालिकेला अंदाजे ४ हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचेही गणेश नाईक यांनी सांगितले.
व्यासपीठावर माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी स्थायी सभापती संपत शेवाळे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. गणेश नाईक यांनी त्यांच्या खास शैलीत महापालिका प्रशासकावर आणि शहरातील कोलमडत चाललेल्या व्यवस्थेवर टीकास्त्र सोडले. कल्याण (ग्रामीण) भागातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश, मोरबे व बारवी धरण पाणी प्रश्न, सिडको वसाहतींमधील गृहप्रकल्प तसेच पुनर्विकासातील बेछूट FSI वाटप यामुळे शहर नियोजनाचे सूत्र बिघडले असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. विशेषतः पालिका प्रशासकाने पालिकेच्या मुदतठेवी संपवल्याबद्दल त्यांनी नाराजी दर्शवली.
महापौर भाजपचाच असणार; नाईकांचा ठाम विश्वास
आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीवर बोलताना नाईक यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा भाजपचीच सत्ता येणार आणि नवी मुंबईचा महापौर कोण असेल हे मीच ठरवणार आहे. दरम्यान, मतदारांना कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी न पडता सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले.
१०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा धान्यतुलाने गौरव
कार्यक्रमाचे आयोजक दशरथ भगत यांनी आपल्या भाषणात ना. नाईक यांच्या कार्याचा आढावा घेत मोरबे धरणाला 'श्रीगणेश सरोवर' असे नाव देण्याची मागणी केली. या समारोहात ना. नाईक यांच्या हस्ते सामाजिक पंधरवड्याच्या माहिती व छायाचित्र स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या १०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची धान्याने तुला करून त्यांचा सन्मान करण्यात आला. हे अन्नधान्य गरजूंना वाटप करण्यात येणार असल्याचे संयोजक निशांत भगत व संदीप भगत यांनी सांगितले.