नोबेल विजेत्यांच्या उपस्थितीत 'किट'चा २१ वा दीक्षांत समारंभ संपन्न

    02-Oct-2025
Total Views |

भुवनेश्वर : किट डी.यू. (KIIT DU) चा २१ वा वार्षिक दीक्षांत समारंभ तीन दिवस चालून रविवारी संपन्न झाला. या वेळी ९,४६४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात ७,२३५ बॅचलर, २,०३४ मास्टर्स आणि १९५ पीएच.डी. पदव्या समाविष्ट होत्या.

या समारंभाला नोबेल विजेते प्रा. मोहन मुनसिंघे (श्रीलंका), नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या एच.ई. ओविड बाउचामौई (ट्युनिशिया) आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती अब्दुलकवी अहमद युसूफ हे मान्यवर उपस्थित होते.

डॉ. फिडेल रेयेस ली (ग्वाटेमाला), डॉ. हुजैफा खोराक़ीवाला (वॉकहार्ट लि.), नॉर्बर्ट सॉयर (जर्मनी), सुंजॉय हंस (लालचंद ग्रुप), एस. के. सचदेवा (कंपिटिशन सक्सेस रिव्ह्यू) व बाउचामौई यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले.

आपल्या भाषणात प्रा. मुनसिंघे यांनी गरीबी, विषमता आणि संसाधनांच्या टंचाईवर उपाय शोधण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. न्यायमूर्ती युसूफ यांनी पदवीधरांना शांततेचे दूत व न्यायाचे प्रवक्ते होण्याचे आवाहन केले. तर बाउचामौई यांनी “किटला भेट देणाऱ्या २३ नोबेल विजेत्यांच्या परंपरेत सामील होणे सन्मानाची बाब आहे,” असे सांगितले.

वक्त्यांनी किट व किस (KISS) संस्थांचे संस्थापक डॉ. अच्युत सामंत यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. “किट व किस हे शिक्षण आणि सामाजिक सेवेचे दीपस्तंभ आहेत,” असे डॉ. हुजैफा खोराक़ीवाला यांनी म्हटले.

कुलगुरू अशोक कुमार परिजा यांनी पदवीधर वर्गाचे कौतुक करताना सांगितले की, “२०२५ चा वर्ग हा बदलाचे मशालवाहक आहे.” प्रा.एस.के.आचार्य यांनी विद्यार्थ्यांना सतत शिकत राहण्याचा सल्ला दिला.

या प्रसंगी डॉ. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “संशोधन आणि नवोन्मेष अधिक बळकट करून आम्ही शैक्षणिक प्रभाव वाढवत राहू.”